Sunday, June 29, 2008

नास्तिक!

प्रथमच सांगतो की मी एक नास्तिक माणूस आहे.
"प्रारंभी विनंती करू गणपती, विद्यादयासागरा...."
माझा मुलगा गजाननाच्या तसबिरीपुढे हात जोडून उभा असतो...
मी ही त्याच्या मागे उभा रहातो.
माझं मन आक्रंदून उठतं, " अरे तुझा विश्वास नाही या सगळ्यावर, सर्व थोतांड आहे ते!!"
मनाला न जुमानता नकळत डोळे मिटतात, मस्तक लवतं.....
काय जादू आहे ही?
पुन्हा सांगतो की मी पूर्ण नास्तिक आहे....
एका ब्राम्हणाच्या घरांत जन्माला आल्यामुळे सर्व ब्राम्हणी संस्कार झाले. पण माझा त्याला काहीच इलाज नव्हता. माराला भिऊन लहान मुलं काहीही शिकू शकतात......
नंतर मोठं होतांना असं लक्षांत आलं की ही आपल्या आजूबाजूची लोकं कुणाच्याही अन् कशाच्याही पाया पडतात.....
गावाच्या वेशीवरचा एक धोंडा, तो म्हसोबा, देव कसा होऊ शकेल?
आणि जर तेच लॉजिक वापरलं तर मग कोणतीही मूर्ती, मग ती दगडाची असो वा धातूची, देव कशी होऊ शकेल?
याऊप्परही जर त्या मूर्तीत देवत्व आहे असं मानलं, तर ती काढून नवी मूर्त बसवतांना,
"यांतु देवगणासर्वे, पूजामादाय पार्थिवे,
इष्टकामना प्रसिद्ध्यर्थं, पुनरागमनायचं!"
असं म्हणून तिचं विसर्जन कसं करता येईल?
मनांत विचारांचा नुसता कल्लोळ!!!
सगळं शालेय जीवन याच आंदोलनात गेलं.....
लहान असतांना मी बर्‍याच वेळा टिटवाळ्याच्या गणपतीला जात असे. आधी आई-वडिलांबरोबर आणि नंतर कॉलेजात असतांना कधी कधी एकटाही....
तेंव्हा ते देवस्थान आजच्याइतकं लोकप्रिय नव्हतं. चतुर्थी सोडुन गेलं तर मंदिरात एक पुरोहित आणि चार-पाचच भक्तगण असायचे. मंदिरही आजच्याइतकं मोठं नव्हतं. किंबहुना एका सरोवराकाठचं ते एक निर्जन मंदिर होतं.
गाभार्‍यात अथर्वशीर्ष म्हणत तासभर जरी बसलं तरी पुजारी बाहेर काढायची घाई करीत नसत. उलट अखंड अथर्वशीर्षाचं पारायण करणार्‍या भक्ताकडे कौतुकानेच बघत असत.....
आता टिटवाळ्याच्या गणपतीचे ते कमर्शियल रूप पाहिल्यानंतर तर तिथे देव नांदणे शक्यच नाही याची खात्री पटते......
त्यानंतर माझ्या नशिबाने (चांगलं वा वाईट म्हणा!) मी सायन्सचा विद्यार्थी झालो......
स्वतःला पडताळा आल्याशिवाय, सर्वांनी पडताळून डॉक्युमेंट केल्याशिवाय कशावरही विश्वास न ठेवण्याची सवय अंगी लागली......
त्याचबरोबर आपल्याला जे दिसत नाही (एक्स रे, गॅमा रे, वगैरे) ते प्रत्यक्षात अस्तित्वात असू शकतं याची विनयपूर्वक जाणीवही झाली.....
आईवडिलांचं घर सोडून स्वत:चं घर स्थापन केल्यावर त्या नव्या घरात देवाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झालीच नाही....
आज जर मला विचाराल तर,
"जगात परमेश्वर आहे का?" याचं उत्तर मी असं देऊ शकेन की,.....
'असावा! कारण अजूनही जगात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचा सायन्सला उलगडा करता येत नाही....
या रॅन्डम विश्वातही अनेक पॅटर्नस दिसून येतात ते कशामुळे? त्या पॉवरलाच ईश्वर म्हणतात का?
पण जर ईश्वर असेलच तर तो एखाद्या मूर्तीच्या स्वरूपात तर नक्कीच असणार नाही. ती एक अमूर्त ऍबस्ट्रॅक्ट पॉवर असेल.......
माझ्यासारख्या एका क्षुद्र जीवाकडे लक्ष द्यायला त्याला मुळीच अवसर असणार नाही. मी त्याची प्रार्थना करीत आयुष्य घालवतोय की माझी कर्मं करीत जीवनकाल कंठतोय याला त्याच्या दृष्टीने काहीच महत्त्व नाही......
मुंग्यांच्या वारूळावर कुणी फ्लीट फवारल्यावर मरणार्‍या मुंग्या, आणि या अनंत विश्वाच्या पसार्‍यात मरणारा मी याच्यात त्याच्या दृष्टीने काहीच फरक नाही.....
मग कशाला ती मूर्तिपूजा आणि कशाला तो देव?
या जगात आपण एकटेच असतो! इथे आल्यानंतर आपल्या मानसिक सुरक्षिततेसाठी नातेसंबंध बांधतो, आई, बाप, भाऊ बहीण, बायको, पोरं, मित्र वगैरे.....
काही रक्ताच्या नात्याचे, काही मानलेले.......
पण आपण प्रत्यक्षात एकाकीच असतो! एकटेच जगतो आणि निघायची वेळ झाली की एकटेच निघून जातो!! इष्ट्मित्रांसाठी आपल्या तेराव्याच्या मिष्टान्नाची सोय करून....
जमेल तितक्या संतांची, महात्म्यांची शिकवण आणि त्यांची प्रत्यक्ष आयुष्यं अभ्यासून पाहिली....
आणि लक्षांत आलं ते हेच, त्यांनी आयुष्यभर काय वाटेल ते सांगितलं असेल, वाटेल तो उपदेश लोकांना केला असेल,
पण ते मर्त्य माणसांसारखेच जगले आणि मर्त्य माणसांसारखेच मेले......
जगाला मुक्ततेचा पाठ शिकवणारा गौतम बुद्धसुद्धा अपचन होउन गेला........
एकवचनी रामालाही शरयूच्या पाण्यात आत्महत्या करावी लागली.......
"अर्थशून्य भासे मज हा, कलह जीवनाचा,
धर्म, न्याय, नीती सारा, खेळ कल्पनेचा"
या सर्व विचारांतुन माझी नास्तिकता जन्माला आली.....
ईश्वराचं अस्तित्व मी नाकारीत नाही, पण मला स्वतःला अनुभव आल्याखेरीज मी त्यावर विश्वास ठेवणार नाही......
आणि जो मला त्याच्या अनुभव देऊ शकत नाही त्याला मी संत वा महात्मा मानू शकत नाही, मग तो वाटेल ती बडबड करीत असो.......
या भूमिकेत अनेक वर्षे गेली असतांनाच एक दिवशी बॉस्टनमधे माझ्या एका गुजराथी मित्राच्या घरी गेलो होतो. त्याच्याकडे भिंतीवर गजाननाची एक सुरेख प्रतिमा लावलेली होती. उत्तरेकडचा वा दाक्षिणात्य गणपती नाही तर एकदम अस्सल महाराष्ट्रीय गणपती!
"रत्नखचितवरा तुजगौरीकुमरा" पासून "रुणुझुणुती नुपूरे चरणी घागरीया" पर्यंत सर्व लक्षणे असलेला! मी आरती मनातल्या मनात म्हणून सर्व लक्षणे मोजुन पाहिली.....
मला अनिमिषपणे त्या चित्राकडे पहातांना पाहून तो मित्र म्हणाला,
"क्या पसंद आयी? तुम्हारे महाराष्ट्रकाही गणेश है"
"बहुत बढिया प्रतिमा है, लेकिन तुम्हें कहांसे मिली?" मी.
"तुझें क्या करना है, कहांसे मिली? लेकिन मेरे पास इसकी और एक कॉपी है, मंगता है तो लेके जाव..."
मी भारावल्यासारखी मान डोलावली......
ते चित्र घेउन घरी आलो आणि विचारात पडलो,
"काय केलं मी हे?"
माझा मूर्तिपूजेवर अजिबात विश्वास नाही. त्यातही ईश्वर जर असलाच तर तो हत्तीचं मुख आणि मानवी धड या स्वरूपात असेल यावर तर काडीचाही विश्वास नाही. मग मी ही प्रतिमा का स्वीकारली?
असो. दिसतेय तर खास मूर्त, आपल्या भारतीय संस्कृतीची निशाणी असू देत म्हणून ती मी फ्रेम करून घेतली आणि शो-पीस म्हणून लिव्हिंगरूममध्ये एका भिंतीवर टांगली.....
माझ्या मुलाच्या आईचा देवावर विश्वास असल्याने तिने मुलाला संस्कार शिकवतांना तीच प्रतिमा वापरली. नाहीतरी घरात इतर देव नव्हतेच!!
आता मोठा झाला तरी अजूनही तो आणि त्याची आई त्याच मुर्तीपुढे हात जोडून उभे रहातात........
मुलखाचे अंधश्रद्ध नाहीतर!
मी मुळीच तसा उभा रहात नाही. मी माझी बुद्धीवर विसंबून रहाणं जास्त पसंत करतो!!
पण मग....
पण मग रोज सकाळी आंघोळ करुन झाल्यावर टॉवेलाने अंग पुसतांना नकळत माझ्या तोंडून,
"प्रणम्य शिरसां देवं, गौरिपुत्रं विनायकं, भक्तावाचं स्मरे नित्यं आयु:कामात सिद्धये..."
हे निघतं ते कशामुळे?.......
खूप विचार केला हे कोडं सोडवायचा! आणि सरते शेवटी या निर्णयाला आलोय!!
नसेल माझा कोणत्याही दैवतावर विश्वास! नसेन मी कुणाचाही भक्त!!
पण ही गणेशाची मूर्ती तर भावते ना मला? या गणेशमूर्तीचा चाहता तर आहे ना मी?
मग त्याचा मित्र बनायला तर काय हरकत आहे?
मी अजुनही एक पूर्ण नास्तिक मनुष्य आहे....
पण मित्रहो, या गजाननाचा मी एक स्नेही म्हणून स्वीकार केला आहे.......

(डिक्लेमरः वरील स्फुटात मांडलेली भूमिका ही सर्वस्वी माझी आहे. वाचणारी व्यक्ती कायद्याने सज्ञान व स्वतःचा असा सारासार विचार करणारी असेल हे गृहीत धरून ती मांडली आहे. दुसर्‍या कोणालाही त्यातून काहीही संदेश, उपदेश द्यायची, काही पटवायची, वा कोणताही प्रचार करण्याची अजिबात इच्छा नाही!!!)