Saturday, November 15, 2008

आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी.....

शुक्रवारची रम्य संध्याकाळ! हवेत बेताची थंडी!! पुढे आख्खा वीकांत मोकळा पडलेला.....
मी कामावरची अखेरची पाटी टाकून घरी येतो....
घरच्या वाटेवर ड्रायव्हिंग करत असतांनाही मस्त मराठी गाणी गुणगुणतो, "संथ वाह्ते, कृष्णामाई..." क्या बात है!!
नाहीतर एरवी मला कट करणार्‍या इतर ड्रायव्हर्सवर भकाराने सुरू होणार्‍या सशक्त मराठी शब्दांची बौछार चालू असते. (खरं सांगायला लाज कसली, तिच्यायला!!)
घरी येऊन मस्त आंघोळ करून ताजातवाना झालो.....
किचनमधून मस्त वास येतोय, जरा तिथे डोकावलो....
"काय चाललंय?"
"पॅटिस करतेय खिम्याचे!" माझी पहिली बायको सांगते....
तिला तिच्या कार्यात सुयश चिंतून मी माझ्या अभ्यासिकेत आलो. मिनी-फ्रीज उघडला....
"किण्ण, किण्ण!" काचेच्या ग्लासात बर्फाचे तुकडे पडले. त्यावर बेताची शिवास रीगल...
माझ्या त्या दुसर्‍या बायकोचे चुंबन घेत मी कालच लायब्ररीतून आणलेली कादंबरी उघडली.....
असा किती वेळ गेला कोण जाणे...
मी कादंबरीच्या कथानकात पूर्ण बुडालेला!!! दुसर्‍या बायकोच्या चुंबनांचाही दुसरा अध्याय चाललेला!!!
दूर कुठेतरी फोन वाजला....
मी नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केलं. कोण बाजीराव असेल तर ठेवेल मेसेज.....
ही एक जाणिवपूर्वक लावून घेतलेली सवय!
माझ्या मुलगा रांगण्याच्या वयाचा असतानाची!!
इथे तो डायपरमध्ये शीशी करून घरभर रांगतोय! ह्याला आता लगेच स्वच्छ केला नाही तर हा पांढरं कारपेट पिवळ्या रंगाने रंगवणार या काळजीत आम्ही!! धावपळ करून नवीन डायपर व इतर साहित्य गोळा करून मी त्याच्यामागे लागलोय!! त्याला आता डॅडी पकडापकडीचा खेळच खेळ्तोय असं वाटून तो माझ्या हातात लागायला तयार नाही!!! अशा आणीबाणीच्या प्रसंगी मी गुंतलेला असतांना फोन वाजायचा!! उचलला की पलीकडून कोणतरी मला काहीतरी विकायच्या प्रयत्नात!! असा राग यायचा (पुन्हा ते सशक्त मराठी शब्द!!!). शेवटी निर्णय घेतला की फोन उचलायचाच नाही, लोकांना मेसेज ठेवू देत, आपण नंतर त्यांना उलट कॉल करू!!! माझ्या सगळ्या परिचितांना हे सांगून ठेवलंय!! आता जरी माझ्या भावाने फोन केला तरी "दादा, जरा परत फोन कर" एव्हढंच बोलून तो बिचारा फोन ठेवतो!!
असो!! तर दूरवर फोन वाजला, मी दुर्लक्ष केलं....
काही मिनिटातच बायको (पहिली) खोलीत आली....
गरमागरम पॅटिस आणले असतील म्हणून मी तिच्याकडे आशेनं (आणि सस्मित चेहेर्‍यानं!!) पाहिलं.....
पण नाही, पॅटिस नव्हते, हातात फोन होता....
माझ्या कपाळावरच्या आठ्या पाहून तिने तिच्या या अपराधाबद्दल स्पष्टिकरण दिलं...
"कोणीतरी अनोळखी पण इंडियन माणूस आहे. आवाजावरून वयस्कर वाटतोय, म्हणून कॉल घेतला..."
त्या माणसाच्या वयामुळे त्याला क्षमा करत पण काहिश्या नाराजीनेच मी फोन कानाला लावला....
"हॅलो?"
"हॅलो, मी अमूकअमूक (माझं नांव) यांच्याशी बोलू शकतो का?" खरोखरच एक वयस्क भारतीय माणसाचा आवाज! बोलणं इंग्रजी पण द्रविडी उच्चारातलं!!
"तोच मी आहे"
"मी *** वैदिक केंद्राच्या वतीने बोलतोय. आम्ही आपल्या पवित्र भारतीय संस्कृतीच्या संवर्धनासाठी विविध कार्यक्रम करीत असतो..."
मला आता अंदाज आला. असे बरेच फोनकॉल्स वेळोवेळी येत असतात. बहुतांश आर्थिक मदतीच्या अपेक्षेने. मलाच नाही तर आपल्यालाही येत असतील. आम्ही आपले त्यांची माहिती ऐकून घेतो आणि जर आमच्या जिव्हाळ्याचा विषय असेल तर इतर सगळ्यांप्रमाणेच यथाशक्ति मदतही करतो. विशेष काही नाही, आपली एक सामाजिक बांधिलकी म्हणून!!
"बरं, पुढे बोला.."
"आम्ही आमच्या केंद्रातर्फे गोरक्षण आणि गोसंवर्धनाचे कार्य करत असतो."
आता गोरक्षण हा काही माझ्या फार जिव्हाळ्याचा विषय नाही. मला रोगनिवारण, मुलांचे शिक्षण, दरिद्रतानिर्मुलन वगैरे एकंदरित "माणसांचे" रक्षण आणि संवर्धन यात जास्त इंटरेस्ट आहे. पण मनात म्हटलं, मी कोण ठरवणारा? एखाद्याला गोरक्षणातही इंटरेस्ट असू शकतो.
"माफ करा, आपल्याबद्दल मला आदर आहे पण मला काही गोरक्षणाच्या कार्यात फारसा रस नाही" मी सत्य सांगून टाकलं आणि माझ्या कादंबरीकडे वळलो.
"माफ करा सर, पण मी तुम्हाला हे कार्य अतिशय पुण्यवान आणि महत्त्वाचं आहे हे जर चर्चा करुन पटवून दिलं तर तुम्ही त्यात रस घ्याल का?"
म्हातारबुवांच्या या धिटाईचं मला कौतुक वाटलं.
"जरूर! तुम्ही तसं केलंत तर मी जरूर माझं मत बदलीन."
म्हणून मी पुढे विचारलं,
"तुम्ही गोरक्षण आणि गोसंवर्धन करता म्हणजे नक्की काय करता?" मी असा रस दाखवत असलेला बघून म्हातारबुवांनाही हुरूप आला.
"आम्ही गोमातेला खाटिकखान्यात जाऊन कत्तल होण्यापासून वाचवतो. आपल्या भारतीय संस्कृतीनुसार गाय ही देवता आहे. तेंव्हा अशा ह्त्येसाठी चालवलेल्या गाईना आम्ही विकत घेतो आणि आमच्या गोशाळेत ठेवतो."
"तुम्ही मूळचे कुठले? तुमच्या उच्चारांवरून तुम्ही दाक्षिणात्य वाटता..." माझी चांभारचौकशी...
"यास सार, आयम फ्रॉम त्रिचनापल्ली. आय वर्क्ड इन त्रिचनापल्ली तहसील ऑफिस फॉर थर्टीसेवन इयर्स!! आयम नाऊ इन द युएस फॉर लास्ट वन इयर!!"
"इथे कसे काय?"
"माझी मुलगी लग्न होउन इथे असते. मी रिटायर झाल्यापासून आता तिच्याकडेच असतो".
"अमेरिकेत तुमचा वेळ घालवण्यासाठी हे केंद्राचे कार्य करता वाटतं," मी व्रात्यपणे एक गुगली टाकला. खरंतर मी नव्हे, माझ्या पोटात गेलेल्या शिवास रीगलने टाकला.....
"यास स्सार", माझ्या अपेक्षेप्रमाणेच आपण कधी त्रिफळाचीत झालो हे म्हातारबुवांना कळलंही नाही...
"बरं, भारतात कुठे आहे तुमची ही गोशाळा?"
"भारतात नव्हे, इथे अमेरिकेतच व्हर्जिनियामध्ये आहे आमची गोशाळा"
"आँ!!!!" आता त्रिफळाचीत व्हायची माझी पाळी होती....
"भारतातल्या गायींना इथे आणून ठेवता?" काय युएस इमिग्रेशनने गाईंसाठी सुद्धा ग्रीनकार्ड सिस्टीम चालू केलीय की काय!!!! काय सांगता येत नाही, या जॉर्ज बुशच्या अमदानीत काहीही अशक्य नाही!!!!
"भारतातल्या नव्हे सर, आम्ही इथल्या अमेरिकन गाईंनाच सोडवून आमच्या या व्हर्जिनियातल्या गोशाळेत ठेवतो. आत्तापर्यंत एक्काहत्तर गाई बाळ्गल्या आहेत आम्ही...."
आता भारतात काही शेतकरी आर्थिकदृष्ट्या हतबल झाल्याने त्यांनी विकलेल्या गाई खाटिकखान्याकडे नेतात हे मला ठाऊक आहे. अशा गाईंना सोडवून त्या परत शेतकर्‍यांना देणं हे मी एकवेळ समजू शकतो. पण इथल्या अमेरिकेतल्या गलेलठ्ठ गाईंची सोडवणूक? आता मला हा सर्व प्रकार जाम विनोदी वाटायला लागला होता. मी हातातली कादंबरी मिटून बाजूला ठेवली. म्हातारबुवांशी गप्पा मारण्यासाठी ऐसपैस मांडी ठोकून बसलो. इतक्यात बायको परत डोकावली. मी अजून फोनवरच आहे हे पाहून तिने खूण करून "कोण आहे?" असं विचारलं. मी मान हलवली आणि हाताची मूठ करून ओठांना लावुन चिलमीचा खोल झुरका घेतल्याचा अभिनय केला.....
ही आमच्या दोघांमधली गुप्त खूण! जर आम्ही कुणाची फिरकी घेत असलो तर एकमेकांना ते कळवतांना आम्ही "फिरकी" हा शब्द वा खूण वापरत नाही. कारण इथल्या अमराठी लोकांनाही ते कळतं. त्यापेक्षा "ही फुक्कटची चिलीम भेटलीये, जरा चार झुरके मारून घेतो" ही खुण जास्त सेफ!! (आयला! बोलण्याच्या भरात खूण सांगून बसलो की तुम्हाला!!!!)
कपाळावर हात मारत ती परत आत गेली.....
"असं का? एक्काहत्तर गाई पाळल्यात का तुम्ही?" आमचं संभाषण पुढे चालू झालं...
"यास स्सार!"
"अणि बैल? बैल किती पाळलेत तुम्ही?"
"बैल?" म्हातारबुवा गोंधळले, "बैल कशाला पाळायचे?"
"का? बैलांना खाटिकखान्यात कत्तलीसाठी नेत नाहीत?"
"तसं नाही, पण आपल्या धर्मशास्त्रात बैलांना काही महत्त्वाचं स्थान नाहीये", म्हातारबुवा आता स्वतःच्या नकळत हळूहळू सापळ्यात शिरत होते....
"असं कसं आपण म्हणता? आपल्या श्री शंकरदेवतेचं वहान बैलच आहे की! प्रत्येक शिवमंदिरात शंकराच्या पिंडीच्या समोर नंदीची मूर्ती असतेच की!! तुमच्या दक्षिण भारतातल्या मंदिरातही पाहिलीये मी. शिवाय बंगलोर-म्हैसूरला तर नंदीच्या प्रचंड मूर्तींची पुजा-अर्चा होते ना!!"
"पण बैल ठेवण्यात मतलब काय?" आता तेच मला उलट विचारू लागले....
"बाकीचं सोडून द्या! पण तुम्ही ह्या ज्या पूज्य गोमाता वाचवता आहांत आणि पाळता आहांत, त्या गोमाता जन्माला घालण्यामध्ये बैलांचा काहीतरी हातभार आहेच की नाही? उद्या सगळे बैल जर खाटिकखान्यात नेउन कत्तल केले गेले तर तुम्हाला वाचवायला आणि पाळायला नवीन गोमाता मिळणार कुठून?" आता शिवास रीगल भारी म्हणजे भारीच व्रात्य झाली होती....
माझा युक्तिवाद नाकारणं म्हातारबुवांना शक्य झालं नाही. त्यांनी मग मुद्दा बदलला....
"पण सामाजिकद्दृष्ट्या बैलांना गाईइतकं महत्त्व नाहीये.."
"मला नाही पटत! भारतात बैल हा शेतकर्‍याचा किती मोठा अधार असतो! बैलाशिवाय शेतीची कामं होतील काय?"
"पण इथे अमेरिकेत शेतीसाठी बैल कुठे वापरतात?" म्हातारबुवांनी विजयी स्वरात विचारलं...
"कबूल! इथे यंत्रांनी शेती होते, बैल वापरत नाहीत. पण इथल्या प्राणीसमाजसंस्थेत त्यांचं एक विशिष्ट स्थान आहेच की! 'बुलडोझर' वगैरे शब्द काय उगाच आले का?"
"हं!!" म्हातारबुवा आता विचारात पडले...
"आणि तुम्ही बैलांना तसेच सोडून फक्त गाईंना रक्षण देताय! कायद्याचा सल्ला घेतलाय का तुम्ही लोकांनी? उद्या कोणीतरी तुमच्याविरुद्ध "जेंडर डिस्क्रिमिनेशन" ची केस घालून तुम्हाला कोर्टात खेचेल!!!!" मी माझं हसू आवरण्याचा आटोकाट प्रयत्न करीत म्हणालो.
"खरंच असं होऊ शकेल?" म्हातारबुवांचा आवाज आता सचिंत झाला होता....
" मग! अमेरिका आहे ही, भारत नव्हे! तुम्ही इथे एक वर्षांपूर्वी आलांत, मी इथे गेली वीस वर्षे रहातोय...." मी खुंटा ठोकून घट्ट केला...
"तुमचे मुद्दे खरोखरच विचार करण्यासारखे आहेत स्सार! मी त्यांचा अजून अभ्यास करीन आणि मग तुम्हाला पुन्हा फोन करून तुमच्याशी चर्चा करीन", म्हातारबुवांनी चर्चेत अखेर हार पत्करली....
"जरूर!! आता मी जेवायला जातो!! काय, येणार का माझ्याबरोबर जेवायला?" मी विचारलं.
"नो, बट थॅन्क्यू!" म्हातारबुवा हसून म्हणाले.
पण मग त्यांनी अगदी नको तो प्रश्न केला.....
"काय आहे आज जेवणाचा मेन्यू?"
"गरमागरम बीफच्या खिम्याचे पॅटिस!!!!!"
मी फोन ठेवला आणि त्या पाताळविजयम् सिनेमातल्या राक्षसासारखा हॅ, हॅ, हॅ, हॅ करून हसलो........

संगणक आणि मराठी साहित्य!

फार फार काळापूर्वीची गोष्ट....
अगदी साठी-सत्तरीच्या दशकातली!
हल्लीच्या तरूण पिढीला अगदी पुराणातल्या भूर्जपत्रावरील वाटावी अशी कथा!!
मराठी तरूण तेंव्हा नुकतेच सीमोल्लंघन करून सातासमुद्रापार जायला सुरवात झाली होती....
नाही म्हणजे, त्यापूर्वीही ते परदेशी शिकायला जात असत. पण ते म्हणजे इंग्लंडला, तांत्रिक शिक्षण असेल तर जर्मनीला. मराठी विद्यार्थ्यांनी कोलंबसाच्या देशात शिक्षणाला जायची सुरुवात प्रामुख्याने साठी-सत्तरीच्या दशकातच सुरू झाली.
आयआयटीतून निघालेले ते बुद्धिमान आणि महत्त्वाकांक्षी तरूण!
सहस्ररश्मी सूर्याप्रमाणे जणू अवघं आकाश पादक्रांत करण्यास निघाले होते....
या नवीन जगात त्यांना सगळंच अपरिचित होतं. तत्कालीन सर्वसामान्य अमेरिकावासीयांना तेंव्हा भारत हा एक शांतताप्रिय पण मागासलेला देश आहे यापेक्षा फारसं अधिक काही माहिती नव्हतं. तेंव्हा मी इंडियन आहे असे सांगितल्यावर प्रश्न यायचा की कोणती जमात? (विच ट्राईब?) संदर्भ अर्थात रेड इंडियन लोकांचा....
त्या तरूणांच्या विद्यापीठांमध्ये जरी अत्युच्च पातळीवरचं शिक्षण दिलं जात होतं पण बहुतांशी पारंपारिक पद्धतीचं होतं. तसे संगणक होते पण ते पंचकार्डवाले किंवा अगदी पुढारलेले म्हणजे २८६, ३८६. "खिडक्या" नव्हत्या. आज्ञावली पाठ करायला लागायच्या (एफ१० = सेव्ह फाईल!). क्रे सुपरकॉम्प्यूटरवर तुम्हाला सीपीयू टाईम मिळणे ही तुमच्या संशोधनासाठी अभिमानाची आणि किंचित गर्वाचीही बाब असे. इ-मेल टेक्स्ट स्वरूपात होती पण भारतातील लोकांकडे ती नसल्याने तिचा मराठी घडामोडी समजून घेण्यासाठी काही उपयोग नव्हता. पाठवलेले पत्र भारतात पोचायला तीन आठवडे आणि दिलेले उत्तर (लगेच दिले असेल तर!) परत मिळायला आणखी तीन आठवडे सहज लागत. त्यामुळे कौटुंबिक खुशाली जरी समजली तरी सामाजिक चर्चा करणे शक्यच नव्हते. फोनही ट्रंक कॉल! एकतर ते परवडत नसत आणि ते भरवशाचेही नसत. कधी लाईन डिस्कनेक्ट होईल याचा नेम नसे...
खिडक्या (विंडोज) आल्या आणि चित्रच बदललं. पेंटियम टेक्नॉलॉजी आणि मायक्रोसॉफ्ट विंडोज यामुळे सुशिक्षित पण सामान्य माणसापर्यंत संगणक जाऊन पोहोचला. ए-मेल्समुळे तात्काळ संपर्क साधता येऊ लागला. अटेचमँट पाठवायच्या सोईमुळे विचारांची देवाणघेवाण सुलभ झाली. त्यातच संकेतस्थळे आणि वैयक्तिक ब्लॉग्ज करता येऊ लागले आणि मराठी (आणि जागतीक) साहित्यविश्वात जणू क्रांतीच झाली. आधी आपली माणसे रोमन लिपी वापरून मराठी लिहू लागली. त्यानंतर काही बुद्धिमान मराठी मुलांनी इंग्रजी क्व्रर्टी कळफलक वापरून मराठी लिहिता येईल असे प्रोग्राम्स रचले आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते पब्लिक डोमेनमध्ये (विनामोबदला उपलब्ध) ठेवले. मराठी भाषेवर आणि साहित्यावर या मुलांचे अनंत अनंत उपकार आहेत. त्यांच्यामुळे आजवर इंजिनियर, शास्त्रज्ञ अशा अरसिक (?) व्यवसायात गुंतलेल्या अनेक मराठी माणसांची प्रतिभा जणू उफाळून आली. तीच गोष्ट संकेतस्थळांच्या मालकांची! पदराला तोशीस सोसून त्यांनी मायबोली, मिसळपाव, उपक्रम, मनोगत यांसारखी संकेतस्थळे चालू ठेवली आहेत. उद्या जर मराठी भाषेचा इतिहास लिहिला गेला तर या दोन गोष्टी देणार्‍या व्यक्तिंना तिथे मानाचं पान द्यावंच लागेल. घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती या उक्तीप्रमाणे घरोघरी मराठी माणसे ललित लिखाण करण्याचा प्रयत्न करू लागली. संकेतस्थळांवर जाऊन चर्चा, विचारविनिमय, आणि हो, कधीकधी भांडणेही करू लागली. आणि सर्व गोष्टींचा मराठी साहित्यावर बहुअंगाने परिणाम झाला.

प्रथम म्हणजे महाराष्ट्रातील स्थानिक मराठी वृत्तपत्रे जालावर उपलब्ध झाली. एकाच एक वर्तमानपत्राची वर्गणी लावून तेच ते वाचण्याची सक्ती संपली. जर तुमच्याकडे जाल असेल आणि वाचनाची ताकद व वेग असेल तर तुम्हाला ८-१० वर्तमानपत्रे रोज वाचण्याची सोय उपलब्ध झाली. लोकसत्ता, मटा, सकाळ या आघाडीच्या दैनिकांबरोबरच लोकमत, पुढारी, गोमांतक वगैरे प्रांतिक (रीजनल) वर्ततमानपत्रे जालावर वाचायला मिळू लागली. त्यातून फायदा हा झाला की अग्रगण्य वृत्तपत्रांचे आपल्या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाविषयीचे अज्ञान किती थोर आहे याची वाचकांना जाणीव झाली. महाराष्ट्र म्हणजे मुंबई, पुणे नागपूर व औरंगाबाद नव्हे आणि मराठी माणसाचा हुंकार हा तथाकथित आयटी/औद्योगिक उद्द्योगात काम करणार्‍या माणसाचे मनोगत नव्हे याची जाणीव झाली. विदर्भातल्या आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍याची समस्या किती भीषण आहे ते मुंबई-पुण्यातल्या पोकळ चर्चेपेक्षा (जी चर्चा मानवी जीवांच्या आत्महत्या आणि एका मंत्र्याच्या मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी चाललेल्या कारवाया एकाच मापात मोजते!) किती भिन्न आणि गंभीर आहे ते समजलं.

दुसरे म्हणजे मराठी मनाचा आत्मविश्वास वाढला. मी काहीतरी रुटूखुटू का होईना पण लिहू शकतो. ते लोकांना आवडू शकतं हे समजल्यामुळे अजून लिहिण्याची, वैचारिक असो वा ललित, इच्छा निर्माण झाली. पूर्वी मराठी लिखाण म्हणजे विद्यापीठात हायर मराठी घेतलेल्या विद्वान प्राध्यापकांचे काम! ही आपली लाइन नव्हे हा जो काही न्यूनगंड सायन्स आणि कॉमर्सच्या मुलांमध्ये होता तो नाहीसा झाला. ही मुलं प्रथम आपल्या अभ्यासाच्या विषयावर आणि नंतर (हळूच! गुपचूप!! टोपण नावाखाली!!!) ललित लेखन करुन पाहू लागली. मुळात अतिशय बुद्धिमान असल्याने त्यांनी लिहिलेलं लिखाण कसदार ठरू लागलं. मराठी साहित्याच्या दालनात एक अल्हाददायक, मोकळी हवा खेळू लागली. नवीन ताज्या दमाची जाल-लेखकांची फळी निर्माण झाली. वर्ड प्रोसेसिंगचा आणखी एक फायदा म्हणजे लिखाणात सुधारणा करण्यासाठी लिहिलेले कागद फाडून पुनःपुनः लिहिण्याची सक्ती संपली. वर्ड प्रोसेसरच्या स्क्रीनवर तिथल्यातिथे सुधारणा करता येऊ लागली. कागदी पुस्तक प्रकाशन व्यवसायातही छपाईचे खिळे जुळवण्याची गरज नाहीशी झाली. लिखाण संगणकावरच ऑफसेट करून थेट छपाईला पाठवायची सोय उपलब्ध झाली, प्रकाशनातली गुंतागुंत आणि खर्च कमी झाले.

तिसरे म्हणजे मराठीतील तथाकथित प्रकाशकांची मक्तेदारी संपली. पूर्वी लेखकाला प्रकाशकाच्या नाकदुर्‍या काढायला लागायच्या. नाही नाही त्या अटी सहन करायला लागायच्या. लोकप्रिय विषयांवरच लिखाण करायचं, समाजाला अप्रिय विषयांवर लिखाण केलं तर ते खपणार नाही म्हणूनच कोणताही प्रकाशक ते प्रकाशित करणार नाही ही भीती गेली. मला जे आवडतं आणि पटतं ते मी माझ्या ब्लॉगवर लिहीन मग त्याला कोणी वाचक नाही मिळाले तरी बेहत्तर ही एक अत्यंत आवश्यक असलेली कलंदरी लेखकांमध्ये निर्माण झाली. समाजाला न रुचणार्‍या (उदा. नास्तिकता, आदरणीय व्यक्तींच्या कार्याचे मूल्यमापन, समलिंगी संबंध) लेखनालाही प्रसिद्ध करण्याचं धैर्य लेखकांमध्ये आणि संकेतस्थळांच्या संचालकांमध्ये निर्माण झालं. त्यातून पूर्वापार चालत आलेली " मायबाप रसिक वाचक" ही भूमिका नाहीशी झाली. पूर्वीही ही भूमिका प्रामाणिक नव्हतीच, आपली पुस्तके लोकांनी विकत घेउन वाचावीत, आपण वाचकांच्या "गुड बुक्स" मध्ये असावं यासाठी पूर्वीच्या लेखकांनी आणि प्रकाशकांनी वापरलेली ती एक क्लुप्ती होती. आता मी मला जे पटतं ते लिहीन, जर वाचकांना आवडलं तर वाचकांनी माझ्या साईटवर येऊन ते वाचावं अशी भुमिका काही कलंदर लेखकांनी घेतल्यावर पारंपारिक मराठी वाचक भांबावला, क्षणभर संतापलाही. पण त्याला लगेच जुन्या "मायबाप वाचक!" मधला खोटेपणा कळून आला आणि त्याने आपल्या आवडीच्या लेखकांच्या साईटसचे फेव्हरिट्स बनवले आणि वेळोवेळी तो तिथे चक्कर टाकू लागला. प्रकाशकांची सद्दी संपली. उद्या मराठीचं भवितव्य काय ही जी प्रचलित लेखक-प्रकाशकांकडून ओरड ऐकू येते आहे त्याचे मूळ हे आता आपलं कसं होणार या भवितव्याविषयीच्या चिंतेत आहे. आज अजूनही ग्रामीण महाराष्ट्रात यांच्या पुस्तकांची तडाखेबंद विक्री होते आहे. उद्या त्या लोकांच्याही हाती संगणक आणि आंतरजाल गवसलं की आपलं काय होणार या भीतीतून ही ओरड होते आहे....

चौथे म्हणजे अस्सल मराठी माणूस होण्यासाठी महाराष्ट्रात वास्तव्य असण्याची गरज उरली नाही. मराठी मनाशी, महाराष्ट्रातील घटनांशी ज्याला आत्मीयता आहे तो मराठी माणूस ही नवीन व्याख्या रूढ झाली. पूर्वी महाराष्ट्रात रहाणारा पण जेमेतेम एक मराठी वर्तमानपत्र वाचणारा आणि क्वचित एखादे मराठी पुस्तक विकत घेणारा स्थानिक माणूसही अनिवासी मराठी माणसांना सहज हिणवू शकत असे. आता आयटी उद्योगाने बरीच पंचाईत केली आहे. आपण उगाच अनिवासी मराठी लोकांवर टीका करायची आणि आपलीच मुलगी/ मुलगा, भाचे. पुतणे पाश्चात्य देशांत असायचे!! त्यामानाने आमच्या पिढीने खूप सोसलं.!!!! आता ती सोय गेली. एखादा अनिवासी मराठी माणूसही सात-आठ वर्तमानपत्रे रोज वाचून महाराष्ट्रातल्या घटनांशी परिचित असू शकतो. स्थानिक मराठी माणसाप्रेक्षा त्याचे मराठी वाचन अधिक चौफेर असू शकते ही गोष्ट सिद्ध झाली. काही माणसांच्या ही वस्तुस्थिती पचनी पडायला अजून वेळ जातोय पण स्थानिक शहाण्या मराठी माणसांनी ही गोष्ट कधीच मान्य केलीय. भौगोलिक अंतरापेक्षा 'मराठी असणे' ही वृत्ती जास्त महत्त्वाची ठरते आहे. त्यातूनच मराठी साहित्यसंमेलन बे-एरियात भरवण्यासारखे प्रस्ताव पुढे येत आहेत.......

या सर्व बदलांचा भविष्यातील मराठी साहित्यावर काय प्रभाव पडेल? विज्ञान आणि तंत्रज्ञान इतक्या वेगाने पुढे धावत आहे की भविष्याबद्दल कल्पना करणंही कठीण आहे. एक म्हणजे जसजशी संगणक क्रांती समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचत जाईल तसतसे छापील साहित्याचे महत्त्व कमी होत जाईल. छापील साहित्यावर विसंबून रहाणारी आज वयस्कर असलेली पिढी जसजशी काळाच्या पडद्याआड अस्तंगत होत जाईल आणि नवी आंतरजालावर वावरणारी पिढी निर्माण होईल तसतसे कागदावरच्या पुस्तकांचे प्रमाण कमीकमी होत जाईल. थोडक्यात प्रकाशक ही संस्था नामशेष होत जाईल. कागदविहीन साहित्य (पेपरलेस लिटरेचर!) ही नवी संकल्पना रूढ होईल. मराठी माणसांना निरनिराळ्या विषयांवरचे त्यांच्या आवडीचे लिखाण वाचायला मिळेल. मी आता "किर्लोस्करचा' दिवाळी अंक विकत घेतलाय त्यामुळे मला आता त्यातल्या आवडत नसलेल्या कविता आणि लेखही वाचायलाच लागतायत ही अगतिकता संपेल. मराठी मासिकांना जर जगायचे असेल तर त्यांना त्यांच्या अंकांच्या इ-आवॄत्या काढायलाच लागतील. लोकप्रभासारख्या साप्ताहिकांनी ही सुरवात आता केलीच आहे. वाचकांनाही आपल्याला आवडीच्या लेखकांचे नवीन लिखाण त्यांच्या साईटवर जाउन मोफत वाचायची मुभा मिळेल. लेखकांना प्रकाशकाच्या मेहेरबानीवर अवलंबून न राहता त्यांच्या मनातील विषयांवर लिहायची मोकळीक मिळेल. प्रचलित नसलेले अनेक विषय लिखाणात येतील. मराठीची दिवसेंदिवस दुर्दशा होतेय असा जो काही हितसंबंधी लोकांनी चालवलेला धोशा आहे त्यातला फोलपणा उघडकीस येईल. मराठी साहित्यसंमेलने महाराष्ट्राखेरीज अन्यत्रही होऊ लागतील. आर्ट्सखेरीज सायन्स आणि कॉमर्सचेही लोक लेखक बनल्याने मराठीत नव्या कल्पना, नवे शब्दप्रयोग रूढ होतील. मराठी भाषा आणि मराठी साहित्य अधिक सकस व समॄद्ध बनेल. केवळ महाराष्ट्रातलाच नव्हे तर सर्व जगभर पसरलेला समस्त मराठी समाज एकमुखाने गर्जेल!

येळकोट येळकोट, जय मल्हार!
आई अंबाबाईचा, उदो उदो!!
हर हर हर हर महादेऽऽव!!!

स्मरण!

तुझी आठवण मला आता, सारखी काही येत नाही
डोळे भरणं दूर राहो, श्वासही अडकत नाही...

पावसात भिजतो, ताप येतो, मुकाट गोळ्या खातो मी,
तुझ्या गरम लापशीचं स्वप्नसुद्धा पडत नाही....

शाल पांघरून देखील तुझी माया काही मिळत नाही,
अनेक वर्षे झाली आता काळरात्र आठवत नाही...

संसार आहे माझा आता, बाबा नि भावंडं ही
पण आई, तुझ्या नसण्यानं, पोरकेपण जात नाही....

एकटं एकटं वाटतं पण, तू नेहमीच आठवत नाहीस
विसरलो नाही तुला पण बाकी खरंच काही नाही.......

बाकी खरंऽऽच काही नाही गं......

(फुलवा यांच्या "बाकी खरंच काही नाही" या कवितेवरून सुचलेलं हे मुक्तक....)