Friday, May 23, 2008

गावित मास्तर

"आपलं हस्तलिखित आता चांगलं तयार होत आलंय! तू बरेच श्रम घेतलेले दिसताहेत" आमचे मराठीचे देशमुख सर मला म्हणत होते...
"होय सर! कथा, लेख, कविता सगळं जमलंय. आता मुखपृष्ठ ठरलं की झालं"
"आणि तुझं संपादकीय?"
"ते सुद्धा पुरं होत आलंय"
"बरं, मुखपृष्ठाचं काय करणार?"
"गावित मास्तरांनी काढलेलं एखादं चित्र टाकावं म्हणतोय" मी
"तुला वाटतं तो चित्र काढून देईल?"
"विचारायला तर काय हरकत आहे"
"असं म्हणतोस? ठीक आहे, बघ विचारून! पण सांभाळून हो, दुर्वास आहे तो!!"

मला हसू आलं. देशमुख सरांनीही स्मित केलं आणि मला प्रेमळपणे म्हणाले,

"तुला अगदीच मारायला उठला तर माझं नांव सांग! मी विचारायला सांगितलं होतं म्हणुन सांग"

मी मान डोलावली. आता गावित मास्तरांशी कसं आणि काय बोलायचं याचा मनाशीच विचार करू लागलो...

माझ्या शालेय जीवनात मला अनेक शिक्षक मिळाले. काही चांगले काही वाईट! गावित मास्तर त्यातीलच एक! ते काही गणित, विज्ञान, इतिहास वा भूगोल शिकवणारे मास्तर नव्हते. किंबहुना आमच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इंग्रजी व्यवस्थित न येणारे ते एकमात्र शिक्षक असावेत. त्यांचा मुख्य विषय चित्रकला! जोडीला ते आमच्या पीटीच्या शिक्षकांनाही मदत करीत. कदाचित नुसती चित्रकला शिकवून त्यांचे कामाचे तास पूर्ण भरत नसावेत म्हणून त्यांच्यावर आणखी पीटी शिकवण्याची सक्ती असावी. आमची शाळा दोन सत्रात होती तेंव्हा एका सत्राला गावित मास्तर आणि दुसर्‍या सत्राला घाटगे नांवाच्या एक मॅडम होत्या. होय, मॅडमच!! त्यांना शिक्षिका म्हटलेले मुळीच आवडायचे नाही. त्या नोकरी तरी कशासाठी करत होत्या देव जाणे. त्यांचे पती गावातील अत्यंत यशस्वी डॉक्टर होते. स्वत:ची गाडी सोडायला आणि न्यायला येणार्‍या आमच्या शाळेतील या एकमेव व्यक्ती!! एरवी आमचे प्रिन्सिपलसुद्धा रेल्वे स्टेशनवर उतरले की वन्-टू, वन्-टू करत चालत यायचे आणि जायचे!!

गावित मास्तर मात्र पीटी शिकवत असले तरी त्यांचा जीव त्यात रमत नसे. त्यांची आवड म्हणजे चित्रकला. ते चित्रे फारच सफाईने काढत. पण भलतेच कडक!त्यांना डोक्यात राख घालून घ्यायला वेळ लागत नसे. एकदा मला चांगले आठवते. कैलास लेणे अजिंठ्याला आहे की वेरूळला याचे बरोबर उत्तर देता न आल्याने त्यांनी चिडून जाऊन आम्हा सातवीतल्या सगळ्या मुलांना सटासट छड्या मारल्या होत्या. आता सातवीतली मुलं आम्ही, त्यातही मुंबईतच जन्मलेली आणि वाढलेली! आम्हाला अजिंठा-वेरूळला लेणी आहेत हे ऐकून माहित होते पण कुठे नक्की काय आहे ते कुठे आठवत होते? माझी तर त्याकाळी समजूत मराठवाडा म्हणजे शिवाजीचा कुठलातरी बंगला असावा अशीच होती!! शिवाजीमुळेच मराठे या शब्दाचा परिचय होता आणि वाडा म्हणजे मोठा बंगला हे माहिती होतं!! जसा लालमहाल, तसा मराठवाडा!!! आता वाटतं की नशीब माझं की मी हे त्यावेळी कुठे बोलून दाखवलं नाही. नाहीतर साफ पिटला गेलो असतो.....

मी आता दहावीत असलो तरी हा पूर्वीचा प्रसंग आठवून जरा काळजीतच होतो. हळूच टिचर्स-रूममध्ये गेलो. गावित मास्तर एका कोपर्‍यात बसले होते, पेपर वाचत होते. पाच सव्वापाच फूट उंची, काळा वर्ण, आणि अत्यंत किडकिडीत शरिरयष्टी! मुलांना मारायला इतका जोर त्यांच्या अंगात कुठून यायचा देव जाणे!! डोक्यावर केसांची चहासाखर झालेली! बारीक कोरलेली अणकुचीदार मिशी, रमेश देव स्टाईल!! अंगात मळखाऊ रंगाची, कॉटनचीच, शर्ट आणि पॅन्ट! नाकावर जस्ती काड्यांचा चश्मा!!

मी त्यांच्याजवळ जाउन हळूच हाक मारली.

"सर"
"काय आहे?" वाचनात व्यत्यय आल्याने वैतागलेला स्वर...
"नाही सर, आम्ही ते शाळेचं हस्तलिखित तयार करतोय, सगळं होत आलंय, तेंव्हा जरा मुखपृष्ठासाठी तुम्ही काढलेलं एखादं चित्र जर वापरता आलं तर....."
"हस्तलिखित? म्हणजे मराठीत दिसतंय!"
"होय सर, तुम्ही कसं ओळखलंत?"
"त्यात काय कठीन आहे? अरे इंग्रजी असतं तर शाळेनं छापलं नसतं का? मराठी आहे म्हणुनच हस्तालिखित! मराठीवर कशाला पैसा खर्च करतील हे लोक!"

मी काहीच बोललो नाही. मग मास्तरच म्हणाले,

"ठीक आहे, आनून टाक तुझं हस्तलिखित इथे"
"सर आम्हाला फक्त चित्र हवंय, हस्तलिखित कशाला आणून टाकू?"
"अरे गाढवा! मला ते वाचून बघितलं पायजेल ना! त्याशिवाय चित्रासाठी विषय कसा निवडनार? का हेमामालिनीचं चित्रं काढून हवेय तुला?" मास्तर वैतागले...

मी मनांत म्ह्टलं की मास्तर जर खरंच हेमामालिनीचं चित्र काढून देतील तर काय बहार येईल! आपलं वार्षिक सॉलिड पॉप्युलर होईल!! फार काय, शाळा मॅनेजमेंट मग ते छापेलसुद्धा!! पण तसं बोललो असतो तर तिथेच मुस्काटीत खावी लागली असती...

मी दुसर्‍या दिवशी सकाळी ते हस्तलिखित मास्तरांना नेऊन दिलं. शाळा सुटायच्या आधी मास्तरांनी माझ्यासाठी वर्गात निरोप धाडला की मला बोलावलंय! मी घाबरतच टिचर्स रूममध्ये गेलो. मास्तर टेबलाशी हस्तलिखित पसरून बसले होते. मला बघताच म्हणाले,

"काय हो अतिशहाने, यांत तुम्ही काय लिहिलंय?"
"सर ती एक कथा लिहिली आहे..."
"अरे पण संपादक ना तू? मग तुझं संपादकीय कुठंय?"
"सर, ते मी अजून लिहीतोय, पूर्ण नाही झालं..."
"मग लवकर लिहून आनून दे. त्याच्याशिवाय मी हात लावणार नाही कशाला..."

मी त्या रात्री बसून माझं संपादकीय पूर्ण केलं. विषय मला वाटतं की "मराठी संस्कृतीमध्ये लोककलांचे स्थान" असा काहीतरी होता. मी रात्री जागून अभ्यास करतोय असा समज होऊन आईवडिलही खूष झाले....

दुसर्‍या दिवशी जाऊन मी ते संपादकीय गावित सरांना नेऊन दिलं. त्यांनी माझ्यासमोरच ते वाचलं...

"सर कसं आहे?"
"ते मला काय ठाऊक? मी काय मराठीचा मास्तर आहे? आता पुढल्या सोमवारी साडेदहा वाजता मला भेट इथेच!"
"म्हणजे सर तुम्ही नक्की चित्र काढणार ना!"
"अरे नायतर काय शेन्या थापायला बोलवून र्‍ह्यायलोय का तुला? चल फूट आता, हकाल गाडी!"

मला अतिशय आनंद झाला. त्या आनंदात तिथून "फुटायला" ही मला काही वाटलं नाही...

पुढल्या सोमवार पर्यंत मला नुसता धीर निघत नव्हता. कसाबसा साडेदहा वाजेपर्यंत थांबलो आणि गावित मास्तरांना भेटायला टीचर्स रूम कडे धाव घेतली....

मास्तर टेबलाशी बसले होते. मला पाहताच उठले आणि म्हणाले,

"चल माझ्याबरोबर"

आमच्या शाळेत ड्रॉइंगच्या तासासाठी निराळी खोली होती. तिथे निरनिराळी चित्रं लावली होती, तिथली बाकंसुद्धा जास्त लांबरूंद वगैरे.... आम्ही तिथे गेलो.

"सर चित्र झालं तयार?"
"नाय, मनाजोगतं झालं नाय म्हनून फाडून टाकलं" मला प्रथमच एक सरळ उत्तर मिळालं. पण असं उत्तर, की माझी त्यामुळे खूप निराशा झाली...
"मग आता काय?" मी
"आता काय! चल बस हितं! मास्तर एका पांढराशुभ्र कागद लावलेल्या फलकाशी बसले. मला त्यांनी समोर बसवलं. माझ्या हातात एक कागद दिला. स्वतःच्या हातात एक कोळसा घेतला आणि मला म्हणाले,
"हे घ्ये तुझं ते संपादकीय आनि वाच मोठ्यानं"

मी भारावल्यागत त्यांच्याकडून तो कागद घेतला आणि मोठयाने सावकाश ते संपादकीय वाचायला सुरवात केली. त्याबरोबर गावितमास्तरांनी कागदावर कोळसा ओढायला सुरवात केली...

मला ते काय काढतायत ते बघायची अतीव इच्छा होती. मी वाचन थांबवून त्यांच्या फलकाकडे नजर टाकायचा प्रयत्न केला.....

"हात् भोस*च्या! थांबू नगंस!" मास्तर कडाडले......

ते जरी कडक असले तरी त्यांचा हा आवाज मी यापूर्वी कधीच ऐकला नव्हता. मी घाबरून पुढे वाचत राहिलो....

संपादकीय वाचून संपलं....

मास्तर समाधीत बुडालेले! हाताने फराफर रेघोट्या मारत होते!!! हाताला जरा विश्रांती नव्हती.....

मी थोडा वेळ तेच नुसता पहात राहिलो...

नंतर केवळ उत्सुकतेपोटी उठलो आणि त्यांच्या माराच्या टप्प्यात येणार नाही असं बघून त्याच्या पाठीशी जाऊन त्यांनी काय रेखाटलंय ते पाहू लागलो.....

पाह्तो तर काय!!!!

गावित सरांनी नुसत्या कोळश्याने समोरच्या फलकावर दोन रेखाकृती रेखाटल्या होत्या....

एक होती पवाडा गाण्यार्‍या शाहिराची!! अगदी मर्‍हाट्मोळा पोशाख! डफ आणि फेट्यासकट!! आणि चेहर्‍यावर अगदी बाबासाहेब पुरंदर्‍यांचा आवेश!!!

दुसरी होती नऊवारी नेसलेल्या, बोटांत पदर उंचावलेल्या मराठमोळ्या तमाशा नर्तिकेची!! चेहरा वेगळा होता पण भाव अगदी जयश्री गडकरच्या "बुगडी माझी सांडली ग!" मधला!!!!

"सर काय मस्त आहे हो!!" माराची पर्वा न करता माझ्या नकळत माझ्या तोंडून शब्द बाहेर पडले...
"तुझ्या संपादकीयाशी जुळतंय का नाय!"
"ते तर आहेच सर! पण नुसतं चित्र म्हणुनही किती सुंदर आहे!!!"
"मला वाटलंच!" सर समाधानाने म्हणाले, "तुला हवं असेल तर यात रंग भरून देईन!"
"नको, नको! रंग नको!!! तपशील नुसता कोळश्यानेच भरा....."
"आनि तुझ्या त्या देशमुख मास्तराच्या मनाला नाही आलं तर?" सर मिश्किलपणे म्हणाले....
"नाही आलं तर नाही आलं!! त्यांना सांगीन की मला आधी संपादक म्हणून काढून टाका आणि नंतर हिंमत असेल तर स्वतः या चित्रात साजेसे रंग भरा!!!"

"शाबास! पोरा, शाबास!!" सरांच्या तोंडून कधी नव्हे हे ती मी प्रशंसा ऐकली...

"अरे म्हनून तर मी तुझं संपादकीय वाचायला मागितलं! तू बरं लिवतोस!! विचार करुन शब्द निवडतोस!! अरे लेखन ही पन एक कलाच नाय का? आनि कुठल्याही कलेचं असंच असतंय!! जिथे सुरवात पाहिजे तिथे सुरवात आनि जिथं शेवट पाहिजे तिथे शेवट!! अरे उगाच आलं मनात आनि काढलं कागदावर उतरवून, त्याला काय अर्थ आहे? सगळ्या कलाकृतींना, मग ते लेखन असो की चित्र की शिल्प, एक स्थापत्य असतंय!! तू ते तुझ्या लेखात सांभाळलंय! म्हनून तर मी चित्र द्यायाला तयार झालो..."

"थँक्यू सर!" मी भारावून गेलो होतो.
" ते ठीक! पन मला एक सांग!" सरांचा चेहरा पुन्हा मिश्किल झाला होता....
"तू माझ्याकडे चित्रासाठी का आलास? त्या राजकन्येकडे गेला असतास तर तुला अगदी पेस्टल किंवा आइलपेंट मिळालं आसतं की!!" त्यांचा घाटगे मॅडमच्या विषयीचा उपरोध माझ्या लक्षांत आला....
"हो सर मिळालं असतं! पण हे भाव कसे मिळाले असते? काय कला ठेवलीय देवानं तुमच्या बोटांत!"

मला वाटलं सर प्रसन्न होतील, पण ते उदास झाले....

"आरे काय उपयोग! कला काय जाळायची? शेवटी आम्ही गावकुसाबाहेरचे!! हिते तरी मुंबईत आम्हाला बरोबरीची वागनूक मिळतेय काय! अरे किती सोसायचं या जातीपायी!!'
"असं कसं म्हणता सर! देव कला बोटात देतांना काय जात बघुन देतो का?"

सरांचे डोळे अगदी टचकन अश्रूंनी भरले....

"अरे देव असं समजत नाही, तुम्ही पोरं असं मानत नाही, मग आमच्या पिढीलाच काय धाड भरलीय रं....."

मला काय बोलावं ते सुचेना! मग त्यांनीच स्वतःला सावरलं!!

" आसो! देवाला समजतंय! तुम्हाला पोरांना समजतंय!! आता अगदी भटा-बामनाचा पोरगा तू! पन तुझे विचार वेगळे हायेत, पुढारलेले हायेत!!! चांगलं हाय! आमी एक भोगलं ते भोगलं, पन तुझ्यासारखा विचार करणारी पुढची पिढी असंल तं आमाला जे भोगावं लागलं ते आमच्या मुला-नातवंडांना तरी नाई भोगावं लागनार!"

सर डोळे पुशीत समाधानाने म्हणाले.......

मला पण खूप खूप आनंद झाला असता हो......

जर गावित सरांचे शब्द खरे ठरले असते तर.........

No comments: