Thursday, April 9, 2015

मराठी सिनेमा आणि प्राईम टाइम

गेल्या दोन तीन दिवसांत महाराष्ट्र सरकारने मराठी सिनेमा प्राईम टाईममध्ये दाखवण्यासाठी थिएट्रचालकांवर केलेल्या सक्तीची बातमी वाचली…
नंतर त्या संबंधात आलेल्या इतर बातम्या आणि एकंदर धुमशानही वाचलं….
एकंदरीत हा येडपटपणा किती प्रतलांवर चाललाय ते बघून हसावं की रडावं ते कळेना…
सर्वात प्रथम महाराष्ट्र सरकारला हा आदेश काढायची काय निकड आहे?  महाराष्ट्रातल्या सर्व समस्या संपल्या? की खरोखरच्या ज्वलंत समस्यांवर काही उपाय काढता येत नाहीत म्हणून हे काही कोस्मेटिक ब्यांडेज लावणं चाललंय?
बरं हा आदेश काढण्यापूर्वी महाराष्ट्रातल्या यच्चयावत थिएटर्समध्ये दररोज प्राईम टाईमला दाखवता येण्यासारखे नवीन मराठी चित्रपट आजच्या घडीला सतत उपलब्ध आहेत काय?
आता या आदेशाला असलेला बॉलीवूडवाल्यांचा विरोध मी समजू शकतो!  आपलं हक्काचं कुरण असं काढून घेतलं गेलं तर त्यांनी बोंब नाही मारायची तर काय करायचं? :)
पण कोण ती शोभा डे!  त्या बाईंच कर्तुत्व काय? त्या ना चित्रपट निर्मात्या की दिग्दर्शक की अभिनेत्री!
तरुणपणात काही मोडेलिंग केलं ही त्यांची पुण्याई!
मग अशा व्यक्तीने काही ट्वीईट केलं ते किती सिरियसली घ्यायचं याला काही सीमा आहे की नाही?
शिवसेनेने म्हणे तिच्या घरासमोर निदर्शने केली.   सेनेचं जाऊ द्या, सध्या जो मुद्दा मिळेल तो वापरायचा हा त्यांचा कार्यक्रम आहे.   त्याशिवाय सत्तेत सामील झाल्याचं पाप झाकायचं कसं?
पण दोन-तीन मराठी अग्रगण्य दैनिकांनी तिच्यावर आपले अग्रलेख वेस्ट करायचे, मराठी लोकांनी जिथे तिथे तिच्यावर चर्चा करायची हे आपल्याला भूषणावह खचितच नाही…
त्यापेक्षा म्हणा,
"गच्छ सूकर भद्रं ते!!!!"
आणि दुर्लक्ष करावे हे उत्तम!!! 

पुन:श्च हरिओम!

गेले काही वर्षे/ महिने इथे काहीच लिहिलं गेलं नाही माझ्याकडून!
काही लिहिण्याची इच्छाच होत नव्हती….
आता पुन्हा लिहायला सुरुवात करतोय…
पण आता या लिखाणाचं स्वरूप केवळ ललित नसेल.  जर काही नवीन ललित लिहावसं वाटलं तर ते लिहिनही…
पण यापुढच्या लेखनाचं स्वरूप हे मुख्यत: कोमेंटरीच्या स्वरूपातलं असेल.
आजही मी चार मराठी वर्तमानापत्रे वाचतो, आणि दोन मराठी संकेतस्थळांचा सभासद आहे.
तेंव्हा आपल्या मराठी माणसाच्या जीवनात ज्या काही समस्या/विसंगती आहेत त्यावर लिहिण्याचा हा एका प्रयत्न आहे आहे…
कुणाला विनोदी वाटेल, कारण तोच माझा प्रयत्न आहे; पण कुणाला अकारण खरचटल्यासारखं वाटेलही.
पण खरचटवणं हा माझा हेतू निश्चितच नाही.
बाकी,
लिहिणाऱ्याने लिहीत जावे,
कोण कसे अंगाला लावून घेत आहे याची चिंता करू नये…
:)

Monday, November 8, 2010

मागणं लई नाही!!!

प्रिय राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा,
तुमच्या भारतभेटीचे वृत्त (किंबहुना अती कवतिक!) भारतातील स्थनिक वर्तमानपत्रातून रोज वाचतो आहे.
हितली स्थानिक वृत्तपत्रे निवडणुक हरल्याबद्दल तुमची सालटी सोलून तुम्हाला वाळायला टांगत आहेत ती गोष्ट वेग़ळी!!

तसा तुमच्या आणि आमच्या मधून विस्तवही जात नाही. आम्ही जरी तुम्हाला किंवा डेव्हिड अ‍ॅक्सलरॉडला (आरारा, बुवा आडनांवात म्येला!!!) निषेधाची पत्रे पाठवली नसली तरी आम्ही तुमचे चाहते नाही हे निश्चित!!!

पण तुमच्या आणि मिशेलच्या सज्जनत्वाबद्दल आम्हाला जराही संशय नाही. आणि आपले मतभेद आहेत ते घरातल्या घरात!!! देशाबाहेर तुम्ही आमचे सुप्रीम कमांडर आणि म्हणून आपला हुकूम सर आंखोंपर!!!!
वयं पंचाधिकं शतम्!!

तर सध्या आपण भारतभेटीवर आहांत! नाय म्हंजे भारत ही आमची जन्मभूमी म्हणून तिच्याविषयी आम्हाला अतीव आत्मीयता हो!!!

पण बाकी तीस वर्षे मुंबयमध्ये राहूनही मणीभवन हे नक्की कुठे आहे हे आज पहिल्यांदा तुमच्याकडून कळलं!!!!
माटुंग्याचं मणीज रेस्टॉरंट एक माहिती होतं!!! तिथल्यासारखा वडासांबार (आणि फ्री चटणी!!) खुद्द वॉशिंग्टन डीसीमध्ये पण मिळत नाय, काय समजलेत!!

बाकी तुम्ही ताजमहाल हाटेलामध्ये निवास करायचं ठरवल्याबद्दल तुम्हाला अनेक धन्यवाद!
स्थानिक प्रेस तिथे किती लोकांना गैरसोय झाली वगैरे नाटकं करतेच आहे पण तिथे राहून तुम्ही पाकिस्तानी राज्यकर्त्यांना काय संदेश देताय हे बहुतेक मर्‍हाटी प्रेसच्या लक्षात आलेलं नाही....
सध्या पाकिस्तानला उघड उघड शत्रू म्हणुन संबोधणं अमेरिकेला गैरसोईचं आहे. पण प्रत्यक्ष न बोलून दाखवता हा संदेश देण्याची आयडिया मात्र झकास हो!!!

नायतर राजभवनाचा सुरक्षित किल्ला सोडून कोणता परदेशी राज्यकर्ता पाहुणा मुद्दाम वाट वाकडी करून फोर्टात ताजमहाल होटेलपर्यंत मरायला जातो!!! साली उगाच ट्राफिकची काशी!!!!

नाय पब्लिक चार पानपरागची दुकानं बंद करायला लागली म्हणून तक्रार करतंय!!! अवो तक्रार करणार्‍या पब्लिकला कधी फोर्टात जाऊन काही खरेदी करायला कधी परवडंत होतं? बायकोच्या लग्नाची अ‍ॅनिव्हर्सरी सुद्धा सेलेब्रेट करण्यात यांची मजल जास्तीत जास्त मामा काणेंपर्यंत!!! उगीच तिच्यायला नसती बोंबाबोंब!!!!

जाऊं द्या, तुम्ही दुर्लक्ष करा, कोणी नाय तरी आमचे आराराबा (तेच ते, छोटे मोठे हादसे वाले!!) तरी तुम्हाला धन्यवाद देतील......

पण मी नक्की सांगतो पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांना मात्र मेसेज मिळाला असणार हां!! मला जाकार्ताहून नुकतीच तशी ई-मेल आलीये!!! तुमचं उष्टं तिथे लवकरच सांडणार आहे म्हणे!!!


आणि तुमचं आणि मिशेलचं नाचणं बघून विंडियण पब्लिक तर लई खूश आहे. आहो उठसूठ अमेरिकेला शिव्या देणारे आमचे स्नेहीदेखील मिशेलच्या नाचण्यावर मात्र तुडूंब प्रसन्न!!!
नाय त्यांच्यावर राग धरू नका, त्याचं काय है,त्यांना मिशेल ओबामा काय किंवा सुरेखा पुणेकर काय, दोन्ही सारख्याच!!!! मिटक्या मारण्याशी मतलब!!! ;)

आणि हो, ते सेंट झेवियरला भेट दिल्याबद्दल अनेक धन्यवाद!!! नाय म्हणजे उगाच रुईया/रुपारेल वगैरे *** कालेजात जाउन टाईम वेष्ट न केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!! आणि झेवियरसारख्या भावी रिपब्लिकन (नायतर आम्ही कुठनं आलो? हीहीहीहीही!!!) निर्माण करणार्‍या कालेजात गेल्याबद्दल लईच धन्यवाद!! तिथल्या पोरांनी तुमची काशी केलेली पाह्यली आणि तुमचं माहिती नाही पण आमचे डोळे पाण्यानं डबडबले की हो!!!! आता तुम्हाला कळलं असेल की आमची मूळ खाण कोणती ते!!!! पण आता तिथे एक ड्रोन पाठवू नका म्हंजे झालं!!!!!

आता तुम्ही दिल्लीला जाल, राजघाटावर जाऊन ड्रामा कराल, भारतीय संसदेला थापा माराल!!
सगळं काही करा!!! ते तुमचं नशीब, आणि नशीब कोणाला चुकलंय!!!!

पण मात्र एक करा...

ते भारतीयांना ते आपलं वेदर बिनचूक प्रेडिक्ट करणारं सॉफ्टवेअर द्या हो.....
मागल्यावेळी त्या वेदरसर्व्हिसवाल्या भाड्यांनी आमची लाडकी मुंबई अर्धी बुडवली हो!!!!
हे सगळे राज्यकर्ते, प्रेस, नेते, आणि सो कॉल्ड कम्युनिस्ट देशभक्त काय वाटेल ती बकबक करू देत...
पण भारतातल्या लंगोटीवाल्या शेतकर्‍याला त्याच्या ग्रामपंचायतीच्या रेडियोवर पाऊस नक्की कधी पडणार ते निश्चित कळू द्या हो...

आधीच मान्सूनची बेभरवशाची शेती आहे हो त्याची...
आणि त्यात सावकार, पोलीस, सर्कारी कारकून त्याला नागवायला सरसावून बसलेच आहेत...
निदान तो पर्जन्यराजा तरी त्याचा पाठीराखा होऊ द्यात!!!

पाहिजे तर त्याबदल्यात पुढल्या निवडणुकीमध्ये मी तुम्हाला माझं मत देईन, वाटल्यास निवडणुकीत तुमचा प्रचारही करीन...
पण एव्हढं एक मागणं तरी मान्य कराच माननीय राष्ट्राध्यक्ष!!!

या मागणीमध्ये कुणाचा दुस्वास नाही, कुणाच्या नाशाची मनोकामना नाही, कुणावर अन्याय नाही...
असलंच तर सर्वांचं कल्याणच आहे!!!!

जय हिंद, गॉड हेल्प द युएसए!!
बोथ आर द लॅन्डस ऑफ द फ्री अ‍ॅन्ड द होम ऑफ द ब्रेव्ह!!!!

Monday, September 27, 2010

मनःपूर्वक आभार!

नमस्कार मंडळी,

गेले काही काळ मी इथे काही लिखाण करतोय......
माझ्या मनातील विचारतरंग शब्दात पकडायचा हा खेळ....
मी माझ्याशीच चालवलेला....

पण कालांतराने लक्षात आलं की मी इथे एकटाच नाहिये.....
आणखीही कुणीतरी इथे येऊन हे शब्दतरंग वाचून जातंय....
आणि तोडभरून कौतुकही करतंय!!!

मन सुखावलं आणि ओशाळलंही!!
मी आयटीवाला नसल्याने मला हे आंतरजाल आणि संकेतस्थळ चालवण्याबद्दल जेमतेमच माहिती आहे....
त्यामुळे या माझ्या पाहुण्यांचं स्वागत कसं करावं, त्यांना धन्यवाद कसे द्यावेत हेच समजत नव्हतं....
म्हणून त्यासाठी ही खास पोस्ट!!!

विजय, विशाल, दिनेश, कोहम्, अंतर्नाद, ट्यूलिप, मऊमाऊ, सतिश, प्रसाद, रोहन आणि मेघा....
माझं लिखाण वाचून त्यावर आवर्जून अभिप्राय दिलात याबद्दल अनेक अनेक धन्यवाद!!!
असाच स्नेह ठेवा...
नंदन आणि भाग्यश्रीची प्रत्यक्ष ओळख असल्याने त्यांचे आभार मानत नाही (कारण घरी येऊन हाणतील ही भीती!!!:))

जमेल तसे अजून पोस्ट टाकायचा विचार आहे...
तुमचे अभिप्राय मोकळेपणाने कळवा...

सस्नेह,
शैलेश

Saturday, August 21, 2010

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने.....

अलिकडेच आपला ६३वा स्वातंत्र्यदिन साजरा झाला. आता स्वातंत्र्यदिनालाच प्रजासत्ताक दिन समजणारे काही तुरळक गावठी आमदार-खासदार सोडले (तेच ते! स्वतःचा पगार ३००% वाढवून घेणारे!!) तर उर्वरीत भारतभर आणि भारताबाहेरही हा दिवस अगदी उत्साहात साजरा केला जातो.....

टीव्हीवर इंडियन चॅनलवर स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित केलेली परेड बघत होतो....
हां, पण ही दिल्लीची परेड नाही नाही हां!!! एकतर दिल्लीची परेड १५ ऑगस्ट्ला नसून २६ जानेवारीला असते.....
ही इथल्या न्यू जर्सीमधली परेड....
त्या परेडची सुरस आणि चमत्कारिक कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे!!!!

सगळ्यात महत्त्वाची सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे ही स्वातंत्र्यदिनाची परेड १५ ऑगस्टला नव्हतीच मुळी!!!!
ह्याला म्हणतात दणका!! आहे की नाही सुरस आणि चमत्कारिक कथा!!!!
अमेरिकेत सगळे व्यवहार वीकेंडला धरून चालत असल्याने आणि भारतीय स्वातंत्र्यदिनाची इथे पेशल सुट्टी नसल्याने ही परेड १५ ऑगस्ट ज्या सप्ताहात येतो त्याच्या आधल्या वीकांताला होती......

आता यात भारताबद्दल अनादर वगैरे काही नाही. इथे खुद्द अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन जरी विकांताला (शनिवार-रविवार) आला तरी त्याची सुट्टी मग त्यानुसार शुक्रवारी किंवा सोमवारी दिली जाते!!! इथे वीकांत महत्वाचा, स्वातंत्र्यदिन वगैरे सगळं नंतर!!!! अर्थात इथे भरमसाठ सुट्ट्या नसल्याने (वर्षाला १० फक्त!!!) ते सहाजिकही आहे!!!

आणि भारताचा स्वातंत्र्यदिन आधल्या वीकांताला तर पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन (१४ ऑगस्ट) नंतरच्या वीकांताला साजरा केला जातो! आपल्याकडल्या पाकद्वेष्ट्या जाज्वल्य मंडळीना समाधान लाभावं म्हणून सहज सांगितली ही वस्तुस्थिती!!!!

पण नाही म्हणजे परेड तर झकासच झाली!! जवळजवळ चार साडेचार तास मिरवणूक चालली होती. न्यू जर्सी आणि न्यू यॉर्कमधल्या झाडून सार्‍या सामाजिक आणि व्यावसायिक संस्थांनी त्या परेडमध्ये भाग घेतला होता हे त्यांच्या फ्लोटसवरून सिद्ध होत होतं....

अगदी न्यू जर्सी मराठी मंडळाचाही, सगळ्यात कमी सजवलेला का होईना, पण फ्लोट होता!!!! मला मनापासून आनंद झाला!!!

आता "न्यू-जॉयशी" म्हणजे अमेरिकेचं महागुजरात!!! इथे गुजराती नुसते बुजबुजले आहेत!!!
त्यामुळे बहुतेक सगळे फ्लोट गुजराती बिझीनेसचे! आणि मिरवणुकीमध्ये सामील झालेले लोकंही ब्रव्हंशी गुजराती समाजाचे!! त्यामुळे मिरवणुकीत हलकल्लोळ होणे हेही सहाजिकच!!!!

पण या गुज्जु लोकांच्या इव्हेंन्ट मॅनेजमेंट स्किलला मात्र दाद द्यायलाच हवी.....
या वर्षी या परेडची प्रमुख पाहुणी कोण होती माहितीये का?
चक्क मल्लिका शेरावत!!!!!
आता काय बिशाद आहे की अनिवासी भारतीय मंडळी परेडला गर्दी न करतील!!!!

नाही म्हणजे ती अगदी बॉलीवूड फिल्लममध्ये दिसते तशीच तिथे अर्धवस्त्रांकित आली नव्हती, सगळी व्यवस्थित पंजाबी ड्रेस वगैरे घालून सालंकॄतच होती....
पण तरीही,
"काका, जो!! आ जो मल्लिका शेरावत!!"
"हां डिकरा, एक्दम चोक्कस डिकरी लागे छे! पैसो वसूल!!!!"!"
हा संवाद मी बॅकङ्राऊंडवर ऐकला, अगदी आयशप्पथ!!!!!!!!

बाकी परेडमध्ये भाग घेणारे बहुतेक लोकं भारतीय असले तरी रस्त्यावर दुतर्फा उभे राहून हातातला तिरंगा फडकावणारे अनेक अमेरिकन्सही पाहिले आणि या देशाच्या उदारमतवादी नागरिकांबद्दल आदर वाटला!!!!
उद्या जर भारतात अशी नेपाळची किंवा बांगला देशाची अशी त्यांच्या स्वातंत्र्यदिनाप्रित्यर्थ मिरवणूक निघाली तर आपली प्रतिक्रिया खरंच इतकी मनमोकळी राहील?

असो! तर सगळी परेड अगदी छान पार पडली...

पण मनात आणखी एक विचारभुंगा...
इथे भारताच्या स्वातंत्र्यदिनाची मिरवणूक आदल्या वीकांताला, पाकिस्तानची मिरवणूक नंतरच्या वीकांताला पार पडते, सगळं सगळं ठीक आहे...

पण मग बांगला देशाचा स्वातंत्र्यदिन कधी असेल?
१४ ऑगस्ट्ला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळवलं तो......
की नंतर कधी १९७१ मध्ये पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळवलं तो?

दोन्हीपैकी काहीही एक उत्तर असलं तरी ते अंमळ अडचणीचंच की!!!!

Saturday, February 7, 2009

गुणामामा

खूप सालांमागली गोष्ट. मी त्यावेळेस कालेजात जात होतो. बोरीबंदरावरचं सेंट झेवियर कालेज! किरीस्तांव मिशनर्‍यांनी चालवलेलं! त्यातही गोव्याच्या मिशनर्‍यांचा भरणा जास्त!!! कालेजाच्या दुसर्‍या वर्षाची परीक्षा संपलेली. दुसर्‍या वर्षाचा निकाल घेऊन भायेर पडतेवेळी वर्गाच्या व्हरांड्यात पाद्री प्रिंन्सीपलसायबांची गाठ पडली....

"कायरे रिझल्ट कसो लागलो?"
"बरो आसां!"
"मग आता सुटीतलो काय बेत?"
'काय नाय, जरा गावांकडे जावंन येयन म्हणतंय!!"
"आसां? छान, छान! गावाकडे जातलंय तर माझां एक काम कर मारे!"
"काय?"
'मी तुका एक पार्सल दितंय, जरा पिलाराक जावंन पोहोचव मारे!"

गोव्यात पिलार गावात किरिस्तांव पाद्र्यांची धर्मगुरू तयार करायची शाळा आहे. बाकी हे सगळे पाद्री तसे सडेफटिंग! त्यांना बायकोपोरांचा काय त्रास नाय! पण मैत्री करण्यामधे एकदम पटाईत! बहुदा जुन्या दोस्तमंडळींसाठी मुंबयहून कायतरी पाठवायचं असेल!!

"चलांत! द्या तुमचां पार्सल!!", मी. बाकी आणिक मी काय म्हणणार? कालेजाच्या प्रिन्सीपलसायेबाला नाय म्हणायची काय बिशाद आमची?

त्यांचं पार्सल घेऊन घरी आलो तर घरी आईबरोबर तेच संभाषण......

"काय? आता सुटी लागली तर कायतरी कामाचा करशीत का मेल्या अख्खो महिनाभर उगीच भिंतेक तुमड्यो लावंन बसतलंय?", आईच असल्याकारणाने संवाद जरा जास्त लडिवाळ!!!
'कायतरी करीन पण आत्ता नाय, थोड्या दिवसांन!"
"मगे आत्ता काय करतलंय?"
"जरा आजोळाक जावंन येईन म्हणतंय!", मी.

आईने जरा नवलाने माझ्याकडे बघितलं.....
"आसां म्हणतंय? जा बाबा, जावंन ये. तुझ्या आजी-आजोबाक बरां वाटांत! माका तर काय या रगाड्यात्सून उठून जावंक उसंत गावणा नाय, जरा तू तरी जावंन ये. तेंका म्हणा तुमची खूप आठवण येतां...." आईने आपल्या आई-बापाच्या आठवणीने डोळ्याला पदर लावला.....

माझं काम फत्ते!!!! एकदा आजोळी जायला मला आईची परमिशन मिळाल्यानंतर "नको जाऊ" म्हणण्याची चूक करण्याइतके बाबा खुळे नव्हते!!! त्यांची आपली एकच मागणी....

"जातंय तर जा, पण येतेवेळी माकां थोडो काजीचो सोरो घेवंन ये! औषधी असतां!!!!!"
"अहो लहान पोर तो, तेका कशाक आणूक सांगतास? खंय काय गोंधळ झालो मगे?", कनवाळू मातृदेवता.
"काय होवूचां नाय! रे, तुझ्या गुणामामाक सांग वस्तू पॅक करूक!!! तो सगळां बरोबर जमवून आणतलो!!!"
"हो! आणतलो!!! काय पण मेव्हण्या-मेव्हण्यांची जोडी आसां जमलेली!!!! तेवेळी माझ्याऐवजी गुणाजीबरोबरच लगीन करूंचा होतांत!!", आईचा त्रागा.....
"अगो तां सुचलांच नाय ते वेळेक!! आणि तुझ्यासारखी फिगर खंय आसा त्याची?", बाबांचं म्हटलं तर चिडवणं, म्हटली तर आईची समजूत घालणं!! त्यांचं प्रेम हे असंच! जवळ असले म्हणजे वादावादीला ऊत आणि जरा लांब गेले की एकमेकांच्या काळजीने हैराण होणार!!! कुठूनही काय, आम्हां पोरांच्या डोक्याला ताप करायचा!!!!

दुसर्‍या दिवशीच सांजेच्या टायमाला परळ-सावंतवाडी एष्टीची आरामगाडी पकडली! आरामगाडी नुसती म्हणण्यासाठीच हो!!!! आराम तर सोडाच पण एष्टीवाल्याने मेल्याने तीन घंटे उशीराने पोचवली वाडीला (सावंतवाडीला स्थानिक लोकं नुसती वाडी म्हणतांत). महाडच्या जवळ मेल्याचा टायरच बसला. ते सगळं क्रियाकर्म यथासांग पूर्ण होइपर्यंत आम्ही तिथेच!!! तिथून गावाची एष्टी तासाभराच्या प्रवासासाठी! त्या बसगाडीला मात्र आरामगाडी म्हणायची एष्टीवाल्यांचीसुद्धा हिंमत नव्हती!!!!

गावाच्या बसष्टँडावर उतरलो आणि नेहमीप्रमाणे मुंबयकराच्या भोवती पोरांसोरं जमा झाली. त्यातल्याच येका मुलग्याला पुढे धाडलं....
"जा रे! धावत जावंन गुणामामाक सांग त्येचो भाचो आयलोसा म्हणान!!", त्याला 'कोण गुणामामा' हे सांगायची गरज पडली नाय...

दुसर्‍या मुलग्याच्या डोकीवर बॅग देऊन रस्त्याने दोन फर्लांग चालून आलो तर पाणंदीच्या तोंडाशी गुणामामा हजर!!!!

"अरे आयलो रे, मुंबयचो सायेब आयलो!!! शिंदळीच्या तुझ्या आजोळाक तू इतको विसारलंस!!! शिरां पडो तुजे तोंडार!!!!!" मला आपल्या मिठीत घेत अस्सल इरसाल कोकणी स्वागत!

घरात येऊन पोहोचलो. आजी-आजोबांच्या पाया पडून आणि त्यांच्याकडून कुरवाळून घेऊन झालं. मी त्या बॅग उचलून आणलेल्या पोराला किती पैशे झाले ते विचारलं....

"तू थेट आत जा", गुणामामा गुरगुरला.
"अरे पण तेची हमाली?"
"तू मुकाट आत जा! धू म्हटल्यावर धूवूचा, लोंबता काय म्हणान विचारू नको!!!!! आणि काय रे सावळ्या, मेल्या माझ्या भाच्याकडे पैशे मागतंय, साल्या उपाशी मरत होतंय तेंवा तुका रोजगाराक कोणी लावलो रे? तुज्या आवशीक खावंक व्हरान......"

पुढला संवाद ऐकायला मी तिथे थांबलो नाय.....

दुसर्‍या दिवसापासून माझा कोकणी दिनक्रम सुरू झाला. रोज सकाळी उठल्यावर घरच्या दुधाचा चहा, दहा-साडेदहाला न्याहारी! उकड्या तांदळाची पेज, आजीने केलली फणसाच्या कुयरीची नायतर केळफुलाची मस्त काळे वाटाणे घालून भाजी आणि सोबतीला सुक्या बांगड्याचा घरचं खोबरेल लावलेला तुकडा!!!! अमृत गेलं झक मारत!!!

न्याहारी उरकल्यावर मी आंघोळ करूयां म्हणतोय तर गुणामामाने हाळी दिली....
"रे भाच्या, काय येतंय काय माझ्यावांगडा (सोबत) बाजारात? की पडतंय हंयसरच अजगर होवंन?"
"बाजारात?"
"हां, काय नुस्ते (मासळी) गांवतंत बघूया! आज सोमवार म्हणान माकां काय फारशी आशा नाय, पण तरी बघंया!!"
"अरे पण आज्येचो सोमवार नाय आज? आज नुस्ते कशे चलतीत?", माझी शंका.
"अरे खुळ्या, हंयसर काय तुझ्या मुंबयसारखी एकच गॅसची चूल नाय! तुझ्या आज्येक करां देत तिचा शिवरांक (शाकाहारी) सोवळां स्वयपाकघरात! आपण सुशेगाद (आरामात) परसातल्या चुलीवर नुस्त्याची भट्टी पेटवयांत!!!"

मला ही आयडिया बेहद्द आवडली! साली मुंबयेतपण एक कोळशाची शेगडी आणून ठेवायला हवी, सोमवारी बांगडे भाजायला!!!!

आम्ही बाजाराच्या रस्त्याला लागलो. आमचं घर पुळणीच्या अगदी जवळ आहे. इतकं, की समुद्राची गाज घरात आयकू येते. घरापासून दोन फर्लांगाची वाळूने भरलेली पांदण त्यानंतर मग दोन फर्लांगाचा तांबड्या मातीचा आता खडी टाकून दाबलेला रस्ता आणि मग शेवटी बसथांब्याजवळ बाजार. पाणंदीतून जाताना गुणामामा आमची चौकशी करत होता. माझं कालेज, आई-बाबांची तब्येत, धाकट्या भावंडांचं कौतुक, मुंबयची हाल-हवाल इत्यादि. मी आपला त्याला माहिती पुरवीत होतो. जसे आमी तांबड्या रस्त्याला लागलो तशी रस्त्यावरची वर्दळ वाढली. रस्त्यावरचा प्रत्येक माणूस गुणामामाची विचारपूस करत होता आणि गुणामामा आता प्रत्येकाशी काय ना काय संवाद करत होता. शिव्यांचा जणू नैऋत्य मोसमी मान्सून बरसत होता. मी आपला निमूटपणाने त्याच्यापाठोपाठ जात होतो. त्याचं माझ्यावरचं लक्ष उणावलेलं बघून त्याचं निरिक्षण करीत होतो....

साडेपाच फूट उंची, शेलाटी कोकणी शरीरयष्टी, अंगात एक निळसर हाफ शर्ट आणि मुळातला सफेद पण आता मातीने तांबडा पडलेला पायजमा! गोरा सफेद वर्ण आणि हिरवे डोळे. मुळातले तपकिरी केस कोकणच्या उन्हाने आणखी भुरे झालेले. मनात विचार आला की जर ह्याला सूट टाय चढवला आणि फाडफाड इंग्रजी बोलायला लावलं तर हा युरोपीयन नाय असं म्हणायची कोणाची हिंमतच होणार नाय!!!! शिक्षण तसं फक्त मॅट्रिकपर्यंतच पण वाचनाची तुफान हौस!! सगळ्या मराठी संतमंडळींच्या आणि लेखक-कविंच्या ओळी (त्यातही जास्त शिव्यागाळी!) ह्याला पाठ!!!!! ह्याला कुणाची भीड पडत नाय आणि कुणाला ह्याच्या शिव्या अंगाला टोचत नायत! सगळ्या गावाला माहिती की गुणामामा म्हणजे तोफखाना!!!! अगदी स्वतःच्या बनवलेल्या शिव्यागाळी आणि काव्यपंक्ति!!!!

मला एक जुना प्रसंग आठवला. त्यावेळी आम्ही लहान असतांना एकदा आजोळी आलो होतो. मी सात-आठ वर्षाचा आणि धाकटा भाऊ अगदी तीन-चार वर्षांचा. तेंव्हा गावात संडास झाले नव्हते. सगळी माणसं माडाच्या मुळाशीच बसत. आमी मुंबैत वाढणारी मुलं! आम्हाला त्या रानाचं आणि माडाच्या झावळ्यांच्या वार्‍यावर होणार्‍या आवाजाचं भय वाटे. तेंव्हा परसाकडे जायची पाळी आली की आजी गुणामामाला आमच्या सोबतीला धाडी. तिथेसुद्धा मी तांब्या घेवंन माडाच्या मुळाशी बसलोय आणि ह्याची शिकवणी आपली चालूच!!!

"रे मेल्या, ह्या आत्ता तू काय करतसंय? जरा वर्णन कर!!!!", गुणामामा.
"परसाकडे बसलसंय!!!", माझं लाजून थोडक्यात उत्तर.
"अरे असां नाय! शाळेत जातंस मा तू? मग काव्यात वर्णन कर बघू?" मी गप्प! आता अगदी चांगल्या शाळेत गेलो म्हणून काय झालं? मलविसर्जनाच्या क्रियेचं काव्यात वर्णन कसं करणार मी?
"नाय येणां?", गुणामामा वदला, "अरे असली कसली रे शाळा तुझी? काय्यच शिकवणां नाय पोरांक!!!! आता ऐक...

"सडा शिंपला,
शंख फुंकीला,
दशरथ राजा
घसरत आला......"

मी जोराने हसायला लागलो! इतक्या जोराने की माझा धक्का लागून पाण्याचा तांब्या कलंडला!!! सगळं पाणी त्या वाळूच्या जमिनीत झिरपून गेलं!!!!!

"गुणामामा, माझो तांब्यो उलाटलो! आतारे काय करू मी?", माझा केविलवाणा प्रश्न....
"काळजी करा नुको! ही घे नागवेलीची दोन पानां!!", पोफळीवर चढलेल्या नागवेलीची दोन विडयाची पानं माझ्या हातात देत मामा म्हणाला,
"रोज आमी गाववाले तांबडो विडो बनवतोंव, आज तुमचो मुंबईकरांचो पिवळो विडो!!! जा, तुझ्या आजोबाक नेऊन दी!!!"

मला त्या आठवणीने आताही हसू आवरेना. तोवर आम्ही बाजारात पोचलों. बाजार नुकताच भरत होता. कोकणातले मासळीबाजार साडेदहा-अकराच्या आत भरतच नाय. नुस्ते नुकतेच रापणीवरून येत होते. कोळणी बायकामाणसां ते पाण्याने साफ करून फळीवर मांडत होती. गुणामामाने एक चक्कर टाकून अवघ्या बाजाराचा अंदाज घेतला आणि मग एका कोळणीसमोर जाऊन उभा राहिला......

"काय गो शेवंत्या! काय ताजे नुस्ते हाडलंस आज की सगळो आयतवाराचो (रविवारचा) शिळो माल?", सगळ्या बाजाराला ऐकू जाईल अशा आवाजात गुणामामा विचारता झाला.....

"कायतरी काय गुणामामा! बघ सगळो ताजो माल आसां"
"काय देतंस?"
"बघ खापी आसंत, बांगडे आसंत, सौंदाळे आसंत....."
"अगो माझो हो भाचो मुंबयसून इलो आसां." मामा गरजला, "तेका काय हो कचरो खावंक घालू? मगे परत गावाचां तोंड तरी बघात काय तो?"
"थांब हां जरा, पाटयेत बघान सांगतय!...... ही बघ विसवण (सुरमई) असां! चलांत?"
"हां चलात! नशीब, माशे पागणार्‍या घोवाची लाज राखलंय!!! काय भाव घेतलंय?"
"पन्नास रुपये!!!"
"पन्नास रुपये? आगो काय विसवणीचो भाव सांगतंय की तुझो?"

अरे माझ्या देवा मंगेशा! मला वाटलं की हिथे आता महाभारत पेटणार!!!! एका कोळणीला हा प्रश्न? आता ही कोयता काढून भर बाजारात गुणामामाला खापलणार!!! मी तर भीतीने पार गारठून गेलो.......

पण तसं कायच घडलं नाय......

"काय मेल्या गुण्या, तुज्या तोंडाक काय हाड? अरे मेल्या त्या धाकल्या झिलग्यासमोर बोलतांना तरी काय जरा लाज बाळग!", शेवंत्या कोळीण मग मला म्हणाली,
"काय बाबा, मुंबयच्या शाळेत जातंस?"
"हां, कालेजात जातंय", माझं काळीज अजून धडधडत होतं.......
"जा बाबा जा! भरपूर शीक! तुज्या या इकाळ्या पावसाच्या मामाच्या वळणावर जाव नको!! तो मेलो आसलोच आसां, शिंदळीचो!!! आवशी-बापाशीन लगीन नाय केला हेचा वेळेवर आनि आता आमकां तरास आणतां!! गावउंडगो मेलो!!!

मला वाटलं की ब्रम्हचारी मामा आता याच्यावर कायतरी स्वत:चा पावशेर ठेवील, पण तो नुसताच हसला......

आम्ही बाजार घेऊन घरी येतेवेळी मी मामाला म्हटलं,
"रे मामा, कित्याक रे उगाच त्या कोळणीक असो बोललंय? तिणां तुजावांगडा भांडाण केला असता भर बाजारात मगे?"
"अरे तसां नाय!", मामा हसून म्हणाला, "अरे माझ्या ओळखीची आसां ती शेवंता! आमी प्राथमिक शाळेत एकाच वर्गात होतोंव!! तेची आउस आन तुजि आजी, जुनी ओळख आसां!! पुढे ती तिच्या धंद्यात गेली कोळणीच्या!!"
"आणि तुमी तुमच्या धंद्यात!! बामणकीच्या!!!" मी.
"बामणकीचो कसलो धंदो?"
"होच! गावभर फिरान शिवेगाळी करूचो!!!" मी.
माझ्या डोक्यावर टप्पल देत गुणामामा खळखळून हसला, "व्वा!! माझो भाचो शोभतंस बघ!!!!"

कर्म माझं!!!!! या गाववाल्यांच्या भानगडीमधे जो मुंबयकर पडेल ना तो येडझवा!!! मी मनात खूण बांधली.....

थोड्या दिवसांनी मी माझा पिलारला जायचा प्लान जाहीर केला. गुणामामाला जरा बाजूला घेऊन बाबांची फर्मायशही सांगितली.....

मामा कधी नव्हे तो गंभीर झाला.....
"तुजो बापूस म्हणजे जरा चक्रमच आसां रे!!! तुका लेकराक ह्या काम करूक सांगितलां? आणि ताई बरी तयार झाली!!!"
"नाय म्हणजे आई नुको म्हणा होती. तेंव्हा जर केलां नाय काम तर काय घरी जास्त ओरडो बसूचो नाय!!"
"तसां नको, बघू कायतरी मार्ग काढतंय!!", मामा म्हणाला....

दुसर्‍या दिवशी गुणामामा मला म्हणाला,
"अरे आसां कर, तुजो पिलाराक जावचो प्लान अगदी शेवटांक ठेव. मी तुका माझ्या फटफटीवरून घेवंन जातंय. तुझां पिलारचा काम करूयात, तुझ्या बापसाचो नेवेद्यही घेवयांत आणि मग मी तुका थंयसूनच लग्झरी गाडियेत बसवून दितंय थेट मुंबयसाठी!!! निदान एष्टीचे धक्के तरी बसूचे नाय तुका, जरा आरामाचो प्रवास होयत!!!"

मग सुट्टीच्या शेवटी आम्ही दोघं मामाच्या मोटारसायकलवरून पिलारला जायला निघालो.....

नेहमीचा मुंबय-पणजी हायवे सोडून गुणामामा तेरेखोलच्या दिशेन निघाला. मला रेडीचं बंदर दाखवून झालं. तिथून मॅगनीजचं खनिज वाहून नेणारी जहाजं दाखवून झाली. तेरेखोलचा किल्ला दाखवून झाला. मामा आणि त्याच्या सौंगड्यांनी (गुणामामा स्वातंत्र्यसैनिक होता!) तो किल्ला पोर्तुगीजांकडून लढून कसा मिळवला ती गोष्ट मला हजाराव्यांदा सांगून झाली.....

"पळाले रे शिंदळीचे, पळाले!!! साल्यांनी पाचशे वर्सां राज्य केलांन पण आमच्याबरोबरच्या एका दिवसाच्या लढाईत पळाले!!!", मामाच्या आवाजात सार्थ अभिमान होता.....

"पण आपल्या भारत सरकारान या किल्ल्याची कायसुद्धा काळजी घेवंक नाय रे!", मामा विषादाने म्हणाला, "बघ कसे चिरे ढासळतसंत समुद्राच्या पाण्यान!!! ह्यां नेव्हीचां एक चांगला आऊट्पोस्ट होवू शकलां नसतां काय? अरे पोर्तुगीज काय खुळे नाय होते या जागी किल्लो बांधूक! सात समुद्रविजेते ते!! म्हटलो तर समुद्रावर पण खुल्या समुद्रापासून सुरक्षित अशी जागा असां रे ही! पण आपले राज्यकर्ते सुक्काळिचे दिल्लीवाले!! तेंका समुद्राचा महत्त्व काय माहिती?"

"चल जावंदे!!"
"जावंदे तां झालांच!! कधीकधी आपल्या सरकाराची अशी करणी बघून असां वाटतां कि आमी ह्याच्यासाठीच लढलो काय?"

मी विषय बदलून मामाला परत मोटारसायकलीवर बसवलं. आमी पिलारला पोहोचलों! मी प्रिंन्सिपलसायबांचं पॅकेट त्यांच्या मित्राच्या हवाली केलं. त्यांना खूप आनंद झाला. आम्हाला जेवूनच जायचा आग्रह करीत होते. पण मामाचं मन काही तिथे लागेना.

"काय नायतर काय तरी बैल-डुकरां खावंक घालतीत आमका!!!", बाहेर पडल्यावर मामा मला म्हणाला....
"कायतरी काय मामा! किरिस्तांव झाले म्हणान काय झालां? तुझ्याइतकेच ते पण कोकणी आसंत!!! नुस्ते खावंक घातले आसते फक्त!!" मामा हसला....
"चल आता पणज्येक माझ्या मित्राकडे जावंया!! तुकां अशी मस्त मासळी खावंक घालतंय की तुझां कालिज झाल्यावर तू गोव्यातच येवंन रवशीत!!!"

आमी पिलाराहून पणजीला आलो. वाटेत पणजीच्या बाजारपेठेत मामा थांबला.

"ऊन बरांच झालांसा, जरा थोडी लिंबा घेवंन जावयां, मस्त लिंबाचा सरबत पिऊ जेवच्याआधी!" आम्ही एका लिंबवाल्याच्या गाडीकडे आमचो मोर्चा वळवला. मामाने एकेका हातात चार अशी आठ लिंबं घेतली. निरखून बधितली. नाकाशी धरून मस्त वासबीस घेतला.......

"काय हो? चांगली आहेत का ही लिंबं?", मागून आवाज आला. उच्चार अगदी स्वच्छ शहरी आणि सानुनासिक!! बघतों तो शर्ट-पँट घातलेला एक मधमवयीन माणूस. बहुदा मुंबय किंवा पुण्यातला चाकरमानी असणार. गोव्यात टूरिस्ट म्हणून आलेला!!! गुणामामाला लिंबाच्या क्वालिटीबद्दल विचारीत होता....

"त्यालाच विचारा", लिंबवाल्याकडे निर्देश करून मामा उत्तरला......
"त्याचं सोडा हो, मी तुम्हाला विचारतोंय, तुम्ही सांगा!!", ह्या शहरी लोकांना कुठे थांबायचं ते कळतच नाय!!!!!

मी गुणामामाकडे नजर टाकली, त्याचा चेहरा हिंस्र झालेला.....

"ही लिंबं ना! मस्तच आहेत!", दशावतारातल्या रावणाचा आवाज काढत मामा म्हणाला, "मूठ मारण्यासाठी मला फारच उपयोगी आहेत ही!!!! हॉ, हॉ, हॉ, हॉ, हॉ!!!!"

तो चाकरमानी जागच्या जाग्यावर झेलपाटला. त्याच्या धक्क्याने ती लिंबाची रास ढासळली.......
सगळी लिंबं रस्ताभर पसरली....
तो लिंबावाला त्या चाकरमान्याच्या पाठीमागे लागला....
आधी तो चाकरमानी त्या लिंबावाल्याचा मार खाणार, आणि नंतर त्याची बायको त्याचं बिरडं बनवणार.....

लिंबवाल्याच्या अंगावर घेतलेल्या लिंबांचे पैशे टाकत आणि पुन्हा दशावतारी हसत आम्ही आमच्या रस्त्याला लागलो.......

मामाच्या मित्राच्या घरी गेलो. लिंबाचं सरबत झालं, वहिनीने केलेलं मासळीचं जेवण झालं......
माऊलीच्या हाताला काही निराळीच चव होती. आजतागायत विसर नाय पडला त्या चवीचा!!!!

जेवण करून मुंबयची बस पकडण्यासाठी आम्ही बेतीच्या बसस्टँडावर आलो. आता पूल पडल्यापासून पणजीहून मुंबयच्या बसेस सुटत नायत, मांडवी नदी पार करून बेतीला यावं लागतं....
मामाच्या एका ओळखीच्या लग्झरीवर माझं तिकीट काढलं. बस सुटायला वेळ होता म्हणून जवळच एका झाडाखाली मला बसवून मामा "आत्ता येतंय!" म्हणून कुठेतरी गेला....

मासळीचं जड जेवण माझ्या डोळ्यांवर येत होतं! मी तिथेच जरा लवंडून डोळे मिटले......
मधेच जाग येऊन जरा डोळे किलकिले करून बघितलं तर दूरवर गुणामामा एका गावड्याच्या पोराशी कायतरी बोलत होता....

मी परत डोळे मिटले....

तासांभराने बसची वेळ झाली म्हणून मामाने मला जाग आणली. खिडकीच्या सीटवर बसवून दिलं आणि आपण बसच्या बाहेर उभा राहून माझ्याशी गप्पा मारू लागला....

"पुन्हा लवकर ये, आमकां विसरां नको! पुढल्या टायमांक तुझ्या आवशी-बापाशीकपण घेवंन ये!!!"
"हां मामा! अरे पन मामा, तां बाबांचा काम रवलांच!"
"हां तां नाय जमूक! तुझ्या बापाशीक सांग यावेळेस नाय जमूक म्हणां!! नंतर कधीतरी बघंया!!!!"

तितक्यात बस सुटली....

खिडकीतून येणार्‍या गार वार्‍यावर मी पुन्हा डोळे मिटले. प्रायव्हेट गाडी ती!!! सगळया एष्टी गाड्यांना धडाधड मागे टाकत पहाटेच्या वेळेसच मुंबईत येवून पोचली......

घरी पोहोचलो. आईला तिच्या माहेराची खबरबात दिली. आजीने धाडलेले सोलं, सुके बांगडे, तिरफळं वगैरे वस्तू तिच्या ताब्यात दिल्या. बाबांना त्यांचं काम जमलं नाय म्हणून सांगितलं. ते थोडेसे हिरमुसले पण काय बोलले नाय....

स्वच्छ आंघोळ करून आणि आईने केलेलं सांबारा-भात खाऊन जरा आराम करायला म्हणून पलंगावर आडवा झालो.....
तर तितक्यात दारावरची बेल वाजली.....

धडपडत उठुन दार उघडलं आणि माझ्या डोळ्यावर माझा विश्वासच बसेना.......

तो पणजीला दिसलेला गावड्याचा पोर दारात उभा!!!!!

"गुणामामांन ह्या औषध दिलानीत पोचवूक!!!" माझ्या हातांत एक पिशवी देत तो आल्यापावली परतला...
"अरे जरा बस तरी!"
"नाय, माकां दमणाक जावंक व्हया!!!"
"काय रे, कोण आंसा?" चाहुल लागून बाबा पण बाहेर आले....

"गुणामामांन कायतरी पाठवल्यानीत!!", मी पिशवी उघडू लागलो तर काचेवर काच आपटल्याचा किण्-किण्ण आवाज आला!!!! बाबांचा चेहरा आनंदाने फुलला!!!!

"माकां वाटलांच! गुणा माकां निराश करूचो नाय!!! माझो भरवंशाचो वाघ आसा तो!!! मेव्हणो असूचो तर असो!!!" बाबांचा आनंद सोड्यावरच्या बुडबुड्यांसारखा ओसंडून जात होता.....

"वाघ तर खरोच", मी मनात म्हंटलं, "असल्या कामाचो आपल्या भाच्याक काय त्रास होवू नये म्हणान त्या वस्तूच्या किंमतीच्या दसपट गाडीभाडा भरून त्या गावड्याक एस्टीन (म्हणून तर तो माझ्यापेक्षा उशीरा मुंबईला पोहोचला!!!) पाठवून वस्तू तर घरपोच केली. एकीकडे आपल्या भावजींचो, थोरल्या बहिणीच्या घोवाचो, मान तर राखलो पण त्याचबरोबर आपलो भाचो सुखरूप पण राखलो....

"तुमचो मेव्हणो घाला आकाबायच्या चुलीत," मी बाबांना उघड म्हंटलं, "माझो मामा खरो भरवंशाचो वाघ आसां!!!!"(डिस्क्लेमरः या लिखाणातली सर्व पात्रे आणि प्रसंग काल्पनिक आहेत. कुणाला इतर हयात वा मृत व्यक्तिशी साधर्म्य आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा. सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन.)

Saturday, January 10, 2009

अलीशिया - भाग ४

(पूर्वसूत्रः तोच चिरपरिचित आवाज आणि तेच खळखळून हसणं......)

"सो बडी! यू आर हियर ऍट लास्ट!!!!"
"वॉजन्ट इट रादर कंपल्सरी?", मी. अलीशिया पुन्हा खळखळून हसली....
"येस इट वॉज! एन्ड इट विल ऑलवेज बी इन द फ्यूचर!!!"

अलीशियाला माझ्या सोबत बसलेली पाहून वेट्रेस टेबलाशी आली.....

"अ ब्लडी मेरी ऍन्ड..."
"मला काहीही प्यायला नकोय!!", मी.
"ऍन्ड अ स्क्रू-ड्रायव्हर!!" माझ्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करत अलीशिया म्हणाली. व्होडका आणि संत्र्याच्या रसाचे मिश्रण असलेलं स्क्रू-ड्रायव्हर हे माझं एकेकाळचं अतिशय आवडतं ड्रिंक!!! इतक्या वर्षांनंतरही ते तिच्या अजून लक्षात होतं....
"आणि तू माझ्या सेक्रेटरीला ते डिकीबद्द्लचं कशाला सांगितलंस? तिच्या डोक्यात काही वेगळ्याच कल्पना सुरू झाल्या, माहितेय?"
"ती जास्त नखरे करायला लागली म्हणून सांगितलं! ओ, नेव्हर माईंड हर!! सेक्रेटर्‍यांना आपले बॉसेस कधीकाळी चावट असलेले आवडतात!!" आता माझं बोलणंच खुंटलं...

"बरं ते जाऊदे! फर्स्ट, गिव्ह मी अ बिग हग!!" मला मिठी मारत ती म्हणाली, "आय मिस्ड यू सो मच!!"
"सो डिड आय!!", मी.
"खोटं बोलू नकोस! इतक्या वर्षांत कॉन्टॅक्ट पण नाही ठेवलास!! आत्ता मलाच तुला शोधून काढावं लागलं!!! बाकी यू हॅव् गेन्ड वेट! जाडा झालास! केसही पिकले कानशिलाजवळ!! डॉक्टर झालास म्हणे!!! डोक्याने पण मॅच्यूअर झालास इतक्या वर्षांत, की अजूनही आहे तसाच वात्रट आहेस?"
"बाई गं, एका मुलाचा बाप आहे मी आता!"
"डज दॅट मेक पीपल मॅच्यूअर? आय डिडंन्ट नो!!" मला एक टोला हाणत ती म्हणाली, "माझ्या नेफ्यूचा फोटो कुठाय?" मी माझ्या मुलाचा फोटो काढून दाखवला....
"ओह! सो स्वीट!! तुझी अजून तीच बायको आहे का ते विचारणार होते पण याला बघून ते विचारायची गरजच भासत नाही!! बाकी त्याचा चेहरा आईच्या वळणावर गेलाय तेच बरं!!" अजून एक टोला...

"तू मात्र फारशी बदललेली दिसत नाहीस!!"
"त्याचं कारण माझी साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी!!", माझी फिरकी घेत अलीशिया म्हणाली....
"हो ना! तुझ्या रहाणीला साधी म्हणणं म्हणजे आम्ही दारिद्र्यरेषेखालीच जीवन जगतोय!!!" मी टोला परतवला.
"आणि कॉस्मेटिक्सची मेहेरबानी!! ते जाऊदे! मला सांग तुझी स्टोरी!! काय काय केलंस गेल्या पंधरा वर्षांत!!"

मी माझी स्टोरी सांगितली. स्टोरी काय असणार! जॉब आणि करियर!! दर तीन चार वर्षांनी वरची पोझिशन आणि नवीन शहर!!

"माझं जाऊदे! तू काय करतेस ते सांग!!"
"मी ना! आमचं नेहमीचंच!! ज्युवेलरी आणि प्रेशियस स्टोन्स!!!"
"डॅडी कसे आहेत तुझे?"
"अरे डॅडी वारले सहा वर्षांपूर्वी!!"
"ओ! आय एम सॉरी!"
"थँक्स! त्याआधी दोन्-तीन वर्षे ते आजारीच होते! गेली आठ्-नऊ वर्षे मीच संभाळतेय सगळा बिझिनेस!!"
"अजून नफ्यात चालला आहे का बिझिनेस?", मी मघाचा टोला परतवला...
"शट अप!!! मी एक्सपांन्ड केलाय बिझिनेस!! ईस्टर्न युरोप, जपान, मिडल-ईस्ट आणि हो तुमच्या मुंबईतही!! युवर न्यू अप्पर मिडल क्लास!!!"

"बरं, मला कशाला इथे बोलावलंस?"
"लेट्स गो टू अवर स्वीट!", अलीशिया उभी रहात म्हणाली, "मी जेवणही तिथेच मागवलंय. मला तुझ्याशी काही बोलायचंय! आणि मुख्य म्हणजे तुला काही दाखवायचंय!!!"

मी तिच्या पाठोपाठ निघालो. नेहमीच्या लिफ्टसकडे न जाता ती एका वेगळ्याच लिफ्ट्कडे गेली. डायरेक्ट पेन्टहाऊसला जाणारी लिफ्ट होती ती! तिने तिच्याकडच्या ऍक्सेस कार्डाने ती उघडली! आतमध्ये बाकी मजल्यांची बटनं नव्हतीच!! डायरेक्ट ऐंशी मजल्यांच्या वर असलेलं पेंन्टहाऊस!!!

"वॉव!! एकदम पेन्टहाऊस हं!", मी उदगारलो....
"अरे काही नाही!!", काही विशेष नसल्यासारखा हात झटकत ती म्हणाली, "डॅडींना हे पेंटहाऊस खूप आवडायचं!! ते सान-फ्रान्सिस्कोत आले की नेहमी इथेच उतरायचे!!! ह्या हॉटेलचे प्रिफर्ड गेस्ट होते ते!!! त्यांच्यानंतर मग मी ते तसंच चालू ठेवलं! होटेल मॅनेजमेंटचा पण खूपच आग्रह पडला!!!!"
"अरे वा! बरी चांगली दिसतेय की मॅनेजमेंट!! जुने संबंध सांभाळतेय!!!"
"आणि त्यांचे ढीगभर शेअर्स माझ्याकडे आहेत!! दॅट हेल्प्स टू!!", पुन्हा ते खळखळून हसणं...

आम्ही तिच्या पेंटहाऊसमध्ये शिरलो. सेरानंच आमचं स्वागत केलं. पुन्हा तिचं ते खास अमेरिकन पद्धतीचं स्वागत! पण यावेळी मला त्यात खूप आपुलकी जाणवली!!!

"अरे केव्हढा मोठा झालास तू? बाहेर कुठे भेटला असतास ना तर ओळखलंच नसतं मी तुला!!!", सेरा.
"मोठा कसला, म्हातारा झालाय तो गाढव!!!", इति अलीशिया....
"असू दे! पुरूष मोठे झाले की भारदस्त दिसतात, मला आवडतं!!", सेरा.
"पण सेरा, तू मात्र इतक्या वर्षात अधिकच सुंदर दिसायला लागली आहेस!!", मी खरं ते सांगितलं
"तुमचा दोघांचा काय हातात हात घालून पळून जायचा प्लान आहे का?", अलीशिया वदली, "असेल तर आत्ताच जा! येणारं चवदार जेवण तरी मी एकटीच पोट भरून खाईन!!!"

"ए, तू गप गं!", मी तिला चापलं, "सेरा, काय करतेस तू?"
"तुला आठवतंय, ते टेनेसीमधलं रॅन्च आणि ते हॉर्स-ब्रीडींग? ते सगळं मी संभाळते!!", सेरा.
"रियली? वॉव!!"
"अरे काही नाही!", सेराच्या कुल्यावर एक चापटी मारत अलीशिया म्हणाली, "अरे हिला काही काम-धंदा करायला नको!! तिथे टेनेसीत रहाते मस्त हवेत आणि हाताखालच्या नोकरांवर सत्ता गाजवते!!! आणि सांगते म्हणे मी घोडे पाळते!!!"

सेरा समजूतदारपणे खुद्कन हसली...

अलीशियाने तिला काही खूण केली आणि सेरा आत गेली. तिची पाठ वळल्यावर अलीशिया मला गंभीरपणे म्हणाली,

"अरे नाही रे! खरं म्हणजे तिला घोड्यांची भीती वाटते. पण माझ्यासाठी ती बिचारी सगळं करते. तुला माहिती आहेच, हे रॅन्च आणि घोडे हे माझं स्वप्न होतं, तिचं नव्हे. पण मला तर या ज्युवेलरी बिझिनेसमधून डोकं वर काढायला उसंत मिळत नाही. म्हणून माझं स्वप्न पुरं व्हावं म्हणून ती धडपड करतेय!!"
"ओह! दॅट्स सो नाईस ऑफ हर!!"
"येस! आता आमच्या घरात आय वेअर द पॅन्टस!!! मी बिझिनेस संभाळते आणि सेरा सर्व घरं आणि प्रॉपर्टीजची देखभाल करते!!! धिस हॅज बीन गोईंग ऑन फॉर द लास्ट फिफ्टीन इयर्स!!"

"बरं, तू काय दाखवणार होतीस मला?"
"येस दॅट!.... सेराऽऽऽ!!!" अलीशियाने हाक मारली.....

सेरा बाहेर आली. पण ती एकटीच नव्हती. तिच्याबरोबर एका बाबागाडीत झोपलेली एक वर्ष्-दीड वर्षांची मुलगी होती. अतिशय गोड चेहरा, भरपूर केस आणि वर्णाने सावळी एशियन! मधूनच झोपेत खुद्कन हसत होती तेंव्हा अजूनच सुंदर दिसत होती.....

"हे काय? हे प्रेशियस ज्युवेल कुठून आणलंस?"
"कशी आहे?"
"मस्तच!! अगदी स्वीट आणि चार्मिंग प्रिंन्सेस!! पण माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस?"

"अरे तुला माहिती आहेच की बिझिनेसच्या निमित्ताने आमचे मलेशिया-थायलंड-इंडोनेशियाबरोबर पूर्वीपासून कॉन्टॅक्टस आहेत, अगदी डॅडींच्या काळापासून! आमचं खूप जाणं-येणंही आहे तिथे. गेल्या २००४ च्या भूकंपात आणि त्सुनामीत तिथे खूपच वाताहात झाली. तेंव्हा त्या लोकांना मदत म्हणून आम्ही तिथे बिझिनेस कॉन्टॅक्ट असलेल्या लोकांनी निधी उभारून मदतकार्य सुरू केलं होतं. त्या निमित्ताने मी आणि सेराने तिथल्या मदतकेंन्द्रांना बर्‍याच आणि वारंवार भेटी दिल्या होत्या. निधी व्यवस्थित वापरला जातोय की नाही यावर देखरेख ठेवण्यासाठी!"

"बरं मग, ही मुलगी?"

"ही तिथल्या एका अनाथकेंद्रात आली होती. हिचे आई-बाप त्सुनामीत वाहून गेले. ही एका प्लास्टिकच्या पाळण्यात होती म्हणून तरंगत गेली आणि अतिशय आश्चर्यकारकरित्या वाचली. तिला तिथे अनाथालयात भरती केलं गेलं होतं. मला आणि सेराला पाहताक्षणीच ही खूप म्हणजे खूपच आवडली."

"म्हणून तू तिथनं हिला उचलून आणलीस?", मनात म्हटलं ह्या बयेचा काही भरवसा नाही.....

"अरे तसं नाहीरे!! आमच्या रिलेशनशिपमध्ये अलिकडे सेरा वॉज अल्सो अनहॅपी दॅट वुई डिडन्ट हॅव अ चाईल्ड!! आता आमच्या रिलेशन्शिपमध्ये आमच्या दोघांचं एक मूल कसं असणार? आर्टिफिशियल इन्सेमिनेशन करून घेता येतं आणि आम्ही सेरासाठी तसाच विचार करत होतो. पण तेव्हढ्यांत ही भेटली....."

"मग?"

"मग मी सेराला म्हटलं कि बघ, कुठूनतरी आर्टिफिशियल इन्सेमिनेशन करून घेण्यापेक्षा ही आपल्या दोघींनाही आवडलीय! तिलाही कोणी नाहिये! तेंव्हा आपणच तिला दत्तक घेऊ या का? कमीतकमी एका जीवाचे तरी क्लेश कमी होतील!!! थोड्याफार समजवण्याने तिलाही ते पटलं. मग आम्ही तिथे जाऊन तिला रीतसर दत्तक घेतलं."

"दॅट्स सो नाईस!!"

इतक्यात ती मुलगी झोपेतून उठली आणि कुरकुर करू लागली. सेराने तिला उचलून कडेवर घेतलं. आता तिचे डोळे मला दिसले. अगदी काळेभोर होते. खुपच क्यूट होती ही मुलगी!!!

मी तिला घेण्यासाठी तिच्यासमोर हात केले. आणि ती लबाड सरळ आली की माझ्याकडे!! काही ओळख वगैरे गरज लागली नाही तिला! अलीशिया आणि सेरा एकमेकींकडे पाहून हसल्या...

"सो यू आर अ फॅमिली नाऊ! कॉन्ग्रॅच्यूलेशन्स!!!!", मी.
"दॅट्स द थिंग!! दॅट्स व्हेअर वुई नीड युवर हेल्प!!!"
"माझी काय मदत हवी?"
"अरे दिसत नाही का तुला? ही मुलगी ईंडियन ओरिजिनची आहे. शी इज नॉट ईंडियन बट ऑफ ईंडियन ओरिजिन!! हर पेरेन्टस वेअर फ्रॉम इंडोनेशिया, द बाली आयलंड!! दे वेअर बाली हिंदूज!!! आम्ही काही ख्रिश्चन नाही करणार तिला पण तिला तिची हेरिटेज कशी शिकवणार आम्ही? ती आमच्यापेक्षा दिसायला इतकी वेगळी आहे की तिला समजूत येताक्षणी कळणारच! त्यामुळे ती आमची दत्तक मुलगी आहे हे तिला लवकरच सांगून टाकणं क्रमप्राप्त आहे. ते आम्ही करूच पण तिला तिच्या ईंडियननेसबद्दल, हिंदूईझमबद्दल काय शिकवू शकणार आम्ही?"

"मग तुम्हाला माझ्याकडनं काय मदत हवी? टेनेसीमधल्या इंडियन टेंपलचा पत्ता?", मी.

"हॅ हॅ, काय पण बोललास! तुझं काय डोकं आहे का खोकं? अरे तो पत्ता मी ही शोधून काढू शकते! इन फॅक्ट नॅशव्हिलच्या टेंपलला आम्ही जाऊन सुद्धा आलो आहोत. पण हिच्या जीवनात कोणीतरी तिचं इंडियन आणि हिंदू असं आपलं माणूस नको का?"

"बरं मग तुझं काय म्हणणं?"

"आमची दोघींची अशी इच्छा आहे की तू आणि तुझी पत्नी यांनी तिचं गॉड-पेरेन्टस व्हावं!!!"

"अरे बापरे! गॉड पेरेन्ट्स?", मी एकदम गडबडूनच गेलो. शॅम्पेन, स्क्रू-ड्रायव्हर सगळ्या एकदम झरझरा खाली उतरल्या.....

"का? काय अडचण आहे तुला?"

"एक अडचण? अगं अनेक अडचणी आहेत!!!! एक म्हणजे हिंदू लोकांत बाप्तिस्मा नसतो त्यामुळे गॉड पेरेन्टसही नसतात. दुसरं म्हणजे मी काही प्रॅक्टिसिंग हिंदू नाहीये. तिसरं, मला माझ्या पत्नीला विचारायला नको का? चवथं म्हणजे ही आयुष्यभराची कमिटमेंट आहे!! हा काय भातुकलीचा खेळ आहे का?"

पण ती मार्केटिंग मास्टर अलीशिया होती. तिने माझ्या या सर्व संभाव्य प्रश्नांवर अगोदरच विचार करून ठेवला होता.....

"हे बघ, हिंदू लोकांत तसे गॉड पेरेन्ट्स नसतात हे मलाही माहितीये. मी तिला तिच्या हेरिटेजचं जिवाभावाचं माणूस या अर्थाने म्हणतेय! तू प्रॅक्टिसिंग हिंदू नाहियेस हे मला पूर्वीपासूनच माहिती आहे. पण तुझं त्या विषयावर वाचन आहे हेही मी पूर्वी पाहिलंय!! होय, तुला तुझ्या पत्नीला विचारायला पाहिजेच, मी कुठं नाही म्हणतेय? जातांना हिचे फोटो घेऊन जा आणि तिला दाखवून विचार! आणि हा खेळ नसून आयुष्यभराची कमिटमेंट आहे हे मलाही कळतंय! म्हणून तर नुसतं फोनवरून न बोलता तुला इथे बोलावलं!! आणि तुम्ही आत्ता तुमच्या मुलाला वाढवता आहांतच ना!! मग ही तुमची आणखी एक मुलगी समज!!" तिचा युक्तीवाद बिनतोड होता...

"अगं पण! मी इथे वेस्ट्-कोस्ट्ला आणि तुम्ही टेनेसीत इस्ट्-कोस्ट्ला! हे जमणार कसं? मी पट्कन उठून येणार कसा?"

"आज कसा आलांस? तसाच!!", आता तिच्या आवाजाला धार आली होती...

मी पुन्हा त्या छोट्या मुलीकडे पाहिलं. खरंच मोहात पडण्यासारखीच होती...

"हे बघ, मला विचार करायला जरा वेळ दे! मला माझ्या पत्नीशी चर्चा करु दे...", मी.

"जरूर! आम्ही कुठं नाही म्हणतोय! तू जरूर विचार कर, तिचे फोटो घेऊन जा, तू आणि तुझी पत्नी यावर चर्चा करा, तुमच्यावर हिची काहीही फिनान्शियल जबाबदारी नाहिये याची तिला कल्पना दे, आणि मग आम्हांला कळव!!"

आवाज थोडा सॉफ्ट करत अलीशिया पुढं म्हणाली, "हे बघ, हे काहीसं ओव्हरवेल्मिंग वाटु शकतं याची मला कल्पना आहे. पण आमच्यासमोर तिच्या हेरिटेजचा, प्रेमळ, आणि ही रिलेशनशिप समर्थपणे आणि निस्वार्थीपणे पार पाडू शकेल असं तुझ्याशिवाय दुसरं कोणीहि नाही. मी तुझे अगदी उपकार मागतेय, आणि मला उपकार मागायला अजिबात आवडत नाही! तेंव्हा प्लीज, प्लीज, नाही म्हणू नकोस!!" तिचा आवाज गहिवरून आला होता....

सेराने तिला जवळ घेतलं. पण आज माझं त्यांच्याकडे लक्ष नव्हतं. माझी नजर त्या मुलीवर खिळली होती. मी पुढे होऊन पुन्हा तिला कडेवर घेतलं....

"बाय द वे, वुई हॅव नेम्ड हर रूबी!!!"
"रूबी?", मी हसलो...
"व्हाय? व्हॉट्स द मॅटर?"
"काही नाही!! प्रेशस स्टोन्समध्ये दिवसरात्र काम करून तुझी कल्पनाशक्तीही गंजल्येय!!!"
"मग तू इंडियन नांव ठेव तिला!! पण इकडच्या लोकांना उच्चारता येईल असं ठेव!!!"

मी त्या मुलीकडे एकटक बघत होतो. आणि माझ्या तोंडून नकळत शब्द निघून गेले....

"शिल्पा! हिचं नांव शिल्पा!!!"
"शिल्पा? व्हॉट डज दॅट मीन?"
"शिल्पा मीन्स द वन हू इज लाइक अ स्कल्पचर!! मेन्ली रिफर्ड टू सम्थिंग व्हेरी ब्यूटिफूल ऍन्ड आऊट्स्टँडिंग!! लाईक स्टॅच्यू ऑफ अ गॉड ऑर अ गॉडेस!!"

"ओ, आय लव्ह दॅट नेम! ऍन्ड इट्स मीनींग टूऽऽ!!!!!" सेरा चित्कारली....
"डिडंन्ट आय टेल यू?" माझ्याकडे कौतुकाने पहात अलीशिया तिला म्हणाली, "ही इज द राईट वन!!!"

............

............

परतीचा प्रवास करून मी घरी आलो. प्रवासभर डोक्यात अलीशिया, सेरा आणि शिल्पाचेच विचार होते. घरी आल्यावर मध्यरात्रीपर्यंत जागून बायकोला ही सगळी स्टोरी सांगितली. ती अलीशियाला चांगलीच ओळखत असल्याने ती फारशी आश्चर्यचकित झाली नाही. तिला शिल्पाचे फोटो दाखवले. तिलाही शिल्पा खूप आवडली. आपल्याला तिचे धर्मपालक व्हायला मिळण्यात आपलाच सन्मान आहे ते तिनेच (उलट) मला पटवून दिलं. पोरगं तर शिल्पाचे फोटो घेऊन "माय न्यू सिस्टर!!!" ओरडत घरभर धावत सुटलं.....

आमचा निर्णय झाला होता! मध्यरात्रीच मी फोन उचलला, नंबर फिरवला....

त्या दोघी जाग्याच होत्या.....

"द आन्सर इज यस!!"

क्लिक...

यावेळी तिच्या हाय-बायची वाट न पहाता मीच फोन ठेवून दिला.....

उशीवर डोकं टेकून मी डोळे मिटले. माझ्या बदललेल्या आयुष्याला आता सुरवात झाली होती.....

माझ्या पत्नीने मला मुलगा दिला.......

आणि आता या माझ्या जिवलग मैत्रिणीने मला तिची मुलगी दिली......

माझं आयुष्य आता परिपूर्ण आहे! मी पूर्ण कॄतार्थ आहे!!

(संपूर्ण)

(वरील कथेतील व्यक्ती काल्पनिक असून कुणाशी त्यांचे साधर्म्य आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा. सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन.)