Friday, May 23, 2008

गावित मास्तर

"आपलं हस्तलिखित आता चांगलं तयार होत आलंय! तू बरेच श्रम घेतलेले दिसताहेत" आमचे मराठीचे देशमुख सर मला म्हणत होते...
"होय सर! कथा, लेख, कविता सगळं जमलंय. आता मुखपृष्ठ ठरलं की झालं"
"आणि तुझं संपादकीय?"
"ते सुद्धा पुरं होत आलंय"
"बरं, मुखपृष्ठाचं काय करणार?"
"गावित मास्तरांनी काढलेलं एखादं चित्र टाकावं म्हणतोय" मी
"तुला वाटतं तो चित्र काढून देईल?"
"विचारायला तर काय हरकत आहे"
"असं म्हणतोस? ठीक आहे, बघ विचारून! पण सांभाळून हो, दुर्वास आहे तो!!"

मला हसू आलं. देशमुख सरांनीही स्मित केलं आणि मला प्रेमळपणे म्हणाले,

"तुला अगदीच मारायला उठला तर माझं नांव सांग! मी विचारायला सांगितलं होतं म्हणुन सांग"

मी मान डोलावली. आता गावित मास्तरांशी कसं आणि काय बोलायचं याचा मनाशीच विचार करू लागलो...

माझ्या शालेय जीवनात मला अनेक शिक्षक मिळाले. काही चांगले काही वाईट! गावित मास्तर त्यातीलच एक! ते काही गणित, विज्ञान, इतिहास वा भूगोल शिकवणारे मास्तर नव्हते. किंबहुना आमच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इंग्रजी व्यवस्थित न येणारे ते एकमात्र शिक्षक असावेत. त्यांचा मुख्य विषय चित्रकला! जोडीला ते आमच्या पीटीच्या शिक्षकांनाही मदत करीत. कदाचित नुसती चित्रकला शिकवून त्यांचे कामाचे तास पूर्ण भरत नसावेत म्हणून त्यांच्यावर आणखी पीटी शिकवण्याची सक्ती असावी. आमची शाळा दोन सत्रात होती तेंव्हा एका सत्राला गावित मास्तर आणि दुसर्‍या सत्राला घाटगे नांवाच्या एक मॅडम होत्या. होय, मॅडमच!! त्यांना शिक्षिका म्हटलेले मुळीच आवडायचे नाही. त्या नोकरी तरी कशासाठी करत होत्या देव जाणे. त्यांचे पती गावातील अत्यंत यशस्वी डॉक्टर होते. स्वत:ची गाडी सोडायला आणि न्यायला येणार्‍या आमच्या शाळेतील या एकमेव व्यक्ती!! एरवी आमचे प्रिन्सिपलसुद्धा रेल्वे स्टेशनवर उतरले की वन्-टू, वन्-टू करत चालत यायचे आणि जायचे!!

गावित मास्तर मात्र पीटी शिकवत असले तरी त्यांचा जीव त्यात रमत नसे. त्यांची आवड म्हणजे चित्रकला. ते चित्रे फारच सफाईने काढत. पण भलतेच कडक!त्यांना डोक्यात राख घालून घ्यायला वेळ लागत नसे. एकदा मला चांगले आठवते. कैलास लेणे अजिंठ्याला आहे की वेरूळला याचे बरोबर उत्तर देता न आल्याने त्यांनी चिडून जाऊन आम्हा सातवीतल्या सगळ्या मुलांना सटासट छड्या मारल्या होत्या. आता सातवीतली मुलं आम्ही, त्यातही मुंबईतच जन्मलेली आणि वाढलेली! आम्हाला अजिंठा-वेरूळला लेणी आहेत हे ऐकून माहित होते पण कुठे नक्की काय आहे ते कुठे आठवत होते? माझी तर त्याकाळी समजूत मराठवाडा म्हणजे शिवाजीचा कुठलातरी बंगला असावा अशीच होती!! शिवाजीमुळेच मराठे या शब्दाचा परिचय होता आणि वाडा म्हणजे मोठा बंगला हे माहिती होतं!! जसा लालमहाल, तसा मराठवाडा!!! आता वाटतं की नशीब माझं की मी हे त्यावेळी कुठे बोलून दाखवलं नाही. नाहीतर साफ पिटला गेलो असतो.....

मी आता दहावीत असलो तरी हा पूर्वीचा प्रसंग आठवून जरा काळजीतच होतो. हळूच टिचर्स-रूममध्ये गेलो. गावित मास्तर एका कोपर्‍यात बसले होते, पेपर वाचत होते. पाच सव्वापाच फूट उंची, काळा वर्ण, आणि अत्यंत किडकिडीत शरिरयष्टी! मुलांना मारायला इतका जोर त्यांच्या अंगात कुठून यायचा देव जाणे!! डोक्यावर केसांची चहासाखर झालेली! बारीक कोरलेली अणकुचीदार मिशी, रमेश देव स्टाईल!! अंगात मळखाऊ रंगाची, कॉटनचीच, शर्ट आणि पॅन्ट! नाकावर जस्ती काड्यांचा चश्मा!!

मी त्यांच्याजवळ जाउन हळूच हाक मारली.

"सर"
"काय आहे?" वाचनात व्यत्यय आल्याने वैतागलेला स्वर...
"नाही सर, आम्ही ते शाळेचं हस्तलिखित तयार करतोय, सगळं होत आलंय, तेंव्हा जरा मुखपृष्ठासाठी तुम्ही काढलेलं एखादं चित्र जर वापरता आलं तर....."
"हस्तलिखित? म्हणजे मराठीत दिसतंय!"
"होय सर, तुम्ही कसं ओळखलंत?"
"त्यात काय कठीन आहे? अरे इंग्रजी असतं तर शाळेनं छापलं नसतं का? मराठी आहे म्हणुनच हस्तालिखित! मराठीवर कशाला पैसा खर्च करतील हे लोक!"

मी काहीच बोललो नाही. मग मास्तरच म्हणाले,

"ठीक आहे, आनून टाक तुझं हस्तलिखित इथे"
"सर आम्हाला फक्त चित्र हवंय, हस्तलिखित कशाला आणून टाकू?"
"अरे गाढवा! मला ते वाचून बघितलं पायजेल ना! त्याशिवाय चित्रासाठी विषय कसा निवडनार? का हेमामालिनीचं चित्रं काढून हवेय तुला?" मास्तर वैतागले...

मी मनांत म्ह्टलं की मास्तर जर खरंच हेमामालिनीचं चित्र काढून देतील तर काय बहार येईल! आपलं वार्षिक सॉलिड पॉप्युलर होईल!! फार काय, शाळा मॅनेजमेंट मग ते छापेलसुद्धा!! पण तसं बोललो असतो तर तिथेच मुस्काटीत खावी लागली असती...

मी दुसर्‍या दिवशी सकाळी ते हस्तलिखित मास्तरांना नेऊन दिलं. शाळा सुटायच्या आधी मास्तरांनी माझ्यासाठी वर्गात निरोप धाडला की मला बोलावलंय! मी घाबरतच टिचर्स रूममध्ये गेलो. मास्तर टेबलाशी हस्तलिखित पसरून बसले होते. मला बघताच म्हणाले,

"काय हो अतिशहाने, यांत तुम्ही काय लिहिलंय?"
"सर ती एक कथा लिहिली आहे..."
"अरे पण संपादक ना तू? मग तुझं संपादकीय कुठंय?"
"सर, ते मी अजून लिहीतोय, पूर्ण नाही झालं..."
"मग लवकर लिहून आनून दे. त्याच्याशिवाय मी हात लावणार नाही कशाला..."

मी त्या रात्री बसून माझं संपादकीय पूर्ण केलं. विषय मला वाटतं की "मराठी संस्कृतीमध्ये लोककलांचे स्थान" असा काहीतरी होता. मी रात्री जागून अभ्यास करतोय असा समज होऊन आईवडिलही खूष झाले....

दुसर्‍या दिवशी जाऊन मी ते संपादकीय गावित सरांना नेऊन दिलं. त्यांनी माझ्यासमोरच ते वाचलं...

"सर कसं आहे?"
"ते मला काय ठाऊक? मी काय मराठीचा मास्तर आहे? आता पुढल्या सोमवारी साडेदहा वाजता मला भेट इथेच!"
"म्हणजे सर तुम्ही नक्की चित्र काढणार ना!"
"अरे नायतर काय शेन्या थापायला बोलवून र्‍ह्यायलोय का तुला? चल फूट आता, हकाल गाडी!"

मला अतिशय आनंद झाला. त्या आनंदात तिथून "फुटायला" ही मला काही वाटलं नाही...

पुढल्या सोमवार पर्यंत मला नुसता धीर निघत नव्हता. कसाबसा साडेदहा वाजेपर्यंत थांबलो आणि गावित मास्तरांना भेटायला टीचर्स रूम कडे धाव घेतली....

मास्तर टेबलाशी बसले होते. मला पाहताच उठले आणि म्हणाले,

"चल माझ्याबरोबर"

आमच्या शाळेत ड्रॉइंगच्या तासासाठी निराळी खोली होती. तिथे निरनिराळी चित्रं लावली होती, तिथली बाकंसुद्धा जास्त लांबरूंद वगैरे.... आम्ही तिथे गेलो.

"सर चित्र झालं तयार?"
"नाय, मनाजोगतं झालं नाय म्हनून फाडून टाकलं" मला प्रथमच एक सरळ उत्तर मिळालं. पण असं उत्तर, की माझी त्यामुळे खूप निराशा झाली...
"मग आता काय?" मी
"आता काय! चल बस हितं! मास्तर एका पांढराशुभ्र कागद लावलेल्या फलकाशी बसले. मला त्यांनी समोर बसवलं. माझ्या हातात एक कागद दिला. स्वतःच्या हातात एक कोळसा घेतला आणि मला म्हणाले,
"हे घ्ये तुझं ते संपादकीय आनि वाच मोठ्यानं"

मी भारावल्यागत त्यांच्याकडून तो कागद घेतला आणि मोठयाने सावकाश ते संपादकीय वाचायला सुरवात केली. त्याबरोबर गावितमास्तरांनी कागदावर कोळसा ओढायला सुरवात केली...

मला ते काय काढतायत ते बघायची अतीव इच्छा होती. मी वाचन थांबवून त्यांच्या फलकाकडे नजर टाकायचा प्रयत्न केला.....

"हात् भोस*च्या! थांबू नगंस!" मास्तर कडाडले......

ते जरी कडक असले तरी त्यांचा हा आवाज मी यापूर्वी कधीच ऐकला नव्हता. मी घाबरून पुढे वाचत राहिलो....

संपादकीय वाचून संपलं....

मास्तर समाधीत बुडालेले! हाताने फराफर रेघोट्या मारत होते!!! हाताला जरा विश्रांती नव्हती.....

मी थोडा वेळ तेच नुसता पहात राहिलो...

नंतर केवळ उत्सुकतेपोटी उठलो आणि त्यांच्या माराच्या टप्प्यात येणार नाही असं बघून त्याच्या पाठीशी जाऊन त्यांनी काय रेखाटलंय ते पाहू लागलो.....

पाह्तो तर काय!!!!

गावित सरांनी नुसत्या कोळश्याने समोरच्या फलकावर दोन रेखाकृती रेखाटल्या होत्या....

एक होती पवाडा गाण्यार्‍या शाहिराची!! अगदी मर्‍हाट्मोळा पोशाख! डफ आणि फेट्यासकट!! आणि चेहर्‍यावर अगदी बाबासाहेब पुरंदर्‍यांचा आवेश!!!

दुसरी होती नऊवारी नेसलेल्या, बोटांत पदर उंचावलेल्या मराठमोळ्या तमाशा नर्तिकेची!! चेहरा वेगळा होता पण भाव अगदी जयश्री गडकरच्या "बुगडी माझी सांडली ग!" मधला!!!!

"सर काय मस्त आहे हो!!" माराची पर्वा न करता माझ्या नकळत माझ्या तोंडून शब्द बाहेर पडले...
"तुझ्या संपादकीयाशी जुळतंय का नाय!"
"ते तर आहेच सर! पण नुसतं चित्र म्हणुनही किती सुंदर आहे!!!"
"मला वाटलंच!" सर समाधानाने म्हणाले, "तुला हवं असेल तर यात रंग भरून देईन!"
"नको, नको! रंग नको!!! तपशील नुसता कोळश्यानेच भरा....."
"आनि तुझ्या त्या देशमुख मास्तराच्या मनाला नाही आलं तर?" सर मिश्किलपणे म्हणाले....
"नाही आलं तर नाही आलं!! त्यांना सांगीन की मला आधी संपादक म्हणून काढून टाका आणि नंतर हिंमत असेल तर स्वतः या चित्रात साजेसे रंग भरा!!!"

"शाबास! पोरा, शाबास!!" सरांच्या तोंडून कधी नव्हे हे ती मी प्रशंसा ऐकली...

"अरे म्हनून तर मी तुझं संपादकीय वाचायला मागितलं! तू बरं लिवतोस!! विचार करुन शब्द निवडतोस!! अरे लेखन ही पन एक कलाच नाय का? आनि कुठल्याही कलेचं असंच असतंय!! जिथे सुरवात पाहिजे तिथे सुरवात आनि जिथं शेवट पाहिजे तिथे शेवट!! अरे उगाच आलं मनात आनि काढलं कागदावर उतरवून, त्याला काय अर्थ आहे? सगळ्या कलाकृतींना, मग ते लेखन असो की चित्र की शिल्प, एक स्थापत्य असतंय!! तू ते तुझ्या लेखात सांभाळलंय! म्हनून तर मी चित्र द्यायाला तयार झालो..."

"थँक्यू सर!" मी भारावून गेलो होतो.
" ते ठीक! पन मला एक सांग!" सरांचा चेहरा पुन्हा मिश्किल झाला होता....
"तू माझ्याकडे चित्रासाठी का आलास? त्या राजकन्येकडे गेला असतास तर तुला अगदी पेस्टल किंवा आइलपेंट मिळालं आसतं की!!" त्यांचा घाटगे मॅडमच्या विषयीचा उपरोध माझ्या लक्षांत आला....
"हो सर मिळालं असतं! पण हे भाव कसे मिळाले असते? काय कला ठेवलीय देवानं तुमच्या बोटांत!"

मला वाटलं सर प्रसन्न होतील, पण ते उदास झाले....

"आरे काय उपयोग! कला काय जाळायची? शेवटी आम्ही गावकुसाबाहेरचे!! हिते तरी मुंबईत आम्हाला बरोबरीची वागनूक मिळतेय काय! अरे किती सोसायचं या जातीपायी!!'
"असं कसं म्हणता सर! देव कला बोटात देतांना काय जात बघुन देतो का?"

सरांचे डोळे अगदी टचकन अश्रूंनी भरले....

"अरे देव असं समजत नाही, तुम्ही पोरं असं मानत नाही, मग आमच्या पिढीलाच काय धाड भरलीय रं....."

मला काय बोलावं ते सुचेना! मग त्यांनीच स्वतःला सावरलं!!

" आसो! देवाला समजतंय! तुम्हाला पोरांना समजतंय!! आता अगदी भटा-बामनाचा पोरगा तू! पन तुझे विचार वेगळे हायेत, पुढारलेले हायेत!!! चांगलं हाय! आमी एक भोगलं ते भोगलं, पन तुझ्यासारखा विचार करणारी पुढची पिढी असंल तं आमाला जे भोगावं लागलं ते आमच्या मुला-नातवंडांना तरी नाई भोगावं लागनार!"

सर डोळे पुशीत समाधानाने म्हणाले.......

मला पण खूप खूप आनंद झाला असता हो......

जर गावित सरांचे शब्द खरे ठरले असते तर.........

Wednesday, May 7, 2008

अब्दुल खान - ४

एका शनिवारी रात्री जेवण वगैरे आटोपून आम्ही आपापल्या खोल्यांत गेलो होतो. मी पलंगावर पडून काहीतरी वाचत होतो. बर्‍याच वेळाने खानची हाक आली,

"अरे सुलेश, जागे हो की सो गये?"
"क्या है खानसाब?"
"जरा इधर आना तो!"

मी त्याच्या खोलीत गेलो. बघतो तो जमिनीवर खोलीभर कागद पसरलेले आणि हा त्यामधे बसलेला. त्याच्या हातात एक फॉर्म होता.

"जरा ये पढकर मीनिंग बताना तो, ये पॉईंट मेरी समझमें नही आ रहा के क्या पूछा है!"
मी तो फॉर्म हातात घेऊन वाचला. बघतो तो न्यूयॉर्क मेडिकल बोर्डाच्या लेखी परीक्षेचा ऍप्लीकेशन!
"खानसाब ये आपके पास कैसे?" माझं आश्चर्य.
"कैसे मतलब? मुझे एक्झाम लेनी है लेकिन ये ससुरे ऍप्लिकेशनमें ये पॉईंट समझमें नही आ रहा की उनको क्या इन्फर्मेशन चाहिये!"
"आप ये एक्झाम लेंगे? लेकिन ये तो डॉक्टर लोगोंके लिये है. आप कैसे लेंगे?"

बाहेरच्या देशांतील डॉक्टरांना अमेरिकेत प्रॅक्टिस/ हॉस्पिटलांत नोकरी करण्याआधी इथे रेसिडेन्सी करावी लागते. त्या रेसिडेन्सीत प्रवेश मिळवण्याआधी ही अतिशय अवघड परीक्षा पास व्हावी लागते.

"कैसे का क्या मतलब? डॉक्टर हूं इसलिये!"
"आप और डॉक्टर?' माझ्या आश्चर्याचा कडेलोटच झाला.
"अबे नही तो फिर क्या कसाई दिखता हूं?" तो वैतागला.
"तो फिर आपका रातका बाहर जाना...."
"अरे वो टेंपररी जॉब है मेरा. रातको वह जॉब करता हूं इसलिये दिनमें थोडीबहुत पढाई कर पाता हूं"
"अच्छा?"
"तो तुम्हें क्या लगा, रातको मैं रंडियां घुमाने जाता हूं? अरे मॅनहॅटनके एक बँकमें सिक्युरीटीमें हूं मैं!"

मी त्याच्याकडे बघत राहिलो. माझ्या डोळ्यांतला अविश्वास त्याने ओळखला.

"अरे ये देखो, ये मेडिकल डिग्री है मेरी!" त्याने एक जुना कागद काढून माझ्या हातात दिला. पाहतो तर खरंच पाकिस्तानातल्या एका मिलीटरी मेडिकल कॉलेजचं सर्टिफिकेट! त्यावर इंगजीत अब्दुल खानचं नांव!!

"खानसाब, आप मिलीटरी डॉक्टर हैं?" मी उभ्या आयुष्यात इतका आश्चर्यचकित कधी झालो नव्हतो!!
"है नही, था!" मग त्याने त्याची कथा सांगितली.

अब्दुल खानचा जन्म पेशावरजवळचा. त्याचे आजोबा आणि वडील वस्तीचे प्रमुख होते, लष्करात काम केलेले होते. त्याच्या आजोबांनी खान अब्दुल गफ्फारखानांच्या विचारांनी प्रभावित होऊन याला फॅमिली-व्यवसायांत न गुंतवता डॉक्टर करायचं ठरवलं. पठाणांच्या शिरस्त्याप्रमाणे हा लष्करात भरती झाला आणि स्वतःच्या हुशारीवर मिलीटरी मेडिकल कॉलेजमधून डॉक्टर झाला.

"तुम्हें पता है, मैं एक फेमस पोलिटिकल लीडरके मेडिकल पॅनलपर था."
"तो फिर?"
"बादमें कू-डे-टा हुआ और मिलीटरीने टेक-ओव्हर कर लिया. उस लीडरको मारा दिया गया. उसके सब नजदिकी लोगोंको हॅरेसमेंट शुरू हुयी. हम सब तितरबितर हो गये"

आता मला तो लीडर कोण असेल याचा जरासा अंदाज आला.

"लेकिन खानसाब, आप तो मिलीटरीमेंही थे, फिर आपकोही हरासमेंट कैसे हुयी?"
"तू तो बच्चा है, सुलेश! अरे मेरी नौकरी फौजमें थी इसका मतलब ये नही के मैं ऑटोमेटिकली डिक्टेटरशिप फेवर करता हूं. हम डेमॉक्रसी चाहते है इसलिये तो उस लीडर के साथ थे. आर्मीमें ये बात पता थी. उसमेंभी नयी रेजीम को शरियत का अंमल चलाना था. हम तो मजहब को पर्सनल मॅटर समझते है. बस, हम अनवेलकम हो गये. बडी मुश्कीलसे मैं वहांसे जान बचाकर भागा और लंडन जा पहुंचा. वहांसे पोलिटिकल असायलम लेके अमरिका आया. तभीसे इस न्यूयॉर्कमें हूं."
"और आपका नाईटजॉब?"
"हां! एक्स-आर्मी होनेसे यहां सिक्युरिटीने जॉब मिला. मिलीटरी ट्रेनिंग थी ना मेरे पास! सोचा, ये तो टेंपररी है, अपने मेडिकल पेशेमें काम मिलनेतक करूंगा!! बादमें पता चला की यहां इम्तहान लेनी पडती है और वह बहुत डिफिकल्ट है. इसलिये नाईटड्यूटी मांगकर ले ली. तभीसे रातको काम करके दिनमें जितनी हो सके पढाई कर लेता हूं."
"आपका और कोई रिलेटिव्ह है?"
"अरे हां फिर! पाकिस्तानमें मेरी औलाद है, एक बेटा और एक बेटी! ये देखो..." त्याने एक फोटो दाखवला. फोटोत दोन गोड मुलं आणि एक स्त्री होती.

"वह इन बच्चोंकी अम्मी, मेरी बीवी!" त्याचा आवाज कापरा झाला होता.
"अब बच्चे कहां है?"
"उनके चाचा चाचीके साथ सब रहते है पाकिस्तानमें. बच्चोंके इमिग्रेशनके पेपर्स फाईल कर दिये है. इव्हेंच्युअली यहां आ जायेंगे. बहुत होशियार और समझदार है मेरे बच्चे!!" डोळ्यातलं पाणी रोखायचा आटोकाट प्रयत्न करत तो लढवय्या म्हणाला.

"और उनकी अम्मी?"
"उनका यहां आना मुनासिफ नही! क्या बताऊं सुलेश, उसकी वजहसे मुझे कितनी तकलीफ हुयी!!
"तकलीफ?"
"हां, अरे घरकी प्रायव्हेट बातेंभी सब सीआयडीको मालूम हुआ करती थी. उसके लिये तो शौहरसेभी ज्यादा शरियत बडी है." त्याचा चेहरा विचित्र भेसूर दिसत होता...

"एक आर्मी अफसर मैं, लेकिन अपने खुदके घरकोभी फॅनेटिझमसे नही बचा सका. जबसे पाकिस्तान छोडा है, उससे बात तक नही की. बच्चे वहां अटके पडे है इसलिये चुप हूं. वे एक बार यहां सेफ आ जायें तो फिर ये झमेलाही खत्म कर दूंगा."

मी ऐकत होतो...

"उस दिन तुम पूछ रहे थे की मैं शबनमसे शादी क्यों नही कर लेता? लेकिन मेरे बच्चोंके इजाजत के बिना मैं ये शादी कैसे कर सकता हूं? वे इतने नन्हें तो नही है, उन्हे अब सब समझता है. अपनी अम्मीकी वजहसे अपने अब्बाको कितनी तकलिफोंका सामना करना पडा, वे सब जानते है. उनका डॉक्टर अब्बा, जिसके आगे-पीछे इंटर्नस-नर्सेस चला करते थे आज एक सिक्युरिटीका काम कर रहा है, यह जानकर उन्हें बहुत अफसोस होता है. दे क्राय ऑन द फोन एव्हरी टाईम!!"

आता तो आपले अश्रू थांबवू शकला नाही....

"जब वे यहां आ जायेंगे, शबनमसे मिल लेंगे तब अगर उन्हें पसंद होगा तो ही मैं ये शादी कर लुंगा. शबनमको यह सब पता है और उसका कोई ऑब्जेक्शन नही है. तब हमारे तीन बच्चे होंगे, मेरे दो और शबनमका एक."

"इन्शाल्ला खानसाब, जरूर होंगे!!" माझ्याही डोळ्यांतून अश्रू ओघळले...

या पठाणाचं एक निराळंच रूप मी पहात होतो. एका अपत्यविरहाने विव्हल झालेल्या बापाचं कोमल, वत्सल रूप!!

माझा पठाणांच्या कठोरतेविषयीचा शेवटला पूर्वग्रहही गळून पडला होता.

....

आणि एक दिवस माझा न्यूयॉर्कमधला अंमल संपला. माझी इंटर्नशिप पूर्ण झाली होती. मला अटलांटाला कायम स्वरुपाची नोकरीही मिळाली. न्यूयॉर्क आणि अटलांटा! शेकडो मैलांचं अंतर!! मी जाणार म्हणून अब्दुल खान, शबनम आणि त्यांच्या पाकिस्तानी मित्रांनी मला मेजवानी दिली. आपापल्या घरून त्यांनी वेगवेगळ्या पाकिस्तानी खास डिशेस करून आणल्या होत्या. अब्दुल खानने न्यूजर्सीतून कुठूनतरी गोट-मीट (बकर्‍याचं मटण) मिळवलं होतं आणि शबनमने ते शिजवलं होतं. त्यांनी आणि त्यांच्या मित्रांनी माझ्यासाठी भेटवस्तूही आणल्या होत्या...

पार्टी संपल्यावर मी माझं सामान बांधू लागलो आणि माझ्या लक्षांत आलं की त्या सगळ्या भेटवस्तू माझ्या बॅगांत मावणं अशक्य होतं. मी त्या तिथेच खानकडे सोडून जायचा विचार केला आणि त्याला तसं सांगितलं.

"अरे नही, नही! ऐसा करो, तुम जब अटलांटामें तुम्हारा अपार्ट्मेंट वगैरा लेके सेटल हो जाओगे तब मुझे ऍड्रेस दे देना. मैं तुम्हें ये सब शिप करूंगा" खान.

मला वाटलं उगाच कशाला त्याला त्रास? पण तो काही ऐकून घेईना!!

यथावकाश मी अटलांटाला येऊन सेटल झालो. नोकरी सुरू झाली. महिन्याभरांत अब्दुल खानबरोबर चार-पाच वेळा फोन झाले. मी सेटल झालेला ऐकून त्याला बरं वाटलं असावं असं मला जाणवलं.

एके दिवशी मी कामावरून संध्याकाळी घरी आलो. पहातो तर दरवाजावर युनायटेड पार्सल सर्व्हिस (यूपीएस) ची चिठ्ठी चिटकवलेली!

"तुमच्या नांवे पार्सल आलेले आहे, पण खूप जड असल्याने डिलीव्हर करता येत नाही तेंव्हा खालील पत्त्यावरच्या ऑफिसातून पिक-अप करा..."

मी दुसर्‍या दिवशी कामावरून सुटल्यावर त्या ऑफिसात गेलो. पाहतो तर माझ्या नांवे खरंच एक भला मोठा बॉक्स आला होता. प्रेषक म्हणून अब्दुल खानचं नांव होतं. पण बॉक्स खरोखरच खूप जड होता. इतका, की मला तो गाडीत ठेवायला त्या ऑफिसातल्या माणसांची मदत घ्यावी लागली. बॉक्स घेऊन मी घरी आलो. मला एकट्याला तो उचलून घरात नेणं शक्यच नव्हतं. मी गाडीतच तो उघडला आणि एक-एक वस्तू काढून घरात नेऊ लागलो. तरी बॉक्स काही विशेष हलका होईना!! करता-करता मी बॉक्सच्या तळाशी हात घातला.

बघतो तर तळाशी तांदळाची वीस पौंडांची पिशवी!! या पठ्ठ्याने मला किंमतीच्या दुप्पट पोस्टेज भरून वीस पौंड तांदूळ पाठवला होता. सोबत त्याची चिठ्ठी होती. मी चिठ्ठी वाचत होतो...

वाचतांना माझ्या ओठावर हसू फुटत होतं पण डोळे मात्र टचकन पाण्याने भरले होते...

"डियर सुलेश! तुम अपनी नयी जिंदगी शुरू कर रहे हो. बहुतसी कठिनाईयोंका सामना करना पडेगा और तुम्हें ताकद की जरूरत पडेगी. इसलिये तुम्हारे इंडियन राईससे बेहतर खास इंडस बासमती राईस भेज रहा हूं. बिल्कुल डरना नही, इन्शाल्ला, सब ठीक हो जायेगा...."

(संपूर्ण)

टीपः या कथेतील व्यक्तिरेखा व प्रसंग काल्पनिक आहेत. कुणा हयात वा मृत व्यक्तीशी साधर्म्य आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा. सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन.

Thursday, May 1, 2008

अब्दुल खान - ३

एकदा काय झालं...
एका रविवारी दुपारी इक्बाल मला भेटायला आला होता. अब्दुल खान कुठेतरी बाहेर गेला होता. आम्ही व्हिडिओवर एक हिन्दी फिल्म लावून बसलो होतो. पिक्चर यथातथाच होता. आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करून गप्पा मारण्यात रंगलो होतो....

अचानक घराचा दरवाजा उघडून अब्दुल खान आत आला. इक्बालचं आणि त्याचं नेहमीचं सलाम आलेकुम झालं.

"क्या चल रहा है मियां?"
"कुछ नही, बस गप्पे लडा रहे है!" इक्बाल
अब्दुल खानने थोडावेळ टीव्हीकडे पाहिलं....
"ये क्या बकवास देख रहे हो? कुछ अच्छे जीनत अमानके गाने लगावो यार!!"

हे त्याचं आणखी एक वेड होतं. त्याला सगळ्या भारतीय नट्यांमध्ये झीनत अमान विलक्षण आवडायची!!!

"ए इक्बाल, उठ!! जरा नीचे जा और कोनेवाले उस सिंधीके दुकानसे जीनत के गानेवा़ली कॅसेट लेके आ!! और देख, साथमें समोसे और जलेबी भी लेके आ, ये ले पैसे!!"
"तू आयेगा मेरे साथ?" इक्बालने मला विचारले....
"अबे कराचीके सांईं! सुलेशको बैठने दे यहां!! वो कोनेवाला और तुम, दोनो सिंधी हो इसलिये तुम्हें भेज रहा हूं! जितना जी चाहे बार्गेनिंग करो. हम दोनो वॉरियर्सको बैठने दो यहां!" आज त्याचा खोड्या काढायचाच मूड होता...
"तू वापस आयें तभीतक हम ड्रिंक्स बनाकर तय्यार रखते है! चलो, आज पार्टी करेंगे....."

मला 'तू जर पार्ट्या करणार असशील तर जागा मिळणार नाही' असे अगोदर खडसावणारा अब्दुल खान स्वतःच म्हणत होता...

मी त्याला त्याच्या झीनत अमानच्या वेडाबद्द्ल विचारायचं ठरवलं. खरंतर झीनत तेंव्हा खूप फेमस होती. सत्यं, शिवं, सुंदरम वगैरे!!! पण म्हणून काय झालं?
"खानसाब, मुझे एक बात सच सच बताओ, आपको झीनत अमान इतनी पसंद क्यों है? वो तो क्रॉस-आईड है!! मुझे बिल्कुल समझमें नही आता की उसमें आप इतना क्या देखते है?'
"अबे उल्लूके पठ्ठे!!" इक्बाल गेल्याची खात्री करून घेउन तो म्हणाला, "उसकी आंखोसे हमें क्या लेना देना? अरे, उसका जिस्म देख जिस्म!! आंखोको लेकर क्या करेगा तू? वैसेभी ऐन मौकेपर तो जिस्म्ही काम आता है ना!!!"

मी सर्द्च झालो. पुढे विषय वाढवला नाही पण त्याच्या परिपक्व रसिकतेला मनातल्या मनात दाद दिली. मनातल्या मनातच फक्त, कारण माझ्या पांढरपेशा मनाला मोठयाने दाद देण्याची लाज वाटली. स्त्रीया आणि नातेसंबंध याबाबत त्याचे विचार अगदी वेगळे होते. जसजशी आमची मैत्री वाढली तसतसे मला ते कळत गेले आणि प्रत्येक वेळी मी अचंबित होत गेलो...

एकदा क्लायंट वेळेवर न पोहोचू शकल्याने माझी एक मोठी मीटींग रद्द झाली. चला, लवकर सुटका झाली म्हणून मी आनंदातच घरी आलो. चार-साडेचारचा सुमार असेल. घरी येऊन लॅच मध्ये चावी फिरवली तरी दरवाजा उघडेना! आतून बोल्ट घालून दार बंद करण्यात आलं होतं. मला आश्चर्य वाटलं. आम्ही बोल्ट कधीच लावत नसू. दोघांकडेही चावी असल्याने त्याची आवश्यकताच कधी भासली नव्हती. मी दरवाजा ठोठावला, उत्तर नाही! पुनः पुनः दरवाजा ठोठावल्यावर अब्दुल खानचा आवाज आला,

"गो अवे!"
"खानसाब, मै सुलेश हूं!"
"अच्छा, ठहरो एक मिनट!"

तब्बल पाच मिनिटांनी दरवाजा उघडला. दरवाजात अब्दुल खान उभा! उघडाबंब, कमरेला फक्त एक लुंगी गुंडाळलेली!! काही न बोलता त्याने मला आत यायला वाट दिली. मी बूट-मोजे काढून फ्रेश व्हायला बाथरूमकडे वळलो तर बाथरूमचा दरवाजा बंद!

"माय फ्रेंड इज इनसाईड!" तो म्हणाला. माझी नजर परत मेन दरवाजाकडच्या जमिनीकडे वळली. तिथे लेडीज सॅन्डल्सची एक जोडी होती...

"ओके, आय विल युज इट लेटर" असे म्हणून मी माझ्या खोलीत गेलो. थोडया वेळाने बाथरूममधली ती पंजाबी ड्रेस घातलेली स्त्री बाहेर आली. तिचं आणि अब्दुलखानचं हलक्या आवाजात काहीतरी बोलणं झालं आणि ती गेली. हा विषय इथेच सोडायचा असं मी ठरवलं...

दोन्-तीन दिवसांनी आम्ही गप्पा मारत बसलो असतांना अचानक अब्दुल खानच म्हणाला,
"अरे सुलेश, तुमसे एक बात करनी थी! याद है, उस दिन तुम जल्दी आये तभी वो औरत आयी थी, मैने मेरी फ्रेंड करके बतायी..."
मी काहीच बोललो नाही..
"हालांकि वो फ्रेंड तो है, बट शी इज मोअर दॅन अ फ्रेंड!"
"पता है!" मी म्हणालो. तो आश्चर्याने उडालाच!
"क्या, क्या पता है तुम्हें?"
"दॅट शी इज मोअर दॅन युवर फ्रेंड"
"तुम्हें क्या मालूम? क्या तुम उसे जानते हो?" तो चक्रावला होता.
"उसे तो नही जानता, लेकिन खानसाब, आपको तो अब मैं जानता हूं!! अगर वो सिर्फ दोस्त होती तो आप उसके सामने बिना कुर्ता पहने हुए सिर्फ लुंगी लटकाये कभी नही बैठते! इतने शरीफ तो आपभी हो!!" मी डोळे मिचकावले.
"तुम तो शेरलॉक होम्सके बाप हो यार!" तो हसून उदगारला, "वो बीवी है मेरी!"
माझ्या चेहर्‍यावर मिश्किल हसू कायम होतं. तो थोडा ओशाळला...
"अरे वैसी शादीवाली बीवी नही! वो रखैल है मेरी! लेकिन रखैल कहना अच्छा नही लगता नं!"

म्हणजे त्याला ऍक्चुअली रखेली ठेवायला हरकत वाटत नव्हती पण तिला रखेली म्हणायला 'अच्छा नही लगता!!'

"खानसाब आपको यह सब मुझे कहने की कोई जरूरत नहीं. यू आर ऍन ऍडल्ट! यू डोन्ट नीड टू एक्सप्लेन एनीथिंग टू मी"
"अरे वो तो ठीक है. लेकिन तुम मेरे रूममेट हो. शायद आगेभी कभी उसदिन जैसी नौबत आ सकती है. तुम्हें ऑकवर्ड होगा, उसे ऑकवर्ड होगा, मुझे तो डबल ऑकवर्ड होगा! खामखा झंझट क्यूं? मैने बहुत सोचा और फिर फैसला किया किया तुम्हें साफ साफ बता देनाही अच्छा है, तुम समझ जाओगे!"
"ठीक है!"
"उसका नाम शबनम है. शादी होके पाकिस्तानसे यहां आयी. एक बच्चा होने के बाद उसके शौहरने तलाक दे दिया और दूसरे औरत के साथ रहने लगा. अकेली बच्चे के साथ रहती है. एक डिपार्टमेंटल स्टोअरमें काम करती है"

म्हणजे अगदीच नगरभवानी नव्हती तर! तिला नव्हता नवरा आणि याला नव्हती बायको! दोघे एकमेकांची गरज भागवत होते...

सिम्बियॉटिक जॉईंट व्हेंचर!! माझं ताजंताजं एम्.बी.ए. मनात बडबडलं!!

"तो फिर आप उससे शादी क्यों नही करते?"
"कॉम्प्लिकेशन है, कभी बताऊंगा बादमें"

त्यानंतर तो विषय तिथेच संपला. मला त्याचं वागणं जरी पसंत नव्हतं तरी त्याने मला विश्वासात घेण्याइतकं आपलं मानलं याचं मला बरं वाटलं! त्यानंतर शबनम मी घरी असतांना क्वचितच आली असेल. "हाय, हलो" यापुढे आमची कधीच बातचीत झाली नाही. खान मात्र मला कधी कधी शनिवारी रात्री मोकळेपणे सांगायचा,

"सुलेश, मैं जरा शबनमके यहां जा रहा हुं, वापस आनेको देर होगी" माझ्या चेहर्‍यावरचा संकोच त्याच्या लक्षात यायच्या आधीच तो दरवाजा बंद करुन जात असे.

एके दिवशी मात्र त्याने माझी साफ दांडी उडवली. मला म्हणाला,

"सुलेश, मै देख रहां हूं, यहांपर तुम्हारी कोई गर्लफ्रेंड तो है नही! ऑफिसमें कोई है क्या?"
"नही तो खानसाब!" माझा चेहरा लाजेने लाल झाला असावा.
"अरे इतना शरमानेकी जरूरत नहीं. मेराभी यही अंदाजा था! कैसे होगा रे तुम्हारा?'

मी काही न कळून त्याचाकडे पाहिले...

"मैं शबनमको कहूं, तुम्हारे लिये उसकी कोई सहेली ढुंढने?"

माझ्या डोळ्यांसमोर काजवे चमकले. मी सुद्धा रखेली ठेवू? तीही लग्नाआधीच? माझ्या डोळ्यापुढे भारतातले माझे आई-वडील उभे राहिले! त्यांना जर कळलं की आपल्या दिवट्या चिरंजीवांनी रखेली ठेवली आहे तर? वडील तर कानाखाली एक आवाजच काढतील. आणि आई? ती चुलीतलं जळतं लाकूड डागून माझा नेमका तोच अवयव निकामी करेल...

मी एकदम शहारलो. माझी ती विचित्र हालचाल पाहून अब्दुल खान म्हणाला,

"कोई बात नही, सोचकर बताना"

क्या सोचना, कपाळ!! तो मित्राच्या काळजीने सांगत होता हे मला कळत होतं पण आपल्या विश्वात ते इतकं भयंकर होतं की मला ते त्याला समजावून सांगताही आलं नसतं!!

मला नेहमी त्याच्या पूर्वेतिहासाबद्दल कुतुहल असायचं. हा कोण असेल, कुठे वाढला असेल, त्याला फॅमिली असेल काय! इथे न्यूयॉर्कमध्ये कसा आला?

आणि एक दिवस मला सगळं सगळं समजलं!! अब्दुल खाननेच सांगितलं!!

ती रात्र मी आयुष्यात कधीच विसरणार नाही.....



(क्रमशः)