Thursday, May 1, 2008

अब्दुल खान - ३

एकदा काय झालं...
एका रविवारी दुपारी इक्बाल मला भेटायला आला होता. अब्दुल खान कुठेतरी बाहेर गेला होता. आम्ही व्हिडिओवर एक हिन्दी फिल्म लावून बसलो होतो. पिक्चर यथातथाच होता. आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करून गप्पा मारण्यात रंगलो होतो....

अचानक घराचा दरवाजा उघडून अब्दुल खान आत आला. इक्बालचं आणि त्याचं नेहमीचं सलाम आलेकुम झालं.

"क्या चल रहा है मियां?"
"कुछ नही, बस गप्पे लडा रहे है!" इक्बाल
अब्दुल खानने थोडावेळ टीव्हीकडे पाहिलं....
"ये क्या बकवास देख रहे हो? कुछ अच्छे जीनत अमानके गाने लगावो यार!!"

हे त्याचं आणखी एक वेड होतं. त्याला सगळ्या भारतीय नट्यांमध्ये झीनत अमान विलक्षण आवडायची!!!

"ए इक्बाल, उठ!! जरा नीचे जा और कोनेवाले उस सिंधीके दुकानसे जीनत के गानेवा़ली कॅसेट लेके आ!! और देख, साथमें समोसे और जलेबी भी लेके आ, ये ले पैसे!!"
"तू आयेगा मेरे साथ?" इक्बालने मला विचारले....
"अबे कराचीके सांईं! सुलेशको बैठने दे यहां!! वो कोनेवाला और तुम, दोनो सिंधी हो इसलिये तुम्हें भेज रहा हूं! जितना जी चाहे बार्गेनिंग करो. हम दोनो वॉरियर्सको बैठने दो यहां!" आज त्याचा खोड्या काढायचाच मूड होता...
"तू वापस आयें तभीतक हम ड्रिंक्स बनाकर तय्यार रखते है! चलो, आज पार्टी करेंगे....."

मला 'तू जर पार्ट्या करणार असशील तर जागा मिळणार नाही' असे अगोदर खडसावणारा अब्दुल खान स्वतःच म्हणत होता...

मी त्याला त्याच्या झीनत अमानच्या वेडाबद्द्ल विचारायचं ठरवलं. खरंतर झीनत तेंव्हा खूप फेमस होती. सत्यं, शिवं, सुंदरम वगैरे!!! पण म्हणून काय झालं?
"खानसाब, मुझे एक बात सच सच बताओ, आपको झीनत अमान इतनी पसंद क्यों है? वो तो क्रॉस-आईड है!! मुझे बिल्कुल समझमें नही आता की उसमें आप इतना क्या देखते है?'
"अबे उल्लूके पठ्ठे!!" इक्बाल गेल्याची खात्री करून घेउन तो म्हणाला, "उसकी आंखोसे हमें क्या लेना देना? अरे, उसका जिस्म देख जिस्म!! आंखोको लेकर क्या करेगा तू? वैसेभी ऐन मौकेपर तो जिस्म्ही काम आता है ना!!!"

मी सर्द्च झालो. पुढे विषय वाढवला नाही पण त्याच्या परिपक्व रसिकतेला मनातल्या मनात दाद दिली. मनातल्या मनातच फक्त, कारण माझ्या पांढरपेशा मनाला मोठयाने दाद देण्याची लाज वाटली. स्त्रीया आणि नातेसंबंध याबाबत त्याचे विचार अगदी वेगळे होते. जसजशी आमची मैत्री वाढली तसतसे मला ते कळत गेले आणि प्रत्येक वेळी मी अचंबित होत गेलो...

एकदा क्लायंट वेळेवर न पोहोचू शकल्याने माझी एक मोठी मीटींग रद्द झाली. चला, लवकर सुटका झाली म्हणून मी आनंदातच घरी आलो. चार-साडेचारचा सुमार असेल. घरी येऊन लॅच मध्ये चावी फिरवली तरी दरवाजा उघडेना! आतून बोल्ट घालून दार बंद करण्यात आलं होतं. मला आश्चर्य वाटलं. आम्ही बोल्ट कधीच लावत नसू. दोघांकडेही चावी असल्याने त्याची आवश्यकताच कधी भासली नव्हती. मी दरवाजा ठोठावला, उत्तर नाही! पुनः पुनः दरवाजा ठोठावल्यावर अब्दुल खानचा आवाज आला,

"गो अवे!"
"खानसाब, मै सुलेश हूं!"
"अच्छा, ठहरो एक मिनट!"

तब्बल पाच मिनिटांनी दरवाजा उघडला. दरवाजात अब्दुल खान उभा! उघडाबंब, कमरेला फक्त एक लुंगी गुंडाळलेली!! काही न बोलता त्याने मला आत यायला वाट दिली. मी बूट-मोजे काढून फ्रेश व्हायला बाथरूमकडे वळलो तर बाथरूमचा दरवाजा बंद!

"माय फ्रेंड इज इनसाईड!" तो म्हणाला. माझी नजर परत मेन दरवाजाकडच्या जमिनीकडे वळली. तिथे लेडीज सॅन्डल्सची एक जोडी होती...

"ओके, आय विल युज इट लेटर" असे म्हणून मी माझ्या खोलीत गेलो. थोडया वेळाने बाथरूममधली ती पंजाबी ड्रेस घातलेली स्त्री बाहेर आली. तिचं आणि अब्दुलखानचं हलक्या आवाजात काहीतरी बोलणं झालं आणि ती गेली. हा विषय इथेच सोडायचा असं मी ठरवलं...

दोन्-तीन दिवसांनी आम्ही गप्पा मारत बसलो असतांना अचानक अब्दुल खानच म्हणाला,
"अरे सुलेश, तुमसे एक बात करनी थी! याद है, उस दिन तुम जल्दी आये तभी वो औरत आयी थी, मैने मेरी फ्रेंड करके बतायी..."
मी काहीच बोललो नाही..
"हालांकि वो फ्रेंड तो है, बट शी इज मोअर दॅन अ फ्रेंड!"
"पता है!" मी म्हणालो. तो आश्चर्याने उडालाच!
"क्या, क्या पता है तुम्हें?"
"दॅट शी इज मोअर दॅन युवर फ्रेंड"
"तुम्हें क्या मालूम? क्या तुम उसे जानते हो?" तो चक्रावला होता.
"उसे तो नही जानता, लेकिन खानसाब, आपको तो अब मैं जानता हूं!! अगर वो सिर्फ दोस्त होती तो आप उसके सामने बिना कुर्ता पहने हुए सिर्फ लुंगी लटकाये कभी नही बैठते! इतने शरीफ तो आपभी हो!!" मी डोळे मिचकावले.
"तुम तो शेरलॉक होम्सके बाप हो यार!" तो हसून उदगारला, "वो बीवी है मेरी!"
माझ्या चेहर्‍यावर मिश्किल हसू कायम होतं. तो थोडा ओशाळला...
"अरे वैसी शादीवाली बीवी नही! वो रखैल है मेरी! लेकिन रखैल कहना अच्छा नही लगता नं!"

म्हणजे त्याला ऍक्चुअली रखेली ठेवायला हरकत वाटत नव्हती पण तिला रखेली म्हणायला 'अच्छा नही लगता!!'

"खानसाब आपको यह सब मुझे कहने की कोई जरूरत नहीं. यू आर ऍन ऍडल्ट! यू डोन्ट नीड टू एक्सप्लेन एनीथिंग टू मी"
"अरे वो तो ठीक है. लेकिन तुम मेरे रूममेट हो. शायद आगेभी कभी उसदिन जैसी नौबत आ सकती है. तुम्हें ऑकवर्ड होगा, उसे ऑकवर्ड होगा, मुझे तो डबल ऑकवर्ड होगा! खामखा झंझट क्यूं? मैने बहुत सोचा और फिर फैसला किया किया तुम्हें साफ साफ बता देनाही अच्छा है, तुम समझ जाओगे!"
"ठीक है!"
"उसका नाम शबनम है. शादी होके पाकिस्तानसे यहां आयी. एक बच्चा होने के बाद उसके शौहरने तलाक दे दिया और दूसरे औरत के साथ रहने लगा. अकेली बच्चे के साथ रहती है. एक डिपार्टमेंटल स्टोअरमें काम करती है"

म्हणजे अगदीच नगरभवानी नव्हती तर! तिला नव्हता नवरा आणि याला नव्हती बायको! दोघे एकमेकांची गरज भागवत होते...

सिम्बियॉटिक जॉईंट व्हेंचर!! माझं ताजंताजं एम्.बी.ए. मनात बडबडलं!!

"तो फिर आप उससे शादी क्यों नही करते?"
"कॉम्प्लिकेशन है, कभी बताऊंगा बादमें"

त्यानंतर तो विषय तिथेच संपला. मला त्याचं वागणं जरी पसंत नव्हतं तरी त्याने मला विश्वासात घेण्याइतकं आपलं मानलं याचं मला बरं वाटलं! त्यानंतर शबनम मी घरी असतांना क्वचितच आली असेल. "हाय, हलो" यापुढे आमची कधीच बातचीत झाली नाही. खान मात्र मला कधी कधी शनिवारी रात्री मोकळेपणे सांगायचा,

"सुलेश, मैं जरा शबनमके यहां जा रहा हुं, वापस आनेको देर होगी" माझ्या चेहर्‍यावरचा संकोच त्याच्या लक्षात यायच्या आधीच तो दरवाजा बंद करुन जात असे.

एके दिवशी मात्र त्याने माझी साफ दांडी उडवली. मला म्हणाला,

"सुलेश, मै देख रहां हूं, यहांपर तुम्हारी कोई गर्लफ्रेंड तो है नही! ऑफिसमें कोई है क्या?"
"नही तो खानसाब!" माझा चेहरा लाजेने लाल झाला असावा.
"अरे इतना शरमानेकी जरूरत नहीं. मेराभी यही अंदाजा था! कैसे होगा रे तुम्हारा?'

मी काही न कळून त्याचाकडे पाहिले...

"मैं शबनमको कहूं, तुम्हारे लिये उसकी कोई सहेली ढुंढने?"

माझ्या डोळ्यांसमोर काजवे चमकले. मी सुद्धा रखेली ठेवू? तीही लग्नाआधीच? माझ्या डोळ्यापुढे भारतातले माझे आई-वडील उभे राहिले! त्यांना जर कळलं की आपल्या दिवट्या चिरंजीवांनी रखेली ठेवली आहे तर? वडील तर कानाखाली एक आवाजच काढतील. आणि आई? ती चुलीतलं जळतं लाकूड डागून माझा नेमका तोच अवयव निकामी करेल...

मी एकदम शहारलो. माझी ती विचित्र हालचाल पाहून अब्दुल खान म्हणाला,

"कोई बात नही, सोचकर बताना"

क्या सोचना, कपाळ!! तो मित्राच्या काळजीने सांगत होता हे मला कळत होतं पण आपल्या विश्वात ते इतकं भयंकर होतं की मला ते त्याला समजावून सांगताही आलं नसतं!!

मला नेहमी त्याच्या पूर्वेतिहासाबद्दल कुतुहल असायचं. हा कोण असेल, कुठे वाढला असेल, त्याला फॅमिली असेल काय! इथे न्यूयॉर्कमध्ये कसा आला?

आणि एक दिवस मला सगळं सगळं समजलं!! अब्दुल खाननेच सांगितलं!!

ती रात्र मी आयुष्यात कधीच विसरणार नाही.....



(क्रमशः)

No comments: