Friday, July 25, 2008

जॉर्ज कॉल्डवेल - भाग २

(पूर्वसूत्रः शेवटी ही लढाई मला एकट्यालाच लढावी लागणार हे निश्चित झालं! देवनारच्या खाटिकखान्यात पाऊल टाकणार्‍या बोकडाइतक्याच उत्साहाने मी दुसर्‍या दिवशी वर्गात प्रवेश केला....)

आज वर्गात जरा आधीच जाऊन पोहोचलो. बाकीच्या विद्यार्थ्यांच्या ओळखी करून घेतल्या. दोन गोर्‍या अमेरिकन मुली, दोन मुलगे, एक कोरीयन मुलगी, एक बार्बाडोसची मुलगी आणि एक चिनी मुलगा- एक मुलगी आणि मी! बस्स, संपली वर्गाची लोकसंख्या!! आम्ही एकमेकांची चौकशी करत होतो. कालच्या अनुभवावर हलक्या आवाजात बोलत होतो. आता आपल्यालाच एकमेकांना कसं सांभाळून घ्यावं लागणार आहे याबाबत एकमतास येत होतो.....

इतक्यात जॉर्ज वर्गात शिरला.....
आज त्याच्या हातात काहीही नव्हतं....

जॉर्ज सरळ स्टेजवर गेला आणि एकही शब्द न बोलता आपल्या खिश्यातून खडू काढून त्याने फळ्यावर लिहायला सुरुवात केली.....

फळ्यावर एका ऑरगॅनिक रेणूचे स्ट्रक्चर (आकॄतीबंध) तो काढीत होता. रेणू खूप कॉम्प्लेक्स होता. जसजसा तो आकृती काढत होता तसतशी त्या रेणूची मला हळूहळू ओळख पटत होती.....
त्याचे लिहून झाल्यावर त्याने वर्गाकडे तोंड केलं आणि त्याच्या घनगंभीर आवाजात प्रश्न विचारला,

"डू यू नो व्हॉट धिस इज?"
कुणीच काही बोललं नाही....

त्याची नजर सगळ्या वर्गावरून फिरत शेवटी माझ्यावर स्थिर झाली. मला बारकाईने निरखू लागली, माझं अंग कसल्यातरी अनामिक दडपणाने आकसून गेलं......

"सो मिस्टर समोसा! कॅन यू टेल मी व्हॉट आय हॅव ड्रॉन हियर?" भारतीय असलेल्या माझं नवीन नामकरण झालं होतं.....
"टॅक्सॉल! इट इज द स्ट्रक्चर फॉर टॅक्सॉल!!" मी कसंबसं उत्तर दिलं.
"करेक्ट! नाऊ मिस बहामा-ममा," त्या बार्बाडोसच्या मुलीकडे बघत तो म्हणाला, "डू यू नो व्हाय टॅक्सॉल इज इंपॉरटंट?"
तिने नकारार्थी मान हलवली. पुन्हा त्याचा मोर्चा माझ्याकडे वळला,

"समोसा, टेल हर....." मला जर टॅक्सॉलचं स्ट्रक्चर माहिती आहे तर त्याचं महत्वही माहिती असणार हे अचूक जाणून त्यानं मला आज्ञा केली.
"ते काही प्रकारच्या कॅन्सरवर औषध ठरू शकतं!", मी.
"करेक्ट!! तेंव्हा असं बघ बहामा-ममा," परत तिच्यावर जॉर्जचं शरसंधान चालू झालं, "तू जेंव्हा वयस्कर होशील ना आणि आयुष्यभर बार्बाडोसची रम अतीप्रमाणात प्याल्यामुळे तुला जेंव्हा विविध प्रकारचे कॅन्सर होतील ना, तेंव्हा त्यातले काही प्रकारचे कॅन्सर हे औषध वापरून कदाचित बरे होऊ शकतील!!!"

मी हळूच तिच्याकडे पाहिलं. अपमानामुळे आणि रागामुळे डोळ्यात उभं रहाणारं पाणी थोपवायचा ती बिचारी आटोकाट प्रयत्न करत होती.......

जॉर्जला त्याचं सोयरंसुतक नव्हतं. आता त्याने सर्व वर्गाला उद्देशून बोलायला सुरुवात केली....

"हा रेणू औषधीदृष्ट्या महत्त्वाचा तर आहेच पण गंमत अशी आहे की हा फक्त नैसर्गिक स्त्रोतांपासून वेगळा काढण्यातच आत्तापर्यंत मानवाला यश मिळालंय. प्रयोगशाळेत कॄत्रिमरित्या हा रेणू बनवायचे खूप प्रयत्न झाले. त्यातील काही थोड्याफार प्रमाणात यशस्वीही झाले पण ते सर्व सिंथेसिस इतके गुंतागुंतीचे आहेत की ते फक्त लॅबस्केलवरच करता येऊ शकतात, प्लांटस्केलवर नाही. त्यामुळे या रेणूचं मास प्रॉडक्शन सध्या अशक्य आहे. आज आपण या रेणूचा सिंथेसिस अभ्यासणार आहोत!"

त्यानंतर जॉर्ज अखंड शिकवत होता. बोलत होता, फळ्यावर लिहीत होता. समोर पुस्तक नाही, स्वतःच्या नोट्स नाहीत! त्याच्या डोक्यातून झरझर झरझर विचार येत होते......

त्याने प्रथम तो गुंतागुंतीचा रेणू मेकॅनोचे तुकडे वेगळे करावेत तसा तुकड्या-तुकड्यात विभागून दाखवला (रेट्रो-सिंथेसिस). आता, रेणू आपल्या मनाप्रमाणे वाटेल तसा कुठेही तोडता येत नाही, त्याचे काही नियम आहेत. त्याच्या अंतर्गत ऊर्जेचं वितरण लक्षात घ्यावं लागतं नाहीतर रेणू अनस्टेबल बनतो. जॉर्ज तर फळ्यावर भराभर आणि अचूक लिहीत सुटला होता. हां, मात्र त्याच्या लिखाणात कुठेहि एक वाक्य तर काय पण एक इंग्रजी शब्दही नव्हता! सगळी एकामागून एक स्ट्रक्चर्स!!!

इथे एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे. सिंथेटिक ऑरगॅनिक केमिस्ट्रीमध्ये वाक्यांना फारसं महत्त्व नसतं, महत्वाची असतात ती स्ट्रक्चर्स (रेणूंचे आकृतीबंध), ते बनवण्याच्या क्रिया, आणि त्यासाठी लागणारे विविध रीएजन्टस!! तुमच्यापैकी जे सायन्सवाले असतील त्यांना कल्पना असेल. जे सायन्सवाले नसतील त्यांनी आपल्या आसपासच्या कुणातरी बारावी सायन्सला असलेल्या विद्यार्थ्याचं पुस्तक जरूर पहावं! मात्र एक लक्षात घ्या की तो ऑरगॅनिक केमिस्ट्रीचा पहिला (१०१) कोर्स!! नुसती तोंडओळख!!! त्या पुस्तकाला जर बारीक-बारीक होत जाणार्‍या नऊ चाळण्या लावून जर त्यातून सर्व इंग्रजी शब्द जर चाळून काढून फेकून दिले आणि सर्व स्ट्रक्चर्स मात्र जर अधिकाधिक गुंतागुंतीची करत नेली जर जे तयार होईल ते ९०१ लेव्हलचं ऑरगॅनिक केमिस्ट्रीचं पुस्तक! ती एक वेगळीच सांकेतिक भाषा आहे, चकल्या-कडबोळ्यांनी बनलेली!!

टॅक्सॉलचा तो महाकाय रेणू जॉर्जने अनेक छोट्या-छोट्या रेणूंमध्ये सोडवून दाखवला. त्यानंतर विविध प्रकारचे रिएजंटस वापरुन ते छोटे तुकडे कसे बनवता येतील आणि एकमेकांशी कसे जुळवता येतील त्यावर विवेचन केलं. आम्ही भान हरपून बघत आणि ऐकत होतो! हो, अगदी बहामा-ममा सुद्धा सर्व अपमान विसरून गुंगून गेली होती.....

किरर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र!!!!!!

तास संपल्याच्या बेलने आम्हाला जाग आणली. पन्नास मिनिटं कशी गेली हे कळलंसुद्धा नव्हतं!!! जॉर्जने हातातला खडू परत खिशात टाकला आणि एकही शब्द न बोलता तो वर्गाबाहेर पडला.....

आम्ही सगळे तिथेच खिळून राहिलो. एक गोष्ट सर्वांना आता न सांगता स्पष्ट झाली होती.
हा विषय शिकवायची जॉर्जची हातोटी असामान्य होती. त्याचं विषयाचं ज्ञान बिनतोड आणि अतिशय उच्च दर्जाचं होतं. नाहीतर असा एक क्लिष्ट विषय शिकवतांना वर्गाचं भान हरपून दाखवणं ही सामान्य गोष्ट नव्हती. पुढ्यात बसलेले विद्यार्थीही काही गणेगंपे नव्हते. आम्ही सर्वांनी हा विषय यापूर्वी सलग पाच-सहा वर्षे अभ्यासलेला होता. काहींनी त्यावर स्वतंत्र लिखाणही प्रसिद्ध केलेलं होतं. असाच कुणी लेचापेचा प्रोफेसर असता तर आम्ही त्याला केंव्हाच फाडून खाल्ला असता!! केमिस्ट्री डिपार्ट्मेंटने हा अंतिम वर्ग जॉर्जला शिकवायला उगीचच दिलेला नव्हता, कदाचित त्याची सर्व दादागिरी सहन करूनसुद्धा!!!

आता त्याचा तास मी काही केल्या चुकवत नव्हतो. धावत-पळत, कधीकधी तर नोकरीवरून सुटल्यासुटल्या भुकेल्या पोटी जाउन वर्गात बसत होतो. जॉर्जच्या शिकवण्याच्या स्टाईलने तशी भूलच आम्हा सर्वांवर घातली होती.....

एकदा तर कमालच झाली. त्या दिवशी सबंध दिवसभर पावसाची रीघ लागली होती. दुपारी तर वादळी वार्‍याचं फोरकास्ट होतं. कामावरून सुटल्यावर युनिव्हर्सिटीची कॅम्पस बस पकडून वर्गात यायला मला जरा उशीरच झाला. अपराधीपणे "सॉरी, सॉरी" पुटपुटत मी वर्गात शिरलो आणि अंगावरचे पाण्याचे थेंब पुसत आता उशीरा आल्याबद्द्ल जॉर्ज मला कसा आणि किती सोलून काढतोय याची प्रतिक्षा करत राहिलो....

पण आज त्याचा मूड वेगळा होता....

"वेलकम मिस्टर इंडिया!" त्यानं माझं स्वागत केलं. आज मी समोसा नव्हतो. मग सगळ्या वर्गाकडे बघून तो म्हणाला,
"बघा, मी सांगितलं नव्हतं तुम्हाला, कितीही पाऊस पडला तरी हा येणारच म्हणून! अरे पावसाची भीती तुम्हाआम्हाला! तो तर लहानपणापासून मान्सूनचा वर्षाव सहन करत वाढलाय!!" म्हटलं तर विनोद, म्हटली तर चेष्टा. मी गप्प राहिलो.
"पण खरंच! जेंव्हा मान्सूनचा बेफाट पाऊस कोसळतो तेंव्हा तुम्ही लोकं काय करता?" त्या अमेरिकन चिमणीने खरंतर मला प्रश्न विचारला होता, पण उत्तर मात्र दिलं जॉर्जने....
"अगं त्यात अवघड काही नाही! जेंव्हा असा खूप पाऊस पडतो तेंव्हा हे लोक त्यांच्या पाळीव हत्तीच्या पोटाखाली जाऊन दडून बसतात! मग वरून कितीही पाऊस पडला तरी चिंता नाही. काय खरं की नाही मिस्टर इंडिया?" चेहरा विलक्षण मिश्किल करून जॉर्ज वदला. हे ऐकुन मलाही हसू आवरलं नाही.
"अगदी खरं!" मी दुजोरा दिला....

"नाऊ बॅक टू बिझनेस" असं म्हणून त्याने शिकवायला सुरवात केली. कुठली तरी क्लिष्ट रासायनिक अभिक्रिया होती. शिकवता-शिकवता मध्येच थांबला....

"आता जर मी या अशा स्टेप्स घेतल्या तर याच्या पुढची स्टेप काय येईल?" त्यानं वर्गाला प्रश्न केला.

हा सिंथेसिस यापूर्वी जगात कोणीच फारसा केलेला नसल्याने त्याच्या प्रश्नाचं उत्तर देणं कठीण होतं. आम्ही कोणीच हात वर केला नाही. मी तर खिडकीबाहेर नजर लावली. आभाळ काळ्याशार ढगांनी खूप अंधारून आलं होतं. आता कधीही जोराचं वादळ होणार अशी लक्षणं दिसत होती.

"सो कॅन यू गिव्ह मी ऍन आन्सर?", जॉर्जने त्या दोनापैकी एका अमेरिकन विद्यार्थ्याला विचारलं. त्यानं नकारार्थी मान हलवली....
"नुसतं डोकं हलवू नकोस, उठून उभा रहा! जरा ताजं रक्त वाहू दे तुझ्या मेंदूपर्यंत!!" जॉर्ज.
तो मुलगा गुपचूप उभा राहिला....
"आता सांग!" तो मुलगा गप्प...
"नांव काय तुझं?" नेहमी आम्हाला टोपणनावांने हाक मारणार्‍या जॉर्जला आमची खरी नांवं माहीती असायची गरजच नव्हती.
"जॉन" तो मुलगा म्हणाला.
"गुड! जॉन, घाबरू नकोस! इकडे ये" जॉन स्टेजवर गेला. त्याच्या हातात आपला खडू देत जॉर्ज म्हणाला,
"डोन्ट वरी! टेक धिस चॉक ऑफ सुप्रीम विझडम फ्रॉम मी!! ऍन्ड नाऊ राईट डाऊन द नेक्स्ट स्टेप!!!"

आम्ही सगळे त्या "चॉक ऑफ सुप्रीम विझडम" वर हसू दाबत आता जॉन काय करतो ते पाहू लागलो.....
जॉन काय करणार, कपाळ? त्याला बिचार्‍याला पुढची स्टेप माहितीच नव्हती. जॉर्जने खूपच दबाव आणला म्हणून त्याने फळ्यावर काहीतरी खरडलं. ते अर्थातच साफ चूकीचं होतं......

आम्ही सगळे श्वास रोखुन जॉर्ज या बिचार्‍या पोराचं आता काय करतो ते बघू लागलो. इतक्यात.......

कडाडऽऽऽ काऽड काऽऽड!!!!

बाहेर लख्खकन वीज चमकली आणि पाठोपाठ कानठाळ्या बसवणारा कडकडाट झाला........
आम्ही सगळेच दचकलो......
जॉर्ज स्थिर नजरेने जॉनकडे पहात होता.....

"डॅम्न यू, जॉन!!" जॉर्ज खिडकीकडे हात करत पण नजर जॉनवरच रोखून ठेवत त्याच्या खोल आणि धीरगंभीर आवाजात उद्गारला, "फरगेट मी, जॉन! बट इव्हन द गॉड हिमसेल्फ डज नॉट ऍप्रूव्ह युवर आन्सर!!!"

वर्गात हास्याचा कल्लोळ उडाला!!!

त्यामध्ये सहभागी होत जॉर्ज पुढं म्हणाला, "फ्रॉम टुडे, यू आर नॉट जॉन!! यू बीट्रेयड द गॉड!!! फ्रॉम टुडे युवर नेम इज "जूडास!!!!"

कीर्रर्रर्रर्रर्र........

हास्याच्या कल्लोळात तास संपला......
असं शिकता शिकता चार महिने कसे उलटले ते आम्हाला समजलंही नाही....
आणि दुसरा कसला विचार करायला जॉर्जने आम्हाला अवसर तरी कुठे ठेवला होता!!
मग एकदा ती वेळ आली.......
काळरात्रीची भयाण वेळ.........

(क्रमशः)

2 comments:

Dinesh Gharat said...

वा !!!!! डॉक्टरसाहेब अख्खा ब्लॉग वाचे पर्यंत जगाचे भान विसरलो. बरेच दिवसांनी काहितरी छान वाचायला मिळालं !!!
परत परत येणारच पुढच वाचायला.

दिनेश.
http://www.sarvottam-marathi-vinod.blogspot.com

कोहम said...

masta