Sunday, July 27, 2008

जॉर्ज कॉल्डवेल - भाग ३

(पूर्वसूत्रः असं शिकता शिकता चार महिने कसे उलटले ते आम्हाला समजलंही नाही.... आणि दुसरा कसला विचार करायला जॉर्जने आम्हाला अवसर तरी कुठे ठेवला होता म्हणा!!
आणि मग एकदा ती वेळ आली....... काळरात्रीची भयाण वेळ.........)

आमच्या अंतिम परीक्षेचा दिवस येऊन ठेपला. खरं तर परीक्षा दुपारी बारा वाजता होती. आम्ही परीक्षेच्या हॉलमध्ये जाऊन बसलो होतो पण जॉर्जचा पत्ताच नव्हता.......

एक वाजता जॉर्ज उगवला. आमची नाराजी जाणून म्हणाला,
"मला माहीत आहे की मला यायला उशीर झालाय! पण तुम्ही काळजी करु नका. मी तुम्हाला अगदी भरपूर वेळ देणार आहे. असं बघा, मला हा पेपर सोडवायला तीन तास लागतील. आत्ता वाजलाय एक. मी तुम्हाला पाच तास, अगदी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत वेळ देतो. मग तर झालं समाधान!"

आमचं समाधान व्हायच्याऐवजी पोटात खड्डा पडला. स्वतः जॉर्जला सोडवायलाच तीन तास लागणार म्हणजे तो पेपर किती कठीण असेल!!! प्रश्नपत्रिका वाचल्यावर आमची ती भीती खरी ठरली.....

जॉर्ज प्रश्नपत्रिका वाटून तिथून निघून गेला. पुढले पाच तास आम्ही त्या पेपराशी झुंजत होतो....
आम्ही म्हणजे सर्व इंटरनॅशनल विद्यार्थी!!! अमेरिकन पोरं-पोरी पहिल्या एका तासातच हताश होऊन पेपर फेकून निघून गेली होती......
त्यांनी बहुदा हा पेपर सोडवण्याऐवजी मॉलमध्ये नोकरी करणं पसंत केलं असावं! हो, त्यांच्यापाशी तो ऑप्शन होता! आमच्यापाशी दुर्दैवाने नव्हता....

सहा वाजून गेले तरी जॉर्ज परत आला नव्हता.....
आमचा पेपरही सोडवून पूर्ण झाला नव्हता....

अखेर रात्री आठ वाजता जॉर्ज उगवला....
"आर यू डन?" त्यानं विचारलं. आम्ही नकारार्थी मान डोलावली...
"ओके, मी तुम्हाला अजून अर्धा तास देतो. त्यानंतर तुमचा पेपर माझ्या ऑफिसच्या दाराच्या फटीतून आत सरकवा", राजा उदार झाला आणि अर्धा तास जास्त दिला.....

पण इथे सात तास झुंजून आमचे मेंदू इतके थकले होते की आणखी अर्ध्या तासात आम्ही काय नवीन उजेड पाडणार होतो? असो. यथावकाश आम्ही आमचे पेपर त्याच्या केबिनमध्ये सरकवून निघून गेलो...

त्या रात्री मला अजिबात झोप आली नाही. काही खायची वासना तर नव्हतीच! माझा पेपर पूर्ण सोडवून झाला नव्हता! माझाच काय पण कोणाचाच!!

आता भवितव्य काय? रात्रभर हेच विचार डोक्यात घोळत होते. या अभ्यासक्रमात आत्तापर्यंत अडिच-तीन वर्षे खर्ची घातलेली होती. मग आता अंतिम फळ काय? काहीच नाही?
आणि आता घरी काय कळवायचं? डिग्री न घेताच परत इंडियाला जायचं? पराभूत होऊन?
नाही, नाही, काहीही झालं तरी असं होऊ देणार नाही मी.....

डोळ्यासमोर एकदम त्या प्रयोगशाळेच्या बाहेर असलेले खड्डे चमकले! म्हणजे जॉर्ज अगदीच थट्टा करत नव्हता तर!!!
अगदी ते खड्डे कोणी वापरले नसतील पण त्या तोडीचा विचार अगदीच कुणा विद्यार्थ्याच्या मनात आलाच नसेल का?

छे, छे, काहीतरीच!!!

मनातले विचार मी झटकून टाकले. बेसिनकडे जाऊन तोंडावर नळाचं गार पाणी मारलं.....
लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी म्हणून टीव्ही लावला पण दोनच मिनिटांत वैतागून बंद केला.......
नुसतं पोटातच नव्हे तर सबंध शरीरात काहीतरी डुचमळत होतं.... हिंदकळत होतं...... बाहेर पडण्याची वाट शोधत होतं......
पलंगावर पाय पोटाशी घेऊन पडून राहीलो! अति-तणावाने ओकारी येण्याची वाट पहात.....

त्या रात्री पहाटसुद्धा खूप खूप उशीरा आली.....

दुसर्‍या दिवशी मला संध्याकाळपर्यंत काम होतं. कामात लक्ष नव्हतंच!! माझं काम झाल्यावर रात्री मी डिपार्टमेंटमध्ये जाउन पहातो तर जॉर्जने त्याच्या केबिनच्या दरवाजावर रिझल्ट चिकटवलेला होता. आम्ही पाच-सहा विद्यार्थीच असल्याने आमचे (अपूर्ण!) पेपर तपासायला त्याला एक दिवसही पुरला होता. रिझल्ट म्हणजे काय तर आमची नांवं आणि समोर पास/फेल लावलं होतं. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या रिझल्टबद्दल चर्चा करायची असल्यास अपॉइंटमेंटचे टाईम-स्लॉटही दिले होते....

अरे हो, सांगायचं राहिलंच!! मी पास झालो होतो!! कसा ते देवालाच माहीत!!!!

मी, तो चिनी मुलगा आणि ती कोरियन मुलगी एव्हढे पास!! बाकी सगळ्यांची दांडी उडाली होती....

सर्वप्रथम मी काय केलं असेल तर धावतच बाथरूममध्ये गेलो आणि भडाभडा ओकलो......सगळं टेन्शन आता बाहेर पडत होतं.....

माझ्या अपॉइंटमेंटच्या वेळेस मी जॉर्जच्या ऑफिसात गेलो. त्याने माझं स्वागत केलं. समोरच्या खुर्चीवर बसवलं. पास झाल्याबद्दल माझं अभिनंदनही केलं....

"तुला तुझ्या पेपरबद्दल काही प्रश्न विचारायचेत का?" तो मृदुपणे म्हणाला. माझी भीड चेपली.
"नाही म्हणजे मला एकच विचारायचं होतं की तुम्ही या पेपरांमध्ये पास-फेल ठरवतांना काय निकष वापरले?" मी शक्य तितक्या डिप्लोमॅटिकली विचारलं. पण तो जॉर्ज होता, माझ्यासारखे अनेक विद्यार्थी त्याने पचवले होते, माझ्या प्रश्नाचा रोख त्याच्या झट्कन ध्यानी आला....
"तुला असं विचारायचय ना की तुम्हा सर्वांचे पेपर अपूर्ण असूनही तुम्ही तिघं पास का अणि बाकीचे फेल का?"
"जवळ जवळ तसंच"
"असं बघ, हा पेपर इतका कठीण होता की मलाही सर्व प्रश्नांची अचूक उत्तरं आली नसती! मी तुम्हाला शिकवल्यापैकी काहीच इथे डायरेक्टली विचारलेलं नाहीये. पण तुम्ही वर्गात जे शिकलांत त्याचा वापर करून, एप्लीकेशन करून हा पेपर सोडवायचा तुमचा प्रयत्न किती सफल होतोय ते मला बघायचं होतं. उद्या तुम्ही बाहेरच्या जगात जाल तेंव्हा तुम्हाला आपापल्या क्षेत्रामध्ये या ज्ञानाचा वापर करून प्रश्न सोडवावे लागतील. नुसतं शिकण्याला महत्त्व नाही, त्या ज्ञानाच्या ऍप्लीकेशनला महत्त्व आहे."

"पण जॉर्ज, मग आता या फेल झालेल्या लोकांचं काय?" जणु काही मी त्यांचा वकील!!

माझ्याकडे तीक्ष्ण नजरेने पहात जॉर्ज उद्गारला, "वेल! मॅन प्रोपोझेस ऍन्ड जॉर्ज डिस्पोझेस!! त्यांनी पुन्हा प्रयत्न करावा! विद्यार्थी जोपर्यंत माझ्या दृष्टीने तयार होत नाही तोपर्यंत मी त्याला पास करणार नाही. आणि मला टेन्यूर असल्याने याबाबतीत कोणीही माझं काहीही वाकडं करू शकत नाही."

मी गप्प राहिलो. ते पाहून जॉर्जच म्हणाला, "बरं आणखी काही प्रश्न?"
"फक्त एकच!" आता मी पास झाल्यामुळे तो माझं तसं काही बिघडवणार नाही अशी खात्री वाटल्याने मी विचारलं,

"तुम्हाला राग येणार नसेल तर विचारतो. तुम्ही विद्यार्थ्यांना स्वतःला 'जॉर्ज' असं संबोधायला का भाग पाडता? तुमच्याकडे डॉक्टरेट आहे, तुमचा इतक्या वर्षांचा अनुभव आहे, इतकी पब्लिकेशन्स आहेत, प्रचंड नॉलेज आहे, काय बिघडलं आम्ही तुम्हाला प्रोफेसर म्हटलं तर?"

मला वाटलं आता तो मला काहीतरी फेकून मारणार. पण जॉर्ज माझ्याकडे बघत राहिला.... मग शांतपणे म्हणाला....

"तू म्हणतोस ते सगळं खरं आहे. वरील सर्व गोष्टी माझ्याकडे आहेत. येस, आय टीच केमेस्ट्री, आय डू रीसर्च इन केमेस्ट्री, आय पब्लिश इन केमेस्ट्री!!! बट आय कॅन नॉट प्रोफेस ऑन केमेस्ट्री,.......यट! माझ्यामध्ये अजून तरी प्रोफेसिंगची, प्रयोग करण्याची जरूर न भासता माझी मतं अचूकतेने जाहीर करण्याची क्षमता आली नाहीये. जेंव्हा ती क्षमता येईल तेंव्हा मी जरूर स्वतःला प्रोफेसर म्हणवून घेईन. पण तोपर्यंत स्वतःला तसं म्हणवुन घेणं ही मी माझ्या प्रोफेशनल प्राईडशी केलेली प्रतारणा ठरेल!! मी ते कधीच सहन करू शकणार नाही...."

मी आ वासुन त्याच्याकडे बघतच राहिलो....

एक साठीच्या घरातला, स्वत:च्या विषयातली अंतिम पदवी असलेला, आपल्या व्यवसायाचा चाळीस वर्षांहून जास्त अनुभव असलेला, स्वत:चं केमिस्ट्रीमध्ये संशोधन अनेकवेळेला प्रसिद्ध केलेला हा शास्त्रज्ञ, हा प्रकांडपंडित, हा ज्ञानाचा हिमालय, मला सांगत होता की अजून मी प्रोफेसर झालेलो नाही....

का? तर माझा विषय प्रोफेस करायची क्षमता माझ्या अंगी अजुन आलेली नाही.....

मी काही न बोलता चट्कन उठुन त्याच्या बुटाला हात लावून नमस्कार केला....

"यू इमोशनल इंडियन्स!!!" मी अश्या प्रकारे व्यक्त केलेला आदर कसा स्वीकारावा हे न कळून तो गुरगुरला,

"नाऊ गो! गेट आउट ऑफ माय ऑफिस, समोसा!! टेक युवर करीयर सिरियसली!!! द होल वर्ल्ड इज वेटिंग फॉर यू!! मेक मी प्राऊड, माय सन!!!"

(संपूर्ण)

Friday, July 25, 2008

जॉर्ज कॉल्डवेल - भाग २

(पूर्वसूत्रः शेवटी ही लढाई मला एकट्यालाच लढावी लागणार हे निश्चित झालं! देवनारच्या खाटिकखान्यात पाऊल टाकणार्‍या बोकडाइतक्याच उत्साहाने मी दुसर्‍या दिवशी वर्गात प्रवेश केला....)

आज वर्गात जरा आधीच जाऊन पोहोचलो. बाकीच्या विद्यार्थ्यांच्या ओळखी करून घेतल्या. दोन गोर्‍या अमेरिकन मुली, दोन मुलगे, एक कोरीयन मुलगी, एक बार्बाडोसची मुलगी आणि एक चिनी मुलगा- एक मुलगी आणि मी! बस्स, संपली वर्गाची लोकसंख्या!! आम्ही एकमेकांची चौकशी करत होतो. कालच्या अनुभवावर हलक्या आवाजात बोलत होतो. आता आपल्यालाच एकमेकांना कसं सांभाळून घ्यावं लागणार आहे याबाबत एकमतास येत होतो.....

इतक्यात जॉर्ज वर्गात शिरला.....
आज त्याच्या हातात काहीही नव्हतं....

जॉर्ज सरळ स्टेजवर गेला आणि एकही शब्द न बोलता आपल्या खिश्यातून खडू काढून त्याने फळ्यावर लिहायला सुरुवात केली.....

फळ्यावर एका ऑरगॅनिक रेणूचे स्ट्रक्चर (आकॄतीबंध) तो काढीत होता. रेणू खूप कॉम्प्लेक्स होता. जसजसा तो आकृती काढत होता तसतशी त्या रेणूची मला हळूहळू ओळख पटत होती.....
त्याचे लिहून झाल्यावर त्याने वर्गाकडे तोंड केलं आणि त्याच्या घनगंभीर आवाजात प्रश्न विचारला,

"डू यू नो व्हॉट धिस इज?"
कुणीच काही बोललं नाही....

त्याची नजर सगळ्या वर्गावरून फिरत शेवटी माझ्यावर स्थिर झाली. मला बारकाईने निरखू लागली, माझं अंग कसल्यातरी अनामिक दडपणाने आकसून गेलं......

"सो मिस्टर समोसा! कॅन यू टेल मी व्हॉट आय हॅव ड्रॉन हियर?" भारतीय असलेल्या माझं नवीन नामकरण झालं होतं.....
"टॅक्सॉल! इट इज द स्ट्रक्चर फॉर टॅक्सॉल!!" मी कसंबसं उत्तर दिलं.
"करेक्ट! नाऊ मिस बहामा-ममा," त्या बार्बाडोसच्या मुलीकडे बघत तो म्हणाला, "डू यू नो व्हाय टॅक्सॉल इज इंपॉरटंट?"
तिने नकारार्थी मान हलवली. पुन्हा त्याचा मोर्चा माझ्याकडे वळला,

"समोसा, टेल हर....." मला जर टॅक्सॉलचं स्ट्रक्चर माहिती आहे तर त्याचं महत्वही माहिती असणार हे अचूक जाणून त्यानं मला आज्ञा केली.
"ते काही प्रकारच्या कॅन्सरवर औषध ठरू शकतं!", मी.
"करेक्ट!! तेंव्हा असं बघ बहामा-ममा," परत तिच्यावर जॉर्जचं शरसंधान चालू झालं, "तू जेंव्हा वयस्कर होशील ना आणि आयुष्यभर बार्बाडोसची रम अतीप्रमाणात प्याल्यामुळे तुला जेंव्हा विविध प्रकारचे कॅन्सर होतील ना, तेंव्हा त्यातले काही प्रकारचे कॅन्सर हे औषध वापरून कदाचित बरे होऊ शकतील!!!"

मी हळूच तिच्याकडे पाहिलं. अपमानामुळे आणि रागामुळे डोळ्यात उभं रहाणारं पाणी थोपवायचा ती बिचारी आटोकाट प्रयत्न करत होती.......

जॉर्जला त्याचं सोयरंसुतक नव्हतं. आता त्याने सर्व वर्गाला उद्देशून बोलायला सुरुवात केली....

"हा रेणू औषधीदृष्ट्या महत्त्वाचा तर आहेच पण गंमत अशी आहे की हा फक्त नैसर्गिक स्त्रोतांपासून वेगळा काढण्यातच आत्तापर्यंत मानवाला यश मिळालंय. प्रयोगशाळेत कॄत्रिमरित्या हा रेणू बनवायचे खूप प्रयत्न झाले. त्यातील काही थोड्याफार प्रमाणात यशस्वीही झाले पण ते सर्व सिंथेसिस इतके गुंतागुंतीचे आहेत की ते फक्त लॅबस्केलवरच करता येऊ शकतात, प्लांटस्केलवर नाही. त्यामुळे या रेणूचं मास प्रॉडक्शन सध्या अशक्य आहे. आज आपण या रेणूचा सिंथेसिस अभ्यासणार आहोत!"

त्यानंतर जॉर्ज अखंड शिकवत होता. बोलत होता, फळ्यावर लिहीत होता. समोर पुस्तक नाही, स्वतःच्या नोट्स नाहीत! त्याच्या डोक्यातून झरझर झरझर विचार येत होते......

त्याने प्रथम तो गुंतागुंतीचा रेणू मेकॅनोचे तुकडे वेगळे करावेत तसा तुकड्या-तुकड्यात विभागून दाखवला (रेट्रो-सिंथेसिस). आता, रेणू आपल्या मनाप्रमाणे वाटेल तसा कुठेही तोडता येत नाही, त्याचे काही नियम आहेत. त्याच्या अंतर्गत ऊर्जेचं वितरण लक्षात घ्यावं लागतं नाहीतर रेणू अनस्टेबल बनतो. जॉर्ज तर फळ्यावर भराभर आणि अचूक लिहीत सुटला होता. हां, मात्र त्याच्या लिखाणात कुठेहि एक वाक्य तर काय पण एक इंग्रजी शब्दही नव्हता! सगळी एकामागून एक स्ट्रक्चर्स!!!

इथे एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे. सिंथेटिक ऑरगॅनिक केमिस्ट्रीमध्ये वाक्यांना फारसं महत्त्व नसतं, महत्वाची असतात ती स्ट्रक्चर्स (रेणूंचे आकृतीबंध), ते बनवण्याच्या क्रिया, आणि त्यासाठी लागणारे विविध रीएजन्टस!! तुमच्यापैकी जे सायन्सवाले असतील त्यांना कल्पना असेल. जे सायन्सवाले नसतील त्यांनी आपल्या आसपासच्या कुणातरी बारावी सायन्सला असलेल्या विद्यार्थ्याचं पुस्तक जरूर पहावं! मात्र एक लक्षात घ्या की तो ऑरगॅनिक केमिस्ट्रीचा पहिला (१०१) कोर्स!! नुसती तोंडओळख!!! त्या पुस्तकाला जर बारीक-बारीक होत जाणार्‍या नऊ चाळण्या लावून जर त्यातून सर्व इंग्रजी शब्द जर चाळून काढून फेकून दिले आणि सर्व स्ट्रक्चर्स मात्र जर अधिकाधिक गुंतागुंतीची करत नेली जर जे तयार होईल ते ९०१ लेव्हलचं ऑरगॅनिक केमिस्ट्रीचं पुस्तक! ती एक वेगळीच सांकेतिक भाषा आहे, चकल्या-कडबोळ्यांनी बनलेली!!

टॅक्सॉलचा तो महाकाय रेणू जॉर्जने अनेक छोट्या-छोट्या रेणूंमध्ये सोडवून दाखवला. त्यानंतर विविध प्रकारचे रिएजंटस वापरुन ते छोटे तुकडे कसे बनवता येतील आणि एकमेकांशी कसे जुळवता येतील त्यावर विवेचन केलं. आम्ही भान हरपून बघत आणि ऐकत होतो! हो, अगदी बहामा-ममा सुद्धा सर्व अपमान विसरून गुंगून गेली होती.....

किरर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र!!!!!!

तास संपल्याच्या बेलने आम्हाला जाग आणली. पन्नास मिनिटं कशी गेली हे कळलंसुद्धा नव्हतं!!! जॉर्जने हातातला खडू परत खिशात टाकला आणि एकही शब्द न बोलता तो वर्गाबाहेर पडला.....

आम्ही सगळे तिथेच खिळून राहिलो. एक गोष्ट सर्वांना आता न सांगता स्पष्ट झाली होती.
हा विषय शिकवायची जॉर्जची हातोटी असामान्य होती. त्याचं विषयाचं ज्ञान बिनतोड आणि अतिशय उच्च दर्जाचं होतं. नाहीतर असा एक क्लिष्ट विषय शिकवतांना वर्गाचं भान हरपून दाखवणं ही सामान्य गोष्ट नव्हती. पुढ्यात बसलेले विद्यार्थीही काही गणेगंपे नव्हते. आम्ही सर्वांनी हा विषय यापूर्वी सलग पाच-सहा वर्षे अभ्यासलेला होता. काहींनी त्यावर स्वतंत्र लिखाणही प्रसिद्ध केलेलं होतं. असाच कुणी लेचापेचा प्रोफेसर असता तर आम्ही त्याला केंव्हाच फाडून खाल्ला असता!! केमिस्ट्री डिपार्ट्मेंटने हा अंतिम वर्ग जॉर्जला शिकवायला उगीचच दिलेला नव्हता, कदाचित त्याची सर्व दादागिरी सहन करूनसुद्धा!!!

आता त्याचा तास मी काही केल्या चुकवत नव्हतो. धावत-पळत, कधीकधी तर नोकरीवरून सुटल्यासुटल्या भुकेल्या पोटी जाउन वर्गात बसत होतो. जॉर्जच्या शिकवण्याच्या स्टाईलने तशी भूलच आम्हा सर्वांवर घातली होती.....

एकदा तर कमालच झाली. त्या दिवशी सबंध दिवसभर पावसाची रीघ लागली होती. दुपारी तर वादळी वार्‍याचं फोरकास्ट होतं. कामावरून सुटल्यावर युनिव्हर्सिटीची कॅम्पस बस पकडून वर्गात यायला मला जरा उशीरच झाला. अपराधीपणे "सॉरी, सॉरी" पुटपुटत मी वर्गात शिरलो आणि अंगावरचे पाण्याचे थेंब पुसत आता उशीरा आल्याबद्द्ल जॉर्ज मला कसा आणि किती सोलून काढतोय याची प्रतिक्षा करत राहिलो....

पण आज त्याचा मूड वेगळा होता....

"वेलकम मिस्टर इंडिया!" त्यानं माझं स्वागत केलं. आज मी समोसा नव्हतो. मग सगळ्या वर्गाकडे बघून तो म्हणाला,
"बघा, मी सांगितलं नव्हतं तुम्हाला, कितीही पाऊस पडला तरी हा येणारच म्हणून! अरे पावसाची भीती तुम्हाआम्हाला! तो तर लहानपणापासून मान्सूनचा वर्षाव सहन करत वाढलाय!!" म्हटलं तर विनोद, म्हटली तर चेष्टा. मी गप्प राहिलो.
"पण खरंच! जेंव्हा मान्सूनचा बेफाट पाऊस कोसळतो तेंव्हा तुम्ही लोकं काय करता?" त्या अमेरिकन चिमणीने खरंतर मला प्रश्न विचारला होता, पण उत्तर मात्र दिलं जॉर्जने....
"अगं त्यात अवघड काही नाही! जेंव्हा असा खूप पाऊस पडतो तेंव्हा हे लोक त्यांच्या पाळीव हत्तीच्या पोटाखाली जाऊन दडून बसतात! मग वरून कितीही पाऊस पडला तरी चिंता नाही. काय खरं की नाही मिस्टर इंडिया?" चेहरा विलक्षण मिश्किल करून जॉर्ज वदला. हे ऐकुन मलाही हसू आवरलं नाही.
"अगदी खरं!" मी दुजोरा दिला....

"नाऊ बॅक टू बिझनेस" असं म्हणून त्याने शिकवायला सुरवात केली. कुठली तरी क्लिष्ट रासायनिक अभिक्रिया होती. शिकवता-शिकवता मध्येच थांबला....

"आता जर मी या अशा स्टेप्स घेतल्या तर याच्या पुढची स्टेप काय येईल?" त्यानं वर्गाला प्रश्न केला.

हा सिंथेसिस यापूर्वी जगात कोणीच फारसा केलेला नसल्याने त्याच्या प्रश्नाचं उत्तर देणं कठीण होतं. आम्ही कोणीच हात वर केला नाही. मी तर खिडकीबाहेर नजर लावली. आभाळ काळ्याशार ढगांनी खूप अंधारून आलं होतं. आता कधीही जोराचं वादळ होणार अशी लक्षणं दिसत होती.

"सो कॅन यू गिव्ह मी ऍन आन्सर?", जॉर्जने त्या दोनापैकी एका अमेरिकन विद्यार्थ्याला विचारलं. त्यानं नकारार्थी मान हलवली....
"नुसतं डोकं हलवू नकोस, उठून उभा रहा! जरा ताजं रक्त वाहू दे तुझ्या मेंदूपर्यंत!!" जॉर्ज.
तो मुलगा गुपचूप उभा राहिला....
"आता सांग!" तो मुलगा गप्प...
"नांव काय तुझं?" नेहमी आम्हाला टोपणनावांने हाक मारणार्‍या जॉर्जला आमची खरी नांवं माहीती असायची गरजच नव्हती.
"जॉन" तो मुलगा म्हणाला.
"गुड! जॉन, घाबरू नकोस! इकडे ये" जॉन स्टेजवर गेला. त्याच्या हातात आपला खडू देत जॉर्ज म्हणाला,
"डोन्ट वरी! टेक धिस चॉक ऑफ सुप्रीम विझडम फ्रॉम मी!! ऍन्ड नाऊ राईट डाऊन द नेक्स्ट स्टेप!!!"

आम्ही सगळे त्या "चॉक ऑफ सुप्रीम विझडम" वर हसू दाबत आता जॉन काय करतो ते पाहू लागलो.....
जॉन काय करणार, कपाळ? त्याला बिचार्‍याला पुढची स्टेप माहितीच नव्हती. जॉर्जने खूपच दबाव आणला म्हणून त्याने फळ्यावर काहीतरी खरडलं. ते अर्थातच साफ चूकीचं होतं......

आम्ही सगळे श्वास रोखुन जॉर्ज या बिचार्‍या पोराचं आता काय करतो ते बघू लागलो. इतक्यात.......

कडाडऽऽऽ काऽड काऽऽड!!!!

बाहेर लख्खकन वीज चमकली आणि पाठोपाठ कानठाळ्या बसवणारा कडकडाट झाला........
आम्ही सगळेच दचकलो......
जॉर्ज स्थिर नजरेने जॉनकडे पहात होता.....

"डॅम्न यू, जॉन!!" जॉर्ज खिडकीकडे हात करत पण नजर जॉनवरच रोखून ठेवत त्याच्या खोल आणि धीरगंभीर आवाजात उद्गारला, "फरगेट मी, जॉन! बट इव्हन द गॉड हिमसेल्फ डज नॉट ऍप्रूव्ह युवर आन्सर!!!"

वर्गात हास्याचा कल्लोळ उडाला!!!

त्यामध्ये सहभागी होत जॉर्ज पुढं म्हणाला, "फ्रॉम टुडे, यू आर नॉट जॉन!! यू बीट्रेयड द गॉड!!! फ्रॉम टुडे युवर नेम इज "जूडास!!!!"

कीर्रर्रर्रर्रर्र........

हास्याच्या कल्लोळात तास संपला......
असं शिकता शिकता चार महिने कसे उलटले ते आम्हाला समजलंही नाही....
आणि दुसरा कसला विचार करायला जॉर्जने आम्हाला अवसर तरी कुठे ठेवला होता!!
मग एकदा ती वेळ आली.......
काळरात्रीची भयाण वेळ.........

(क्रमशः)

Wednesday, July 23, 2008

जॉर्ज कॉल्डवेल

तास सुरु व्हायला दोन-तीन मिनिटं शिल्लक होती.

मी घाईगडबडीतच वर्गात शिरलो. वर्गात माझ्याखेरीज आणखी फक्त दहा-बारा मुलं-मुली जमली होती. त्यात अस्वाभाविकही काही नव्हतं! सेंद्रीय रसायनशास्त्राचा (ऑरगॅनिक केमिस्ट्री) ९०१, म्हणजे शेवटचा वर्ग होता तो! या विषयाची मास्टर्सची डिग्री तुमच्याकडे असल्याशिवाय वा तुम्ही ६००, ७०० आणि ८०० लेव्हलचे वर्ग उत्तीर्ण केल्याशिवाय या वर्गात मुळी प्रवेशच नव्हता!! या वर्गात असणारे फक्त रसायनशास्त्रज्ञ, फार्मासिस्ट, बायोटेक्नॉलॉजिस्ट!!

दोन हजार पानांचं एक जाडजूड पुस्तक या चार महिन्यांच्या क्लासला सिलॅबस म्हणून लावलं होतं!! ते बघूनच माझी छाती दडपून गेली होती. पुढले चार महिने अगदी पिट्टा पडणार होता!! पण काय करणार, जर डिग्री हवी असेल तर हा कोर्स पास होणं आबश्यकच होतं, तसा युनिव्हर्सिटीचा नियमच होता....

एक रिकामी जागा बघून मी टेकतो न टेकतो तर दाण दाण दाण असा पावलांचा आवाज करीत प्रोफेसरसाहेब वर्गात शिरले. त्यांच्याहि हातात असलेलं ते जाडजूड पुस्तक त्यांनी धाडकन त्यांच्या पुढ्यातल्या टेबलावर आदळलं. सगळ्या वर्गाकडे बॅटसमन जशी फिल्डींग बघून घेतो तशी नजर फिरवली. आणि अतिशय घनगंभीर आवाजात बोलायला सुरवात केली,

"धिस इज ऑरगॅनिक केमिस्ट्री ९०१ क्लास!! फॉर दोज ऑफ यू हू डिड नॉट नो दॅट, धिस इज द राईट टाईम टू गेट अप ऍन्ड गेट लॉस्ट!!"

कुणीच उठलं नाही. बहुदा सगळ्यांना आपण कुठे आलोय हे माहिती असावं!!

"गूड!! माय नेम इज जॉर्ज कॉल्डवेल!! आय हॅव बीन टीचिंग धिस क्लास फोर द लास्ट टेन इयर्स! यू विल कॉल मी जॉर्ज!! इफ आय हियर यू कॉलिंग मी एनिथिंग एल्स, प्रोफेसर ऑर समथिंग एल्स, आय विल बीट द क्रॅप आउट ऑफ यू!!!"

आयला, हा तर फुल धतिंग प्रोफेसर दिसतोय, माझ्या मनांत आलं!

"पण तुम्ही आम्हांला काय हाक मारणार?" एक अमेरिकन विद्यार्थिनी चिवचिवली. तिच्याकडे अत्यंत तुच्छतेने बघितल्यासारखं करीत जॉर्ज म्हणाले,

"दॅट इज टोटली अनइंपॉर्टंट फॉर मी. मी तुम्हाला कदाचित तुमच्या प्रथम नांवाने हाक मारीन, किंवा त्यावेळेस माझा मूड जसा असेल त्याप्रमाणे एखादं टोपणनांवही ठेवीन!! पण एक नीट ध्यानात ठेव, जसजसा हा कोर्स पुढे जात राहील तसतसं मी तुम्हाला काय हाक मारली यापेक्षा मी जर तुमचं नांवच घेतलं नाही तर तुम्हाला जास्त आनंद होईल."

वर्गात सन्नाटा पसरला. सगळे जॉर्जच्या नजरेला नजर न देता खाली नजर लावून बसले......

इतक्यात पुन्हा दाणकन आवाज झाला म्हणून आम्ही दचकून वर पाहिलं. जोर्जने ते दोन हजार पानी पुस्तक उचलून परत टेबलावर आदळलं होतं......

"हे पुस्तक सिलॅबसला लावलंय युनिव्हर्सिटीने!! हे वाचायची आणि शिकायची जबाबदारी तुमची!! लिहा-वाचायला येतंय ना? उत्तम!! कारण मी यांतलं काहीही शिकवणार नाहीय!!"

अरे म्हणजे मग हा बाबा शिकवणार तरी काय? आणि ते दोन हजारपानी पुस्तक कोणीही न शिकवता आम्ही आत्मसात करायचं तरी कसं? पण जॉर्जचं अजून समाधान झालं नव्हतं!! त्यानं भराभरा फळ्यावर लिहायला सुरुवात केली. तो फक्त आद्याक्षरं लिहीत होता, मी तुमच्या सोईसाठी कंसात फुलफॉर्म लिहिलाय......

जे. ऍम. केम. सॉक. (जर्नल ऑफ अमेरिकन केमिकल सोसायटी)
जे. ओ. सी. (जर्नल ऑफ ऑरगॅनिक केमिस्ट्री)
जे. सिन. ऑर्ग. केम. (जर्नल ऑफ सिंथेटिक ऑरगॅनिक केमिस्ट्री)
टेट. लेट. (टेट्राहेड्रॉन लेटर्स)

"या चार नियतकालिकांचे गेल्या वर्षाचे सर्व अंक परीक्षेसाठी अभ्यासाला असतील. जर्नल कसं वाचायचं ते तुम्ही आत्तापर्यंत शिकला असालच! नसलात तरी मी शिकवणार नाही!! आर्ट्स डिपार्टमेंटला कुठेतरी प्लेबॉय कसा "वाचायचा" ते शिकवणारा एखादा कोर्स असेल तर तो घ्या!"

आम्ही इतके दडपुन गेलो होतो कि त्याच्या प्लेबॉयवरच्या विनोदाला हसायचंसुद्धा कुणाला भान नव्हतं!! अहो कसं असणार? या सर्व जर्नल्सचे दर महिन्याला (काहींचे तर दर आठवड्याला) प्रत्येकी दोनशे पानांपेक्षा मोठे अंक निघतात!! अहो गेल्या अख्ख्या वर्षाचे अंक झाले किती? आणि त्यांची पाने झाली किती? आता ते दोन हजारपानी पुस्तक एकदमच क्षुल्लक वाटायला लागलं होतं!!

"तुम्हाला माहिती आहेच की हा नुसता थियरी कोर्स नाही, याच्यासोबत लॅबही (प्रॅक्टीकल) आहे. चला, आपली लॅब बघून येऊ!!" असं म्हणून जॉर्ज वर्गाबाहेर पडला....

आम्ही सगळे त्याच्या मागोमाग जाऊ लागलो. लॅबोरेटरी इमारतीच्या दुसर्‍या टोकाला होती...
बरोबर चालता चालता मी जॉर्जचं निरीक्षण करत होतो. साडेपाच फूट उंची, किंचित स्थूल शरीरयष्टी, गोरा कॉकेशियन वर्ण, निळे डोळे, चेहर्‍यावर कार्ल मार्क्ससारखी भरघोस पण बरीचशी पांढरी झालेली ब्राऊन दाढी, अंगात प्रोफेसरांचा पेटंट ढगळ सूट आणि नाकावर ओघळलेला चष्मा!!

कोणाचाही प्रेमळ आजोबा शोभेल असं रूप होतं! पण त्याच्या अगदी विरूद्ध अतिशय घनगंभीर व खणखणीत आवाज, अगदी जेम्स अर्ल जोन्स सारखा, आणि अत्यंत तिखट जीभ!! जिचा पहिला प्रत्यय आम्ही काही मिनिटांपूर्वीच घेतला होता.....

लॅबमध्ये गेल्यावर तिथल्या असिस्टंटने आम्हाला आपापले टेबल्स, लॉकर्स वाटून दिले. आम्हाला वाटलं संपलं! पण जॉर्जच्या हातात एक कागदी पाकीट होतं. त्यातून त्याने काही चाव्या बाहेर काढून आम्हाला प्रत्येकी एक दिली.

"ही या लॅबच्या मुख्य दरवाजाच्याची चावी!! माझ्यावर विश्वास ठेवा, एकदा हा कोर्स सुरू झाला की तुम्हाला इथे फक्त ८ ते ५ अशा कामाच्या वेळेत येऊन प्रयोग करायला वेळ मिळणार नाही. रात्री-बेरात्रीच काम करावं लागेल. त्यासाठी ही चावी!! माझा सल्ला असा आहे की दिवसा जर वेळ मिळाला तर तो लायब्ररीत घालवा आणि रात्री इथे काम करा. तरच तुमच्याने निभेल."

आम्ही विद्यार्थ्यांनी एकमेकांकडे पाहिलं. एकमेकांची ओळख नसूनही परस्परांच्या भावना समजल्या! आता समदु:ख्खी होतो ना आम्ही!!

"सगळेजण इकडे या", जॉर्ज एका खिडकीशी उभा राहून आम्हाला तिथे बोलावीत होता. आता काय आणखी? आम्ही तिथे गेलो. पहिल्या मजल्यावरच्या खिडकीतून बाहेर खाली काही उंचवटे आणि काही खड्डे दिसत होते. काही उंचवटयांवर हिरवळ होती, काहींवर नव्हती. सगळीकडे उत्तम लॅन्डस्केपिंग असलेल्या त्या युनिर्सिटीमध्ये हा भाग अगदी विद्रूप दिसत होता. कदाचित काम अर्धवट झालं असावं.......

"तुम्हाला माहितीय हे काय आहे?", जॉर्ज भविष्यवाणी केल्याप्रमाणे म्हणाला, "माझ्या या कोर्सचा मानसिक ताण सहन न होऊन मध्येच आत्महत्या केलेल्या माजी विद्यार्थ्यांची ही थडगी आहेत! आणि ते खोदलेले खड्डे आहेत तुमच्यासाठी!! तुमच्यापैकी किती जण ते वापरतात ते आता बघायचं!!! हा, हा, हा, हा!!!!!!"

साला, याला आता माणूस म्हणायचं की हैवान!!!!

त्यानंतर उरलेला दिवसभर मी बेचैन होतो. मनात जॉर्ज आणि त्याचा कोर्स सोडून दुसरे विचारच येत नव्हते. सायंकाळी कट्ट्यावर मला गप्प गप्प पाहू मित्रांनी छेडलं.....

'काय बाबा, तू आज गप्प कसा?"
"अरे तो प्रेमात पडला असेल! कुठल्यातरी निळे डोळेवालीच्या!" दुसर्‍याने माझी फिरकी ताणायचा प्रयत्न केला....
" तिच्यायला, प्रेमात कसला पडतोय, इथे गळ्याला फास लागायची पाळी आलीय", मग मी त्यांना सगळा किस्सा सांगितला....
'जॉर्जच्या ९०१ कोर्समध्ये आहेस तू?" मला सिनीयर असणारा विनोद खिदळला, " मग फूल मेलास तू!! थडगी दाखवली की नाही त्याने? आत्ताच कोणतं ते निवडून ठेव!!"

याला म्हणतात शुभ बोल रे नार्‍या!!!

"तू पास केलायस हा कोर्स?" मी आशेनं विचारलं. चला, जॉर्ज कसा शिकवतो ते तर कळेल, कदाचित जुन्या नोट्सही मिळतील!!
"मी? हॅ!!!! पहिल्या चाचणी परीक्षेतच माझी दांडी उडाली. तिथेच सोडला तो कोर्स!!! आता तर त्याच्या समोरही उभा रहात नाही मी! दुरून तो येतांना दिसला तर मी फुटपाथ बदलतो. तिच्यायला, त्याच्याकडून कातडी सोलून घेण्यापेक्षा थोडं जास्त चालावं लागलं तरी हरकत नाही!!"
"तुझं ठीक आहे, तू जेनेटिक्सचा विद्यार्थी! तुला हा कोर्स नाही घेतला तरी चालण्यासारखं आहे. पण मला तो घेतलाच पाहिजे डिग्री मिळवण्यासाठी!" मी.
"म्हणुनच तर म्हटलं की तू मेलास आता! काय इंडियात आई-वडिलांना काही अखेरचा निरोप वगैरे द्यायचा असेल तर देऊन ठेव!!" विनोद आणखीनच चेकाळला.....
"ए तुमको एक बॉत पूछूं क्या? गोस्सा मोत कोरना", शोन्मित्र म्हणाला, "तुमारा ओर होमारा साइझ तो एक हॉय. अगर तुम मर गोया तो तुमारा सब कपडा मै लिया तो चोलेगा क्या?"

हे असले हलकट मित्र असल्यावर आणखी काय पाहिजे!! साल्याला माझ्या मरणापेक्षा माझे कपडे जास्त महत्त्वाचे वाटत होते......

शेवटी ही लढाई मला एकट्यालाच लढावी लागणार हे निश्चित झालं....
देवनारच्या खाटिकखान्यात पाऊल टाकणार्‍या बोकडाइतक्याच उत्साहाने मी दुसर्‍या दिवशी वर्गात प्रवेश केला....


(क्रमशः)

Tuesday, July 22, 2008

ईश्वर

माझ्या अनंत पसार्‍यात मी आज एकटाच बसलोय!
नेहमीप्रमांणे कृतकॄत्य न वाटता आज मन अगदी क्षुब्ध झालंय!!
राहून राहून माझी नजर त्या गोलकावर जात्येय......
तसं मी हे सर्वच विश्व जन्माला घातलं.....
पण मी अतिशय हौसेनं जन्माला घातलेला तो गोलक........
पाण्याच्या प्रभावाने टचटचीत फुगलेला तो गोलक....
त्याची किती निगराणी केली होती मी.....
किती जोपासना केली.......
वेळोवेळी काळजी घेतली, आवश्यक ती उपाययोजना केली........
अनेक आजारांतून त्याला वाचवला........
आणि अखेरीस तो अगदी परिपक्व केला....
मलाच केव्हढा अभिमान वाटला होता स्वतःचा त्यावे़ळेस........
रसरशीत आणि टचटचीत.......
सर्व योग्य परिस्थिती मी निर्माण करून ठेवली होती.......
मीच निर्माता त्याचा.....
मीच ईश्वर त्याचा......
सर्वशक्तिमान, सर्वनियंता परमेश्वर.......
आणि एके दिवशी ती जात निर्माण झाली.........
मी कौतुकाने पहात होतो.......
जात हळूहळू वाढली.......
मी पहात होतो......
हळूहळू त्या जातीने आपले हातपाय पसरायला सुरुवात केली......
मी निर्माण केलेल्या नैसर्गिक स्त्रोतांचा उपभोग घ्यायला सुरवात केली......
पहाता पहाता त्यांचा हा उपभोग हाताबाहेर गेला.......
हावरटपणापायी त्यांनी ह्या स्त्रोतांची प्रमाणाबाहेर नासाडी करायला सुरुवात केली........
जे अगोदरच हा स्त्रोत वापरत होते त्यांनी वापरात काटकसर करायला नकार दिला.....
जे हा स्त्रोत पूर्वी वापरत नव्हते त्यांनी "हा स्त्रोत काय तुमच्या बापाचा" असं म्हणून तो स्त्रोत नव्या दमाने वापरायला सुरुवात केली.......
काही समझोता घडवून आणण्यात ते अशयस्वी ठरले........
कारण एकच.......
हाव, तृष्णा, सूडबुद्धी...........
त्यांनी त्या स्त्रोतांसाठी आपापसात लढायला सुरुवात केली......
एकमेकांना बेचिराख करायला सुरुवात केली.........
आणि या आपापसातल्या भांडणात त्यांनी मी निर्माण केलेल्या या गोलकाची विल्हेवाट लावायला सुरवात केली.......
सत्यानाश केला त्यांनी त्या स्त्रोतांचा.......
बघा, बघा त्या गोलकाकडे एकदा.....
एकेकाळचा तो रसरशीत परिपक्व गोलक आज कसा झाकोळून, कोमेजून गेलाय.........
रसरशीतपणा कधीच निघून गेलाय.......
माझीच निवड चुकली! हा गोलक आणि ही जात जगायच्याच लायकीचे नाहीत.......
माझा राग अनावर झालाय......
माझ्या अनंत पसार्‍यात हा गोलक असला काय आणि नसला काय! काहीच फरक पडत नाहीय.......
माझा राग पराकोटीला पोचतो.........
मी रागारागाने तो गोलक उचलतो........
आणि सर्व शक्ती एकवटून त्या आगीच्या लोळात फेकून देतो.......
गोलक आगीत आपटतो, फट्कन फुटतो......
लालभडक रस सगळीकडे पसरतो.........
आगीत होरपळून मरणार्‍या त्या जातीचा दुर्गंध सगळीकडे पसरतो........
मी एका अतीव समाधानाने त्याकडे पहात रहातो........
एक विश्व समाप्त झालंय.......
एक जमात पूर्णपणे नष्ट झालीय......
मी सर्वशक्तीमान परमेश्वर.......
जगन्नियंता, सर्वनाशक.........
एका जगाचा मी पूर्ण नाश घडवून आणलाय.....
पण....
पण तरीही मला समाधान वाटत नाही........
परिपूर्ण शक्तिमानतेची भावना माझ्या मनाला स्पर्शत नाहीय..........
उलट......
उलट एका अनामिक भीतीने मन झाकोळून आलंय........
का? का? का?.......
मी निर्माण केलेला, जोपासलेला हा एक गोलक......
माझ्या बागेतला एक टोमॅटो......
साल्मनेला आणि ई-कोलाय यांनी त्याचा सत्यानाश केला म्हणून रागावून मी तो नष्ट केला........
पण मनात भीती ही साचलीय की........
माझा "ईश्वर" सुद्धा "माझ्या" गोलकाविषयी असेच विचार करत असेल का?............

(निवेदनः काही दिवसांपूर्वी साल्मनेला वा इ-कोलाय यासारख्या जीवाणूंनी प्रादुर्भाव केला होता म्हणून अमेरिकन डिपार्टमेंट ऑफ एग्रिकल्चरने कॅलिफोर्नियात सर्वत्र टॉमॅटो विकायला बंदी केली होती. लोकांचे आरोग्य बिघडू नये म्हणून लक्षावधी टन फ्रेश टोमॅटो त्यांनी भस्मसात केले. त्या वेळेस सुचलेली ही संकल्पना......)