Saturday, November 15, 2008

संगणक आणि मराठी साहित्य!

फार फार काळापूर्वीची गोष्ट....
अगदी साठी-सत्तरीच्या दशकातली!
हल्लीच्या तरूण पिढीला अगदी पुराणातल्या भूर्जपत्रावरील वाटावी अशी कथा!!
मराठी तरूण तेंव्हा नुकतेच सीमोल्लंघन करून सातासमुद्रापार जायला सुरवात झाली होती....
नाही म्हणजे, त्यापूर्वीही ते परदेशी शिकायला जात असत. पण ते म्हणजे इंग्लंडला, तांत्रिक शिक्षण असेल तर जर्मनीला. मराठी विद्यार्थ्यांनी कोलंबसाच्या देशात शिक्षणाला जायची सुरुवात प्रामुख्याने साठी-सत्तरीच्या दशकातच सुरू झाली.
आयआयटीतून निघालेले ते बुद्धिमान आणि महत्त्वाकांक्षी तरूण!
सहस्ररश्मी सूर्याप्रमाणे जणू अवघं आकाश पादक्रांत करण्यास निघाले होते....
या नवीन जगात त्यांना सगळंच अपरिचित होतं. तत्कालीन सर्वसामान्य अमेरिकावासीयांना तेंव्हा भारत हा एक शांतताप्रिय पण मागासलेला देश आहे यापेक्षा फारसं अधिक काही माहिती नव्हतं. तेंव्हा मी इंडियन आहे असे सांगितल्यावर प्रश्न यायचा की कोणती जमात? (विच ट्राईब?) संदर्भ अर्थात रेड इंडियन लोकांचा....
त्या तरूणांच्या विद्यापीठांमध्ये जरी अत्युच्च पातळीवरचं शिक्षण दिलं जात होतं पण बहुतांशी पारंपारिक पद्धतीचं होतं. तसे संगणक होते पण ते पंचकार्डवाले किंवा अगदी पुढारलेले म्हणजे २८६, ३८६. "खिडक्या" नव्हत्या. आज्ञावली पाठ करायला लागायच्या (एफ१० = सेव्ह फाईल!). क्रे सुपरकॉम्प्यूटरवर तुम्हाला सीपीयू टाईम मिळणे ही तुमच्या संशोधनासाठी अभिमानाची आणि किंचित गर्वाचीही बाब असे. इ-मेल टेक्स्ट स्वरूपात होती पण भारतातील लोकांकडे ती नसल्याने तिचा मराठी घडामोडी समजून घेण्यासाठी काही उपयोग नव्हता. पाठवलेले पत्र भारतात पोचायला तीन आठवडे आणि दिलेले उत्तर (लगेच दिले असेल तर!) परत मिळायला आणखी तीन आठवडे सहज लागत. त्यामुळे कौटुंबिक खुशाली जरी समजली तरी सामाजिक चर्चा करणे शक्यच नव्हते. फोनही ट्रंक कॉल! एकतर ते परवडत नसत आणि ते भरवशाचेही नसत. कधी लाईन डिस्कनेक्ट होईल याचा नेम नसे...
खिडक्या (विंडोज) आल्या आणि चित्रच बदललं. पेंटियम टेक्नॉलॉजी आणि मायक्रोसॉफ्ट विंडोज यामुळे सुशिक्षित पण सामान्य माणसापर्यंत संगणक जाऊन पोहोचला. ए-मेल्समुळे तात्काळ संपर्क साधता येऊ लागला. अटेचमँट पाठवायच्या सोईमुळे विचारांची देवाणघेवाण सुलभ झाली. त्यातच संकेतस्थळे आणि वैयक्तिक ब्लॉग्ज करता येऊ लागले आणि मराठी (आणि जागतीक) साहित्यविश्वात जणू क्रांतीच झाली. आधी आपली माणसे रोमन लिपी वापरून मराठी लिहू लागली. त्यानंतर काही बुद्धिमान मराठी मुलांनी इंग्रजी क्व्रर्टी कळफलक वापरून मराठी लिहिता येईल असे प्रोग्राम्स रचले आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते पब्लिक डोमेनमध्ये (विनामोबदला उपलब्ध) ठेवले. मराठी भाषेवर आणि साहित्यावर या मुलांचे अनंत अनंत उपकार आहेत. त्यांच्यामुळे आजवर इंजिनियर, शास्त्रज्ञ अशा अरसिक (?) व्यवसायात गुंतलेल्या अनेक मराठी माणसांची प्रतिभा जणू उफाळून आली. तीच गोष्ट संकेतस्थळांच्या मालकांची! पदराला तोशीस सोसून त्यांनी मायबोली, मिसळपाव, उपक्रम, मनोगत यांसारखी संकेतस्थळे चालू ठेवली आहेत. उद्या जर मराठी भाषेचा इतिहास लिहिला गेला तर या दोन गोष्टी देणार्‍या व्यक्तिंना तिथे मानाचं पान द्यावंच लागेल. घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती या उक्तीप्रमाणे घरोघरी मराठी माणसे ललित लिखाण करण्याचा प्रयत्न करू लागली. संकेतस्थळांवर जाऊन चर्चा, विचारविनिमय, आणि हो, कधीकधी भांडणेही करू लागली. आणि सर्व गोष्टींचा मराठी साहित्यावर बहुअंगाने परिणाम झाला.

प्रथम म्हणजे महाराष्ट्रातील स्थानिक मराठी वृत्तपत्रे जालावर उपलब्ध झाली. एकाच एक वर्तमानपत्राची वर्गणी लावून तेच ते वाचण्याची सक्ती संपली. जर तुमच्याकडे जाल असेल आणि वाचनाची ताकद व वेग असेल तर तुम्हाला ८-१० वर्तमानपत्रे रोज वाचण्याची सोय उपलब्ध झाली. लोकसत्ता, मटा, सकाळ या आघाडीच्या दैनिकांबरोबरच लोकमत, पुढारी, गोमांतक वगैरे प्रांतिक (रीजनल) वर्ततमानपत्रे जालावर वाचायला मिळू लागली. त्यातून फायदा हा झाला की अग्रगण्य वृत्तपत्रांचे आपल्या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाविषयीचे अज्ञान किती थोर आहे याची वाचकांना जाणीव झाली. महाराष्ट्र म्हणजे मुंबई, पुणे नागपूर व औरंगाबाद नव्हे आणि मराठी माणसाचा हुंकार हा तथाकथित आयटी/औद्योगिक उद्द्योगात काम करणार्‍या माणसाचे मनोगत नव्हे याची जाणीव झाली. विदर्भातल्या आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍याची समस्या किती भीषण आहे ते मुंबई-पुण्यातल्या पोकळ चर्चेपेक्षा (जी चर्चा मानवी जीवांच्या आत्महत्या आणि एका मंत्र्याच्या मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी चाललेल्या कारवाया एकाच मापात मोजते!) किती भिन्न आणि गंभीर आहे ते समजलं.

दुसरे म्हणजे मराठी मनाचा आत्मविश्वास वाढला. मी काहीतरी रुटूखुटू का होईना पण लिहू शकतो. ते लोकांना आवडू शकतं हे समजल्यामुळे अजून लिहिण्याची, वैचारिक असो वा ललित, इच्छा निर्माण झाली. पूर्वी मराठी लिखाण म्हणजे विद्यापीठात हायर मराठी घेतलेल्या विद्वान प्राध्यापकांचे काम! ही आपली लाइन नव्हे हा जो काही न्यूनगंड सायन्स आणि कॉमर्सच्या मुलांमध्ये होता तो नाहीसा झाला. ही मुलं प्रथम आपल्या अभ्यासाच्या विषयावर आणि नंतर (हळूच! गुपचूप!! टोपण नावाखाली!!!) ललित लेखन करुन पाहू लागली. मुळात अतिशय बुद्धिमान असल्याने त्यांनी लिहिलेलं लिखाण कसदार ठरू लागलं. मराठी साहित्याच्या दालनात एक अल्हाददायक, मोकळी हवा खेळू लागली. नवीन ताज्या दमाची जाल-लेखकांची फळी निर्माण झाली. वर्ड प्रोसेसिंगचा आणखी एक फायदा म्हणजे लिखाणात सुधारणा करण्यासाठी लिहिलेले कागद फाडून पुनःपुनः लिहिण्याची सक्ती संपली. वर्ड प्रोसेसरच्या स्क्रीनवर तिथल्यातिथे सुधारणा करता येऊ लागली. कागदी पुस्तक प्रकाशन व्यवसायातही छपाईचे खिळे जुळवण्याची गरज नाहीशी झाली. लिखाण संगणकावरच ऑफसेट करून थेट छपाईला पाठवायची सोय उपलब्ध झाली, प्रकाशनातली गुंतागुंत आणि खर्च कमी झाले.

तिसरे म्हणजे मराठीतील तथाकथित प्रकाशकांची मक्तेदारी संपली. पूर्वी लेखकाला प्रकाशकाच्या नाकदुर्‍या काढायला लागायच्या. नाही नाही त्या अटी सहन करायला लागायच्या. लोकप्रिय विषयांवरच लिखाण करायचं, समाजाला अप्रिय विषयांवर लिखाण केलं तर ते खपणार नाही म्हणूनच कोणताही प्रकाशक ते प्रकाशित करणार नाही ही भीती गेली. मला जे आवडतं आणि पटतं ते मी माझ्या ब्लॉगवर लिहीन मग त्याला कोणी वाचक नाही मिळाले तरी बेहत्तर ही एक अत्यंत आवश्यक असलेली कलंदरी लेखकांमध्ये निर्माण झाली. समाजाला न रुचणार्‍या (उदा. नास्तिकता, आदरणीय व्यक्तींच्या कार्याचे मूल्यमापन, समलिंगी संबंध) लेखनालाही प्रसिद्ध करण्याचं धैर्य लेखकांमध्ये आणि संकेतस्थळांच्या संचालकांमध्ये निर्माण झालं. त्यातून पूर्वापार चालत आलेली " मायबाप रसिक वाचक" ही भूमिका नाहीशी झाली. पूर्वीही ही भूमिका प्रामाणिक नव्हतीच, आपली पुस्तके लोकांनी विकत घेउन वाचावीत, आपण वाचकांच्या "गुड बुक्स" मध्ये असावं यासाठी पूर्वीच्या लेखकांनी आणि प्रकाशकांनी वापरलेली ती एक क्लुप्ती होती. आता मी मला जे पटतं ते लिहीन, जर वाचकांना आवडलं तर वाचकांनी माझ्या साईटवर येऊन ते वाचावं अशी भुमिका काही कलंदर लेखकांनी घेतल्यावर पारंपारिक मराठी वाचक भांबावला, क्षणभर संतापलाही. पण त्याला लगेच जुन्या "मायबाप वाचक!" मधला खोटेपणा कळून आला आणि त्याने आपल्या आवडीच्या लेखकांच्या साईटसचे फेव्हरिट्स बनवले आणि वेळोवेळी तो तिथे चक्कर टाकू लागला. प्रकाशकांची सद्दी संपली. उद्या मराठीचं भवितव्य काय ही जी प्रचलित लेखक-प्रकाशकांकडून ओरड ऐकू येते आहे त्याचे मूळ हे आता आपलं कसं होणार या भवितव्याविषयीच्या चिंतेत आहे. आज अजूनही ग्रामीण महाराष्ट्रात यांच्या पुस्तकांची तडाखेबंद विक्री होते आहे. उद्या त्या लोकांच्याही हाती संगणक आणि आंतरजाल गवसलं की आपलं काय होणार या भीतीतून ही ओरड होते आहे....

चौथे म्हणजे अस्सल मराठी माणूस होण्यासाठी महाराष्ट्रात वास्तव्य असण्याची गरज उरली नाही. मराठी मनाशी, महाराष्ट्रातील घटनांशी ज्याला आत्मीयता आहे तो मराठी माणूस ही नवीन व्याख्या रूढ झाली. पूर्वी महाराष्ट्रात रहाणारा पण जेमेतेम एक मराठी वर्तमानपत्र वाचणारा आणि क्वचित एखादे मराठी पुस्तक विकत घेणारा स्थानिक माणूसही अनिवासी मराठी माणसांना सहज हिणवू शकत असे. आता आयटी उद्योगाने बरीच पंचाईत केली आहे. आपण उगाच अनिवासी मराठी लोकांवर टीका करायची आणि आपलीच मुलगी/ मुलगा, भाचे. पुतणे पाश्चात्य देशांत असायचे!! त्यामानाने आमच्या पिढीने खूप सोसलं.!!!! आता ती सोय गेली. एखादा अनिवासी मराठी माणूसही सात-आठ वर्तमानपत्रे रोज वाचून महाराष्ट्रातल्या घटनांशी परिचित असू शकतो. स्थानिक मराठी माणसाप्रेक्षा त्याचे मराठी वाचन अधिक चौफेर असू शकते ही गोष्ट सिद्ध झाली. काही माणसांच्या ही वस्तुस्थिती पचनी पडायला अजून वेळ जातोय पण स्थानिक शहाण्या मराठी माणसांनी ही गोष्ट कधीच मान्य केलीय. भौगोलिक अंतरापेक्षा 'मराठी असणे' ही वृत्ती जास्त महत्त्वाची ठरते आहे. त्यातूनच मराठी साहित्यसंमेलन बे-एरियात भरवण्यासारखे प्रस्ताव पुढे येत आहेत.......

या सर्व बदलांचा भविष्यातील मराठी साहित्यावर काय प्रभाव पडेल? विज्ञान आणि तंत्रज्ञान इतक्या वेगाने पुढे धावत आहे की भविष्याबद्दल कल्पना करणंही कठीण आहे. एक म्हणजे जसजशी संगणक क्रांती समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचत जाईल तसतसे छापील साहित्याचे महत्त्व कमी होत जाईल. छापील साहित्यावर विसंबून रहाणारी आज वयस्कर असलेली पिढी जसजशी काळाच्या पडद्याआड अस्तंगत होत जाईल आणि नवी आंतरजालावर वावरणारी पिढी निर्माण होईल तसतसे कागदावरच्या पुस्तकांचे प्रमाण कमीकमी होत जाईल. थोडक्यात प्रकाशक ही संस्था नामशेष होत जाईल. कागदविहीन साहित्य (पेपरलेस लिटरेचर!) ही नवी संकल्पना रूढ होईल. मराठी माणसांना निरनिराळ्या विषयांवरचे त्यांच्या आवडीचे लिखाण वाचायला मिळेल. मी आता "किर्लोस्करचा' दिवाळी अंक विकत घेतलाय त्यामुळे मला आता त्यातल्या आवडत नसलेल्या कविता आणि लेखही वाचायलाच लागतायत ही अगतिकता संपेल. मराठी मासिकांना जर जगायचे असेल तर त्यांना त्यांच्या अंकांच्या इ-आवॄत्या काढायलाच लागतील. लोकप्रभासारख्या साप्ताहिकांनी ही सुरवात आता केलीच आहे. वाचकांनाही आपल्याला आवडीच्या लेखकांचे नवीन लिखाण त्यांच्या साईटवर जाउन मोफत वाचायची मुभा मिळेल. लेखकांना प्रकाशकाच्या मेहेरबानीवर अवलंबून न राहता त्यांच्या मनातील विषयांवर लिहायची मोकळीक मिळेल. प्रचलित नसलेले अनेक विषय लिखाणात येतील. मराठीची दिवसेंदिवस दुर्दशा होतेय असा जो काही हितसंबंधी लोकांनी चालवलेला धोशा आहे त्यातला फोलपणा उघडकीस येईल. मराठी साहित्यसंमेलने महाराष्ट्राखेरीज अन्यत्रही होऊ लागतील. आर्ट्सखेरीज सायन्स आणि कॉमर्सचेही लोक लेखक बनल्याने मराठीत नव्या कल्पना, नवे शब्दप्रयोग रूढ होतील. मराठी भाषा आणि मराठी साहित्य अधिक सकस व समॄद्ध बनेल. केवळ महाराष्ट्रातलाच नव्हे तर सर्व जगभर पसरलेला समस्त मराठी समाज एकमुखाने गर्जेल!

येळकोट येळकोट, जय मल्हार!
आई अंबाबाईचा, उदो उदो!!
हर हर हर हर महादेऽऽव!!!

No comments: