Saturday, April 12, 2008

दुरावा!!

विमानतळावरचा आगमन लाऊंज माणसांनी अगदी फुलून गेला होता. नुकतीच मुंबईहून आलेली एअर इंडियाची फ्लाईट लागली होती. प्रवासी इमिग्रेशन, कस्टम्स आटोपून बंद दरवाजातून हळूहळू बाहेर येत होते. असेच एकदा दरवाजा ढकलून आजी आणि आजोबा बाहेर आले. आजोबा बॅगा लादलेली जड गाडी हळूहळू ढकलत होते. आजी संधिवातामुळे हळूहळू चालत होत्या. दोघांचेही चेहरे प्रवासाने दमलेले, किंचित बावरलेले. त्यांची ही पहिलीच विदेशवारी होती. भिरभिरती नजर काहीतरी शोधत होती. इतक्यात आजोबांचा चेहरा फुलला,
"ती बघ, सुमा आलीय", ते आजींना म्हणाले.
आजींनी मान वर करून नजर स्थिर करेपर्यंत गर्दीतून वाट काढत सुमा त्यांच्यापर्यंत पोचलीच. हसतमुखाने तिने दोघांनाही मिठी मारली.
"दमलात ना! इथे बसा पाच मिनीटं, पाणी प्या."
पाणी वगैरे पिऊन झाल्यानंतर सुमाने ढकलगाडी आपल्या ताब्यात घेतली.
"चला जाऊया! थोडं चालावं लागेल, गाडी समोरच्या पार्किंग लॉटमध्ये लावलीय", सुमा.
"अगं पण हे काय? जावई कुठायत?"
"तोच येणार होता तुम्हाला घ्यायला. पण त्याला ऐनवेळी महत्त्वाची मिटिंग लागली म्हणून मी आले."
पार्किंग लॉटमध्ये गाडीजवळ आल्यावर सुमाने बॅगा ट्रंकमध्ये टाकल्या, आजी-आजोबांना मागच्या सीटवर बसवलं आणि सराईतपणे ती ड्रायव्हरच्या सीटवर येऊन बसली.
सायंकाळची वेळ होती. एअरपोर्ट मागे टाकून गाडी हायवेला लागली तशी सुमाच्या गप्पा सुरु झाल्या. आजीआजोबांच्या तब्येतीची चवकशी, इंडियातील इतर नातेवाईकांची चवकशी, मुंबईचं हवापाणी वगैरे वगैरे! आजीच प्रामुख्याने गप्पांत भाग घेत होत्या, आजोबा गप्प होते. विचारलेल्या प्रश्नांना एक-दोन शब्दांतच उत्तरं देत होते. त्यांची नजर गाडीतून बाहेर आजूबाजूला फिरत होती. हायवे वरच्या बंदुकीच्या गोळ्यांसारख्या प्रचंड वेगाने जाण्यार्‍या वाहनांनी धास्तावत होती.
"काय हरामखोर जावई आहे आमचा! स्वतः यायचं सोडून हिला एकटीला या भयंकर रहदारीतून पाठवली. मला लग्नाआधीच याचं लक्षण कळलं होतं. मी सुमाला तसं म्हणालोही होतो पण कार्टी ऐकेल तर शपथ! ही प्रेमात पडली होती ना त्याच्या! आता भोगतेय आपल्या कर्माची फळं!" आजोबांच्या डोक्यात विचार गर्दी करत होते. त्यांनी एक-दोन वेळा सुमाला गाडीचा वेग कमी कर म्हणून सांगितलंही होतं. तिने अर्थातच त्याकडे काही न बोलता दुर्लक्ष केलं होतं. त्यामुळे त्यांचा संताप अजून वाढला होता. शेवटी ते चिडून काहितरी बोलणार इतक्यात सुमाने एक्झिट घेतला, गाडीचा वेग मंदावला.
"आता जवळ आलं आपलं घर", सुमा म्हणाली. आजोबांनी राग गिळला.
डौलदार वळण घेऊन गाडी एका बंगल्याच्या ड्राईव्हवे वर उभी राहिली. आजी-आजोबांनी पाहिलं, जावई दरवाजात उभे होते. आता जरा वयस्कर वाटत होते, केस जरा विरळ, कानशिलाशी किंचित पिकलेले, पोट जरासं सुटलेलं. त्यांच्या पायाला बिलगून एक लोकरीचा गुंडा उभा होता. कुतुहलाने या दोघा म्हातार्‍यांकडे पहात होता.
"या, या! प्रवासाचा खूप त्रास नाही ना झाला?" जावयांनी स्वागत केलं. गाडीतल्या बॅगा घरात आणून टाकल्या. सगळे आत घरात आले.
तो लोकरीचा गुंडा अजुनही या म्हातारयांकडेच बघत होता.
"समीर, आजीआजोबांना नमस्कार कर!" सुमा म्हणाली. तो तसाच उभा राहिला.
"अरे, दे आर युअर ग्रँडमा ऍन्ड ग्रँडपा!" जावई म्हणाले. त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही.
"असू दे!", आजीने त्याला जवळ घेतलं, "अरे किती मोठा झालास रे समीर! गेल्यावेळेला तुला मुंबईत पाहिला तेंव्हा दहा महिन्याचा होतास."
समीरला काही कळलं नाही पण आपलं कौतुक चाललंय हे समजलं. तो आजीच्या मांडीवर बसला.
"मी तुझी आजी आणि हे तुझे आजोबा! हे बघ आजोबांनी तुझ्यासाठी काय आणलंय!" आजीने एका बॅगेतून एक वस्तू काढली. आजोबांना आठवलं, जवळ जवळ वर्षभरापूर्वी पूर्वी ते एकदा अष्ट्विनायकाच्या यात्रेला गेले होते तेंव्हा त्यांनी एक संगमरवरी गणपतीची मूर्ती विकत घेतली होती, समीरसाठी! छोट्या मुलासाठी अशी भेटवस्तू घेतल्याबद्दल आजींनी त्यांची थट्टाही केली होती. पण त्यांनी त्याकडे तेंव्हा दुर्लक्ष केलं होतं.
मूर्ती पाहिल्यावर समीरचा चेहरा फुलला. आजोबा आपल्या साडेचार वर्षांच्या नातवाकडे पहात होते.
"से थँक्यु, समीर!" जावई आपला ठेवणीतला आवाज काढत म्हणाले. आवाजातला फरक समीरने ओळखला.
"थँक......यू..." एक एक अक्षर ओढत तो म्हणाला.
"नाऊ टेल देम युअर नेम"
"मनेम इज शमीऽऽऽऽऽ"
"डू यू नो हू वुई आर?" आजोबांनी प्रथमच त्याच्याच भाषेत संवाद करायचा प्रयत्न केला.
"युर ग्रँमा ऍन ग्रँफा" समीर म्हणाला आणि मूर्ती हातात घेऊन आत कुठेतरी पळून गेला.
थोडं पिठलंभात खाऊन झाल्यानंतर सुमाने आजीआजोबांना घर दाखवायला सुरवात केली. जावई जेवून त्यांच्या अभ्यासिकेत गेले होते. समीरही कुठे दिसत नव्हता. पुढलं अंगण, मागलं परसू आणि तळमजला बघूनच आजींचे पाय भरून आले.
"वरचा मजला उद्या बघू", सुमा समजूतदारपणे म्हणाली, "तुम्ही आता विश्रांती घ्या, दमला असाल इतक्या लांबच्या प्रवासाने. आईला संधिवात आहे, वर चढउतर सारखी करायला नको म्हणून तुमची व्यवस्था इथे तळमजल्यावरच्याच गेस्टरूममध्ये केली आहे, चालेल ना? शेजारीच बाथरूमही आहे आणि किचनही इथेच आहे. आमची बेडरूम वरती आहे. काही रात्री लागलं तर हे बटण दाबून हाक मारा, आम्हाला वर ऐकू येईल." सुमाने इंटरकॉमचं बटण दाखवलं.
"घरातल्या घरात फोन, काय एकेक थेरं आहेत", आजोबांचं विचारचक्र परत चालू झालं.
"अगं पण समीर कुठेय?" आजीने विचारलं
"तो झोपला त्याच्या खोलीत"
"इतक्या लहान मुलाला एकटा झोपवतां?" आजोबांचा प्रश्न
"इथे अशीच पद्धत आहे. हा तर साडेचार वर्षांचा आहे, इतर मुलांना तर एक वर्षापासून स्वतंत्र झोपवतात", सुमा
"अतिशहाणे आहांत", आजोबांचा राग, मनात.
गादीवर पडल्यावर आजोबांना झोप येईना. आजी पाच मिनिटातच झोपी गेल्या होत्या. आजोबा बिछान्यावर तळमळत विचार करत पडले होते. दिवसभरातले प्रसंग आठवत होते. कुठंतरी काहीतरी खटकत होतं. 'जावयांनी एअरपोर्टवर न येणं, सुमाचं भन्नाट ड्रायव्हिंग, इनमिन तीन माणसांसाठी असलेला तो बंगला. बंगला कसला प्रासाद! आजवर कुणाचं घर बघतांना दमायला झालं नव्हतं!! ज्या नातवाला बघायला आलो त्याचं तुटक बोलणं. समीरने आपल्या पाया पडावं अशी त्यांची अपेक्षा नव्हती पण आजोबांच्या जवळ येऊन पापा द्यायला काय हरकत होती? आता वेगळ्या खोलीत झोपवतात म्हणे. काय त्याची भाषा आणि काय त्याचे उच्चार! त्याच्यात भारतीय काहीच नाही, पूर्ण अमेरिकन झाला आहे. हेच बघायला आलो का आपण! छे, झक मारली आणि आपण बायकोचं ऐकलं. इथे आलो हेच चुकलं!!'
विचारांच्या चक्रात कधीतरी त्यांना झोप लागली. जाग आली तेंव्हा पहाट झाली होती. खिडकीतून बाहेर पाहिलं तर नुकतच उजाडत होतं. भिंतीवरच्या घड्याळात सहा वाजत होते. त्यांनी आजींकडे नजर टाकली. त्या गाढ झोपेत होत्या.
"झोपू दे, दमली असेल" असा विचार करून ते हळूच बाथरूमकडे गेले. दिवा लावल्यावर तिथला झगझगाट पाहून एकदम अवघडले.
"गरज काय इतका उजेड करायची? वीज किती खर्च होते? आम्हाला काय आमचे अवयव कुठे आहेत ते माहित नाही?" रात्रीचे विचारचक्र पुन्हा सुरु झाले. कसेबसे प्रातर्विधी आटोपून ते दिवाणखान्यात आले. घरात सगळीकडे सामसूम होती. भलीमोठी खिडकी समोर असलेल्या एका सोफ्यावर जाऊन बसले. बाहेर सकाळ होत होती. रात्री थोडा पाऊस पडून गेला असावा. बाहेर एक काळशार रस्ता दूरवर जात होता. रस्त्याच्या दोन्ही कडांना झाडं होती, त्यामागे ओळीत मांडल्यासारखी घरं! पण एक गोष्ट विचित्र होती. उजाडलं तरी त्या रस्त्यावर एकही चिटपाखरूही नव्हतं. काही तासांपूर्वीच मुंबईच्या कोलाहलातून आलेल्या आजोबांना ती शांतता सहन होईना. बातम्या तरी बघाव्यात म्हणून ते टीव्हीकडे वळले पण तो अजस्त्र साठ इंची टिव्ही पाहिल्यावर त्याचे तंत्र आपल्याला जमणारे नाही याची खात्री पटून ते अजूनच वैतागले. शेवटी परत जाऊन ते सोफ्यावर बसले आणि डोळे मिटून आपले प्रातःस्तोत्र पुट्पुटू लागले.
असा किती वेळ गेला कोण जाणे. अचानक धड धड धड असा आवाज ऐकू आल्याने आजोबा भानावर आले. डोळे उघडून त्यांनी पाठीमागे वळून आवाजाच्या दिशेने पाहिले. समीर त्याच्या खोलीतून धावत कुठेतरी निघून गेला. आजोबांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपल्या स्तोत्राकडे मन केन्द्रित केलं. पुन्हा काही वेळाने धडधड आवाज आला. समीर कुठुनतरी आला होता. त्याच्या ओंजळीत काहीतरी होतं.
वैतागलेल्या आजोबांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि ते खिडकीबाहेर नजर लावून बसले. त्यांचा राग आता शिगेला पोचला होता. या कार्ट्याच्या एक ठेवून द्यावी असं त्यांना वाटत होतं. त्यांनी कसंबसं स्वतःला आवरलं आणि पुन्हा खिडकीबाहेर नजर लावली.
यावेळी समीर वरच्या मजल्यावरील त्याच्या खोलीत न जाता देवघरात घुसला होता. हा तिथे काय गोंधळ घालतोय हे न कळून आजोबा थोड्याशा अनिच्छेनेच त्याच्या मगोमाग गेले. आणि त्यांनी पाहिले....
देवघरातल्या चौरंगावर त्यांनी कालच दिलेली गजाननाची संगमरवरी मूर्ती ठेवेलेली होती. त्यावर समीरने नुकतीच बॅकयार्डमधून तोडून आणलेली फुले वाहीलेली होती. समीर त्यांच्याकडे पाठमोरा होउन उभा होता. हात जोडलेले, डोळे मिटलेले...
तल्लीन होउन ते गोबरंगुबरं ध्यान म्हणत होतं...
"प्लालंभी विनंती कलू गनपती, विद्यादयाशागला,
अज्ञानतत्व हलोनी बुद्धिमती दे, आलाघ्य मोलेश्वला,
चिंता क्लेश दलिद्ल्य दुख: अवघे, देशांतला पाठवी...."
आजोबा विस्फारलेल्या डोळ्यांनी तल्लीन झालेल्या त्या पिटुकल्या ध्यानाकडे पहात राहिले.....
आणि पुढच्याच क्षणी त्यांनी गहिवरून धावत जाऊन नातवाला पोटाशी घेतले......
तो ही त्यांच्या कुशीत तोंड खुपसून त्यांना बिलगला......
कसला एव्हढा मोठा आवाज झाला म्हणून सुमा व जावई देवघराच्या दारात जमा झाले होते. पण आजोबांना त्याची पर्वा नव्हती....
आजोबांचे डोळे पाझरत होते.....
आपल्या नातवाला उराशी धरुन ते मुक्तपणे स्फुंदत होते....
दोन पिढ्यातल्या आणि दोन देशांतल्या दुराव्यापेक्षा एकाच संस्कृतीच्या, एकाच रक्ताच्या पेशी वरचढ ठरल्या होत्या...........

No comments: