Monday, April 28, 2008

अब्दुल खान - २

एकदा अशीच गंमत झाली. हिवाळ्यात थंडीचा कडाका पडला होता. बाहेर बर्फाचे डोंगर साठले होते. हिमवृष्टीमुळे हायवेज बंद होऊन ट्राफिक जाम होणार असे वाटत होते. तशात मला भयानक सर्दी झाली होती. थोडी विश्रांती घ्यावी म्हणून ऑफिसातून लवकर घरी आलो. पहातो तर अब्दुलखान आपला घरी बसलेला! हिमवृष्टीचे लक्षण बघूनच त्याने सिक लीव्ह टाकली असावी. मी अंगावरचा बर्फ झटकत, खोकत-शिंकत, बाथरूम मध्ये गेलो. गरम शॉवर घेऊन बाहेर येईपर्यंत खानने कपाटातून बाटली काढून दोन ग्लासात दोन पेग तयार करून ठेवले होते. काही न बोलता त्याने एक ग्लास माझ्या हातात दिला. मी ही काही न बोलता तो तोंडाला लावला.
त्याच्या चेहर्‍यावर समाधान पसरलं..... मित्राची काळजी घेतल्याचं समाधान!!
पठाण हे मूलतः अतिकठोर आणि प्रसंगतः क्रूर असतात हे माझं स्टिरिओटाइप भंग पावलं होतं...
आम्ही दोघेही न बोलता खिडकीतून बाहेर चाललेलं हिमवादळाचं तांडव बघत आपापले ग्लास रिकामे करत राहिलो. तीनएक पेग संपवल्यानंतर तो म्हणाला,

"अब तेरे चेहरेपे रंग आया, सुलेशके बच्चे!!" मी हसलो...
"घरमें डबलरोटी है. मैने मेरे लिये गोश्त बनाया है. तुम क्या खाओगे?" त्याचा प्रश्न.
"अगर इनफ है तो मैं भी वही खाऊंगा"
तो गडगडाटी हसला, "गुड जोक!! लगता शराब तुम्हे घुमा रही है. लेकिन सच्ची बोलोना, कुछ बनायें तुम्हारे लिये?"
"नही, मैं सचमुच डबलरोटी-गोश्त खाऊंगा"
"अच्छा! तो ये बात है? अबे तू तो खाकर ही दिखा!! मेरी तर्फसे तुम्हे सौ डॉलर इनाम!!"
"ठीक है!" मी उठलो. दोन प्लेटस घेतल्या. दोन्हीतही गोश्त आणि पाव वाढून घेतला. एक प्लेट त्याच्या हातात दिली.

तो छद्मीपणे हसत माझ्याकडे पहात होता. जणू माझी मजल कुठपर्यंत जातेय याचा अंदाज घेत होता....
मी पावाचा तुकडा काढून गोश्तच्या रश्श्यात बुडवला. आता मी तो तोंडात घालणार इतक्यात अब्दुलखान कडाडला,

"अबे तेरा दिमाग फिर गया है क्या रे, काफीर?" त्याच्या ओरडण्यानेच मी दचकलो.
"क्यों? क्या हुवा?"
"अबे वो गोश्त है, बीफ!!"
"पता है!"
"अबे लेकिन तू तो हिन्दू है ना!"
"मतलब?"
"फिर गोश्त कैसे खाता है? बीफ खानेसे तेरा मजहब मिट नही जायेगा? ये ले तेरा सौ डॉलर, मगर ये गुस्ताखी मुझे नही करनी बाबा!!"

आता छद्मीपणे हसण्याची पाळी माझी होती...

"खानसाहब, आपको सचमुच लगता है की बीफ खानेसे मेरा हिन्दू मजहब खत्म हो जायेगा?"
"हमने तो ऐसाही सुना है, की हिन्दुओंको बीफ मना है, जैसे हम मुसलमानोंको पोर्क!! इसलिये हम पोर्क नही खाते!!"
"तो आप पाक मुसलमान है?"
"बिल्कुल! इसमें कोई शक है?"
"तो आप अभी शराब कैसे पीते थे मेरे साथ? क्या इस्लामको शराब मंजूर है?"
आता त्याच्या चेहर्‍यावर स्माईल उमटलं, नजर निवळली!! "वो बात अलग है!!"
"खानसाब, बुरा मत मानिये! मेरा मतलब ये रहा की उस उपरवाले को पाने के लिये खाने-पीने जैसी चीजोंपर पाबंदी लगानेकी जरूरत नही. और ना ही ऐसी चीजोंपर पाबंदी लगाकर उसको पाया जा सकता है"
"हां बाबा, सही है!" तो हसला...

पण त्याचं आश्चर्य विरलेलं नव्हतं. त्याने धडाधडा त्याच्या पाकिस्तानी मित्रांना फोन फिरवले. फोन स्पीकरवर लावून सगळ्यांना हेच सांगत होता,
"अरे भाई, हमे बचपनसे सिखाते आये है ना कि हिन्दू गोश्त नही खाते? वो मेरा रूममेट सुलेश है ना, वो तो गोश्त खाता है और उपरसे बोलता है कि मै फिरभी हिन्दू हूं"
आणि त्याचे सगळे पाकिस्तानी मित्रही चाट पडत होते. त्यांच्या प्रतिक्रिया ऐकुन आम्हाला इथे हसू आवरत नव्हते...

आपण जन्मभर उराशी बाळगलेले स्टिरिओटाईप्स किती पोकळ आणि फोल आहेत ते आता त्यांना कळत होतं.....

त्यानंतर त्याचे मित्रही कधी मी फोन उचलला तर मोकळेपणे माझ्याशी बोलायचे, घरी यायचे. येतांना माझ्यासाठी पाकिस्तानी खासियत खाऊ घेऊन यायचे. त्या प्रसंगानंतर अब्दुल खानवरचंही दडपण दूर झालं असावं. निरनिराळ्या विषयांवर आमच्या गप्पा व्हायच्या पण मुख्य विषय म्हणजे निरनिराळ्या देशांतले लोक इथे येऊन अमेरिकेला कसे 'चुत्या' बनवतात हा असायचा. तो शब्दही त्याला माहिती होता. एकदा आम्ही असेच गप्पा मारत बसलो होतो. विषय होता बिर्याणी! अर्थातच तो बोलत होता आणि मी ऐकत होतो. नुकतेच आम्ही एका इंडियन रेस्टॉरंटमध्ये जेवून आलो होतो. अब्दुल खान त्यांच्या बिर्याणीला शिव्यांची लाखोली वहात होता. त्या बिर्याणीच्या तुलनेत त्याच्या पेशावर मध्ये रेल्वे स्टेशनवर मिळणारी बिर्याणीसुद्धा किती चांगली असते ते सांगत होता!! पाकिस्तानातील निरनिराळ्या प्रांतात मिळणार्‍या बिर्याण्यांची खासियत वर्णन करत होता. बोलता बोलता नकळत म्हणाला,

"एक बात बताऊं सुलेश! इन लोगोंको अच्छी बिर्यानी बनाने क्यों नही आती पता है? ये इंडियाका बासमती राईस इस्तेमाल करते है! सस्ता होता है ना, इसलिये!! हमारे पाकिस्तान के इंडस बासमती राईसके जैसा राईस अलम दुनियामें पैदा नही होता." त्याच्या चेहर्‍यावरून अभिमान ओसंडत होता...

अनुभवाअंती माझंही तेच मत झालं आहे. भारताचा देशाभिमान वगैरे ठीक आहे पण पाकी सिंधूच्या खोर्‍यात होणार्‍या बासमतीला पर्याय नाही!! महाग असतो पण पैसा वसूल!!! जसा त्यांचा कोणताही आंबा आपल्या हापुसची बरोबरी करू शकत नाही तसा आपला बासमती त्यांच्या इंडस बासमती तांदळाशी मुकाबला करू शकत नाही!!!

बोलता-बोलता त्याची नजर माझ्या मनगटाकडे गेली...
"घडी नयी ली है क्या सुलेश!"
"नही तो! पुरानीही है!!"
"दिखा, दिखा!!" मी मनगटावरचं घड्याळ काढून त्याच्या हातात दिलं.
"बहुत बढिया है!" त्याने घड्याळ बारकाईने न्याहाळलं. डायलवरची अक्षरं वाचायचा प्रयत्न केला...
"हेच्...हेम्...टी...! ये क्या है?"
"हिंदुस्तान मशीन ऍन्ड टूल्स! घडी बनानेवाली कंपनीका नाम है!!"

त्याने तीक्ष्ण नजरेने माझ्याकडे पाहिले.

"तुम्हारा क्या मतलब, ये इंडियामें बनी है?"
"हां!! हिंदुस्तान मशीन ऍन्ड टूल्स, बंगलोरमें फॅक्टरी है"

अब्दुल खान एकदम गप्प झाला. बराच वेळ हातातल्या घड्याळाकडे बघत राहिला. नंतर घड्याळ माझ्या हातात देत गंभीरपणे स्वतःशीच बोलल्यासारखा म्हणाला,

"पाकिस्तान और इंडिया! दोनो एकसाथ इन्किलाब हुवे!! लेकिन तुम लोगोने कितनी तरक्की कर ली!! हम वहीं के वहीं रहें!! ऐसी खूबसूरत घडियां पाकिस्तानमें नही बनती!!!"
"लेकिन खानसाब, आपके पास इंडस राईस तो है!" मी त्याला खुलवण्याचा प्रयत्न केला. तो हसला...
"हां, इंडस राईस हमें भूखा नही रखेगा, चाहे टेक्नॉलॉजीमें हम कितनेंभी पीछे क्यों न रह जायें!!!" तो उपरोधिकपणे म्हणाला. मला त्याची वेदना जाणवली, मी विषय बदलायचा प्रयत्न केला. पण अब्दुलखान विषय सोडायला तयार नव्हता....

"तुम्हें पता है सुलेश, उस टाईमपर हमारे पठान लीडर गफ्फारखानने मांग की थी की जैसे ईस्ट और वेस्ट पाकिस्तान बनाया है वैसे नॉर्थ्-वेस्ट फ्रंटियरको अलग रखके उसे वेस्ट इंडिया बनाओ! लेकिन किसीने उनकी नही सुनी!! अभी शायद कभी कभी लगता है कहीं वे सही और हम गलत तो नही थे?"

मला काय बोलावे ते कळेना!! मग त्यानेच विषय बदलला,

"खैर! छोडो इन पुरानी बातोंको!! चलो कुछ इंडियन मूव्ही देखते है!! उस एरियामें तुम इंडियनोंका जवाब नही!! क्या एक-एक हिरॉईन है तुम्हारी, वल्ला!!" हाताची चारी बोटे ओठांना लावून हवेतल्या हवेत मुका घेत म्हणाला. मग आम्ही आपले कुठलातरी हिन्दी सिनेमा बघत राहिलो.....

त्याला हिंदी सिनेमे खूप आवडायचे! त्यातही प्रत्यक्ष सिनेमापेक्षा गाणी छायागीत सारखी बघायला आवडायची. या बाबतीत त्याची आणि माझी आवड सारखी होती.

"पूरी फिलम क्या देखनी, सबकी स्टोरी तो एकही होती है!!" हे त्याचं मत मला पूर्ण मान्य होतं!!! पण त्याची इतर काही काही मतं एकदम भन्नाट होती. एकदा काय झालं....

(क्रमशः)

Thursday, April 24, 2008

अब्दुल खान - १

"ईन्शाल्ला, सब ठीक हो जायेगा!"

परवा एका इंडियन रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो. तिथे बाजूच्या एका टेबलावरून कोणीतरी कुणालातरी म्हटलेले हे उद्गार कानी पडले आणि मला एकदम अब्दुल खानची आठवण झाली. "ईन्शाल्ला, सब ठीक हो जायेगा!" हा त्याचा तकियाकलाम (पालुपद) होता. मधली वीस-पंचवीस वर्षे जणू वितळून गेली आणि जसे आत्ताच त्याला भेटून आल्यासारख्या आठवणी जाग्या झाल्या!

अब्दुल खान हा माझा जुना मित्र आणि एकेकाळचा रूममेट! त्यावेळी मी नुकतेच एम्.बी.ए. संपवले होते. पण कोर्सवर्क संपले तरी कमीतकमी सहा महिन्यांचा तरी प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतल्याशिवाय डिग्री द्यायची नाही असा आमच्या युनिव्हर्सिटीचा एक नियम होता. त्यामूळे आम्ही विद्यार्थ्यांनी विविध कंपन्यांना ऍप्रेंटिसशिप साठी अर्ज पाठवले होते. त्यात माझी एका न्यूयॉर्कच्या इन्व्हेस्टमेंट कंपनीत निवड झाली होती. प्रत्यक्ष वॉल स्ट्रीटवर काम करायला मिळणार याचा मला विलक्षण आनंद झाला होता. त्या आनंदातच मी माझा बाडबिस्तारा (दोन बॅगा, एकीत कपडे आणि दोन्-चार भांडी, आणि दुसरीत पुस्तके! स्टुडंटकडे आणखी संसार काय असणार!) घेऊन न्यूयॉर्कमध्ये दाखल झालो होतो. नदीपल्याडच्या न्यूजर्सीत एका गुजुभाईच्या सुमार मोटेलमध्ये तात्पुरता उतरलो होतो. रहाण्यासाठी जागा शोधत होतो आणि त्या काळातही न्यूयॉर्कमध्ये ती मिळणे किती दुरापास्त आहे याचा अनुभव घेत होतो. माझ्या अपेक्षा अगदीच माफक होत्या पण त्या पूर्ण करणार्‍या जागादेखील माझा स्टुडंट बजेटच्या बाहेर होत्या.

करता-करता कामाचा पहिला दिवस उजाडला आणि कंपनीत जाऊन हजर झालो. पहातो तो तिथे माझ्यासारखेच आणखी आठ-दहा इंटर्न्स आले होते. एकमेकांची ओळख झाली आणि गप्पा सुरू झाल्या. त्यावेळेलाच मी जाहीर करुन टाकले की मी शहरात नवीनच आहे आणि जागा/ रुममेट शोधत आहे. कुणाला गरज असेल अथवा जागेविषयी काही माहिती असेल तर सांगा. थोड्या वेळाने त्यातील एक एशियन दिसणारा मुलगा माझ्या जवळ आला.

"माय नेम इज इक्बाल", त्याने हात मिळवला. मी ही माझं नांव सांगितलं.
"व्हेअर आर यू फ्रॉम?"
'बॉम्बे", मला त्याचा रोख कळला होता.
"आय ऍम फ्रॉम कराची" त्याने हिंदीतून सुरवात केली. "तभी तुमने कहा की रहनेके लिये मकान ढूंढ रहे हो, कुछ लीडस मिलें है?"
मी नकारार्थी मान हलवली.
"तुम कहां रहते हो?" मी चौकशी केली.
"यहींपर क्वीन्स में! मेरी बहन और बहनोई के साथ!"
"अच्छा है! काश मेराभी कोई बहनोई यहां होता!' माझं फ्रस्ट्रेशन बोललं. त्याने गोड हसुन विषय बदलला.

दुसर्‍या दिवशी आम्ही आपापल्या कामात मग्न असतांना इक्बाल माझ्या टेबलाजवळ आला.
"सलाम आलेकुम" आज त्याने देशी सुरवात केली, 'कैसे हो? कुछ मकानकी बात बन पायी?"
"नही, अभीतक नही."
"मेरे पास एक लीड है, इफ यू आर इंटरेस्टेड!"
"ऑफ कोर्स, आय ऍम इंटरेस्टेड, इक्बाल! तुम्हें क्या लगा मैं मजाक कर रहा हूं?" मी तडकून बोललो.
"माशाल्ला, ऐसी तो बात नही भाई! देखो, मेरे पहचानका एक आदमी है, जो रुममेट ढुंढ रहा है. अगर तुम्हें इंटरेस्ट हो तो बात करा दूं......"
"कहां है जगह?" माझे डोळे लकाकले. लांडग्याला भक्ष्य दिसल्यागत!!
"मेरे नजदीकही है क्वीन्समें, ऍस्टोरियामें! एरिया सेफ है, ज्यादातर ग्रीक और सायप्रसके लोग रहते है, फॅमिलीवाले है. अपार्ट्मेंटभी अच्छा है, टू-बेडरूम, फर्निश्ड है. एक रूम तुम्हे मिलेगी, लिव्हिंगरूम, किचन और बाथरूम शेअर करनी पडेगी"
"तो कब बात करा रहे हो?" माझ्या तोंडाला सुटलेलं पाणी खाली गळेल की काय अशी मला भीती वाटू लागली. पण इक्बाल थोडा घुटमळला.
"लेकिन एक बात है. पहलेही क्लिअर करना चाहता हुं." त्याचा आवाज सिरियस झाला.
"क्या बात है? पैसे बहुत मांग रहा है क्या?" मी माझ्या मनातली भीती बोलून दाखवली.
"नही वो बात नही" इक्बाल परत घूटमळला, "वह आदमी हमारे पाकिस्तानसे है. और तुम तो इंडियासे हो, इसलिये..."
"तो क्या हुआ? वैसेभी इस न्यूयॉर्क में अगर कोई गोरा या काला रुममेट मिल जाता तो मै क्या करता? यह कमसे कम अपनी जबान में तो बोलेगा!"
"तो फिर ठीक है. मै आजही उससे बात करके मुलाकात पक्की कर लेता हूं. लेकिन अगर तुम्हारा काम हो गया तो मुझे एक लंच तुम्हारी तरफसे मुफ्त", इक्बाल मिश्किलपणे म्हणाला.
"अरे मेरे बाप, मेरा ये काम तू कर दे. मैं लंच क्या, तेरी शादीभी करा दुंगा!!"

दोन दिवसांनी इक्बालने ठरवल्याप्रमाणे तो आणि मी अपार्टमेंट पहाण्यासाठी गेलो. एका इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावर जाऊन एका दरवाजाची इक्बालने बेल दाबली.

"हू इज इट?' आतुन एक कठोर घोगरा आवाज आला.
"मैं इक्बाल हुं, जी" दरवाजा उघडला गेला.
"सलाम आलेकुम इक्बालमियां" आता आवाज बराच मॄदू झाला होता.
"आलेकुम सलाम जी, खानसाहब! वो आपके मेहमान लेके आया हूं"
"आवो, अंदर आवो!"

आम्ही आत गेलो. त्या माणसाने माझ्याशी शेकहँड केला. माझ्या हाताचे तुकडे कसे पडले नाहीत कोण जाणे. कळ डोक्यात गेली.
"आय ऍम खान अब्दुल खान पठाण. इक्बालके साथ काम करते हो?"
"जी हां"
"रूममेट बनना चाहते हो?"
"अगर आपकी मर्जी हो तो"
त्याला माझं उत्तर आवडलं असावं. त्याने आम्हाला जागा दाखवली. आम्ही अपार्ट्मेंट पाहिलं. स्वच्छ! फर्निश्ड!! मला खूपच पसंत आलं. त्याने सांगितलेलं भाडंही माझ्या आवाक्यातलं होतं. माझी खुशी त्याने जाणली असावी. तो गंभीर आवाजात बोलला,
"मुझे पता है की मैं किराया कम बोल रहा हूं. इसलिये की मेरी एक शर्त है. मैं रातको काम करता हूं इसलिये दिनमे सोता हूं. मुझे दिनमें यहांपर पूरी शांती चाहिये. अगर तुम्हें दिनमें टीव्ही देखनेका या दोस्तोंके साथ पार्टियां करनेका शौक है तो अपनी बात जमनेवाली नही"
"खानसाब, दिनमें तो मैं कामपर होता हुं, रातको लौटुंगा. और वैसेभी इस शहरमें नया हूं. ये इक्बाल छोडकर और कोई दोस्त तो है नही" मी काही झालं तरी आता हे डील क्लोज करणारच होतो.
"तो फिर ठीक है, पहले हफ्तेका किराया लाये हो?"
मी चेक फाडला. त्याने अपार्ट्मेंटची चावी माझ्या हातात ठेवली. माझा आनंद गगनात मावेना. मी जायला उठलो.
"अभी चाय लेकेही जाना."
"नही, उसकी क्या जरूरत है?", मी.
"नीचे बैठ जावो!" त्या आवाजाला विलक्षण कठोरता आली, "चाय... लेके... जाना...".
मी दचकून इक्बालकडे पाहिले. त्याचा चेहरा पांढराफटक पडला होता. त्याने डोळ्यानेच मला खाली बसायची खूण केली. आम्ही केशर आणि मध घातलेला पठाणी चहा घेतला. चहा संपल्यावर कप खाली ठेवत अब्दुलखान निरोप देत परत मॄदु आवाजात म्हणाला,
"अब तुम्हारे पास चाबी है, जब जी चाहे मूव्ह हो जाना. देर शामसे आये तो मै घरपे रहूंगा नही, पर तुम कभीभी आ जाना! इन्शाल्ला! सब ठीक हो जायेगा!!"

आम्ही बाहेर पडलो. माझी अस्वस्थता ओळखून इक्बाल म्हणाला,
"सॉरी यार, एक बात तुमसे कहना तो भूल गया. इन पठानोंमे अगर कोई उनकी दी हुयी खातिरदारीको इन्कार करता है तो वे अपना पर्सनल इन्सल्ट समझते हैं. सब पाकिस्तानी यह बात जानते है. मै ये भूल गया के हालांकि तुम और हम जबान एकही बोलते है लेकिन तुम इंडियन हो, तुम्हे ये बात पता न होगी! मेरा खयाल है की शायद उसे भी पता था की इंडियन होने के नाते तुम इस बातसे वाकिफ न होंगे, इसलिये उसने खाली जबानही चलायी. अगर तुम्हारी जगह पर मैं ऐसा कुछ बोलता तो वह छुराही निकालता!!"
"परमेश्वराऽऽ! कुठल्या लफड्यात मी येउन पडलोय!!" मी एक दीर्घ सुस्कारा सोडला...

यथावकाश मी त्या अपार्ट्मेंटमध्ये स्थिरावलो. सुरवातीला मी आणि अब्दुलखान एकमेकांना भेटण्याचे प्रसंगच आले नाहीत. दिवसा मी सकाळी लवकर ऊठून कामावर जाई, तेंव्हा अब्दुलखान घरी आलेला नसायचा. कामावर शिकण्यासारखे खूप काही असल्याने मला रात्री परत यायला उशीर होई तेंव्हा तो कामावर गेलेला असायचा. पहिला आठवडा असाच गेला. त्यानंतरच्या पहिल्या रविवारी घडलेली गोष्ट!!

रविवारची सुट्टी असल्याने मी थोडासा उशीराच उठलो. पहातो तर अब्दुलखान त्याच्या खोलीत येऊन झोपला होता. मी ही माझं आवरून कपडे लॉन्ड्री वगैरे करायला बाहेर पडलो. जवळपास काय-काय मिळतं याचा अंदाज घेतला. बाहेरच जेवलो आणि दुपारी एक-दीडच्या सुमारास परत आलो. पहातो तर अब्दुलखान जागा झालेला होता. किचनमध्ये काहीतरी करत होता. मला पाहताच म्हणाला,
"चाय पिवोगे?"
"जरूर!", याखेपेस नाही म्हणण्याची चूक मी करणार नव्हतो. सुर्‍याचे घाव झेलायला सोबत इक्बालही नव्हता...

माझ्यापुढे चहाचा कप ठेवून तो समोर येऊन बसला. सहा फूट उंची, गोरा वर्ण - रापून तांबूस झालेला! भक्कम शरीर- अडीचशे पौंड वजन असावं! हिरवे भेदक डोळे! केस बारीक कापलेले, दाढी शेव्ह केलेली पण भरघोस मिश्या राखलेल्या! अगदी कान्होजी जेध्यांच्या चित्राची आठवण करून देणार्‍या!!
"तो कहांसे हो तुम सुलेश?" त्याने सुरवात केली. मी माझं नांव त्याला सांगितलं होतं पण एकतर त्याच्या ते लक्षात नव्हतं किंवा त्याला फिकीर नव्हती. त्याच्या दॄष्टीने मी सुलेश होतो आणि अजूनही आहे...
'बॉम्बेसे"
"तुम इंडियन तो लगते नही!"
"मतलब?"
"इंडियन्स आर शॉर्ट, डार्क ऍन्ड थिन! तुम तो तीनो नही हो! पारसी हो क्या?"
"जी नही, मै महाराष्ट्रियन हूं" मी त्याला समजेल अशा शब्दांत सांगायचा प्रयत्न केला.
"ये कौम तो मुझे पता नही है"
"हमें मराठी भी कहते है".
"मराठी...मराऽऽठी.... मराऽऽठा...हां हां मराठा!!! शिवाजी?"
"जी हां!", मी.
आता बघा! या दिलेरखानाला महाराष्ट्र माहिती नव्हता पण शिवाजी बरोब्बर माहिती होता...
"पहाडोंवाला मुल्क है तुम्हारा?"
"हां, लेकिन आपको शिवाजी कैसे पता?" माझं आश्चर्य!
"अरे हमारे यहां जनरेशन्स से दादा-परदादा बताते आये हैं तुम्हारे सूरमा शिवाजी और उसके पहाडी मुल्कके बारेमे! कहते है, पठानोने पूरे हिन्दोस्तांमे फतेह पायी. लेकिन सिर्फ शिवाजीके मराठा और उसके पहाडोंके सामने वे कामयाब नही हुवे!!"

माझ्या अंगावर सरसरून काटा उभा राहिला. माझ्या पूर्वजांच्या पराक्रमाची कीर्ती त्यांचा एक हाडवैरी, एका सर्वस्वी परक्या अमेरिकेत माझ्यासमोर गात होता...

"सुभानल्ला! फिर तो तुम तो हमारे जैसेही हो यार!"
"आपके जैसे?" मला काही कळेना.
"हां, हां, हमारे जैसे! समशेरबहाद्दर!! हमारे मुल्कमें एक कहावत है,
"सिख, मराठा, पठान, गोरखा,
ये है असिजीवी
बाकी सब तो मसीजीवी
"मतलब समझे? की पूरे हिन्दोस्तांमे सिर्फ सिख्ख, मराठा, पठान और गुरखा ये चारही कौमें ऐसी है जो दुश्मनके खून पर जिया करती है. बाकी सब कौमें मसीजीवी, मतलब, स्याही पर जिया करती है..."
अब्दुलखान उठून उभा राहिला, आणि म्हणाला,
"वाह, वाह, बडी खुषी हुई आज पहले बार एक मराठासे मिलके! आवो, गले मिल जावो!" असं म्हणून मला आलिंगन दिलं.

तेंव्हापासून त्याने मला एक रूममेट म्हणुन न वागवता एक मित्र म्हणून वागवायला सुरवात केली। आमच्यात एक नविनच मैत्रीचा बंध निर्माण झाला. आम्ही दोघंही १९४७ नंतर जन्म झालेले! त्यामुळे तो त्याच्या देशाचा नागरीक आणि मी भारताचा! आम्ही दोघंही परस्परांबद्दल बरंच काही नवीन शिकत होतो. आमचे दोघांचेही काही पूर्वग्रह होते, आपापल्या समाजाने करून दिलेल्या समजुती होत्या. त्यामुळे कधीकधी खूप गंमत व्हायची! माझ्या दृष्टीने त्याचा देश पाकिस्तान आणि माझा हिंदुस्तान! पण त्याचा दृष्टीकोन वेगळा होता. त्याच्या बोलण्यात म्हणजे फाळणीपूर्व भारत हा हिन्दोस्तां, आणि फाळणीनंतर त्याचा पाकिस्तान आणि माझा इंडिया! त्यातही हिन्दोस्तां म्हणतानाचा आदर आणि अभिमान इंडिया म्हणतांना थोडा कमी व्हायचा!! तसा धार्मिक होता, कधीकधी नमाज पढतांना दिसायचा! सुट्टीच्या दिवशी क्वचित कुराणेशरीफही वाचायचा!! मी हिन्दू असल्याचे त्याने ताडले होते. पण कधीही स्वतःहून धर्मावरची चर्चा चुकुनही सुरू करीत नसे. त्याच्यामते व्यक्तिस्वातंत्र्याला, मित्राचं मन जपण्याला जास्त महत्त्व असावं!! तरीसुद्धा गोंधळ हे व्हायचेच!!

एकदा अशीच गंमत झाली....
(क्रमश:)

Saturday, April 12, 2008

दुरावा!!

विमानतळावरचा आगमन लाऊंज माणसांनी अगदी फुलून गेला होता. नुकतीच मुंबईहून आलेली एअर इंडियाची फ्लाईट लागली होती. प्रवासी इमिग्रेशन, कस्टम्स आटोपून बंद दरवाजातून हळूहळू बाहेर येत होते. असेच एकदा दरवाजा ढकलून आजी आणि आजोबा बाहेर आले. आजोबा बॅगा लादलेली जड गाडी हळूहळू ढकलत होते. आजी संधिवातामुळे हळूहळू चालत होत्या. दोघांचेही चेहरे प्रवासाने दमलेले, किंचित बावरलेले. त्यांची ही पहिलीच विदेशवारी होती. भिरभिरती नजर काहीतरी शोधत होती. इतक्यात आजोबांचा चेहरा फुलला,
"ती बघ, सुमा आलीय", ते आजींना म्हणाले.
आजींनी मान वर करून नजर स्थिर करेपर्यंत गर्दीतून वाट काढत सुमा त्यांच्यापर्यंत पोचलीच. हसतमुखाने तिने दोघांनाही मिठी मारली.
"दमलात ना! इथे बसा पाच मिनीटं, पाणी प्या."
पाणी वगैरे पिऊन झाल्यानंतर सुमाने ढकलगाडी आपल्या ताब्यात घेतली.
"चला जाऊया! थोडं चालावं लागेल, गाडी समोरच्या पार्किंग लॉटमध्ये लावलीय", सुमा.
"अगं पण हे काय? जावई कुठायत?"
"तोच येणार होता तुम्हाला घ्यायला. पण त्याला ऐनवेळी महत्त्वाची मिटिंग लागली म्हणून मी आले."
पार्किंग लॉटमध्ये गाडीजवळ आल्यावर सुमाने बॅगा ट्रंकमध्ये टाकल्या, आजी-आजोबांना मागच्या सीटवर बसवलं आणि सराईतपणे ती ड्रायव्हरच्या सीटवर येऊन बसली.
सायंकाळची वेळ होती. एअरपोर्ट मागे टाकून गाडी हायवेला लागली तशी सुमाच्या गप्पा सुरु झाल्या. आजीआजोबांच्या तब्येतीची चवकशी, इंडियातील इतर नातेवाईकांची चवकशी, मुंबईचं हवापाणी वगैरे वगैरे! आजीच प्रामुख्याने गप्पांत भाग घेत होत्या, आजोबा गप्प होते. विचारलेल्या प्रश्नांना एक-दोन शब्दांतच उत्तरं देत होते. त्यांची नजर गाडीतून बाहेर आजूबाजूला फिरत होती. हायवे वरच्या बंदुकीच्या गोळ्यांसारख्या प्रचंड वेगाने जाण्यार्‍या वाहनांनी धास्तावत होती.
"काय हरामखोर जावई आहे आमचा! स्वतः यायचं सोडून हिला एकटीला या भयंकर रहदारीतून पाठवली. मला लग्नाआधीच याचं लक्षण कळलं होतं. मी सुमाला तसं म्हणालोही होतो पण कार्टी ऐकेल तर शपथ! ही प्रेमात पडली होती ना त्याच्या! आता भोगतेय आपल्या कर्माची फळं!" आजोबांच्या डोक्यात विचार गर्दी करत होते. त्यांनी एक-दोन वेळा सुमाला गाडीचा वेग कमी कर म्हणून सांगितलंही होतं. तिने अर्थातच त्याकडे काही न बोलता दुर्लक्ष केलं होतं. त्यामुळे त्यांचा संताप अजून वाढला होता. शेवटी ते चिडून काहितरी बोलणार इतक्यात सुमाने एक्झिट घेतला, गाडीचा वेग मंदावला.
"आता जवळ आलं आपलं घर", सुमा म्हणाली. आजोबांनी राग गिळला.
डौलदार वळण घेऊन गाडी एका बंगल्याच्या ड्राईव्हवे वर उभी राहिली. आजी-आजोबांनी पाहिलं, जावई दरवाजात उभे होते. आता जरा वयस्कर वाटत होते, केस जरा विरळ, कानशिलाशी किंचित पिकलेले, पोट जरासं सुटलेलं. त्यांच्या पायाला बिलगून एक लोकरीचा गुंडा उभा होता. कुतुहलाने या दोघा म्हातार्‍यांकडे पहात होता.
"या, या! प्रवासाचा खूप त्रास नाही ना झाला?" जावयांनी स्वागत केलं. गाडीतल्या बॅगा घरात आणून टाकल्या. सगळे आत घरात आले.
तो लोकरीचा गुंडा अजुनही या म्हातारयांकडेच बघत होता.
"समीर, आजीआजोबांना नमस्कार कर!" सुमा म्हणाली. तो तसाच उभा राहिला.
"अरे, दे आर युअर ग्रँडमा ऍन्ड ग्रँडपा!" जावई म्हणाले. त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही.
"असू दे!", आजीने त्याला जवळ घेतलं, "अरे किती मोठा झालास रे समीर! गेल्यावेळेला तुला मुंबईत पाहिला तेंव्हा दहा महिन्याचा होतास."
समीरला काही कळलं नाही पण आपलं कौतुक चाललंय हे समजलं. तो आजीच्या मांडीवर बसला.
"मी तुझी आजी आणि हे तुझे आजोबा! हे बघ आजोबांनी तुझ्यासाठी काय आणलंय!" आजीने एका बॅगेतून एक वस्तू काढली. आजोबांना आठवलं, जवळ जवळ वर्षभरापूर्वी पूर्वी ते एकदा अष्ट्विनायकाच्या यात्रेला गेले होते तेंव्हा त्यांनी एक संगमरवरी गणपतीची मूर्ती विकत घेतली होती, समीरसाठी! छोट्या मुलासाठी अशी भेटवस्तू घेतल्याबद्दल आजींनी त्यांची थट्टाही केली होती. पण त्यांनी त्याकडे तेंव्हा दुर्लक्ष केलं होतं.
मूर्ती पाहिल्यावर समीरचा चेहरा फुलला. आजोबा आपल्या साडेचार वर्षांच्या नातवाकडे पहात होते.
"से थँक्यु, समीर!" जावई आपला ठेवणीतला आवाज काढत म्हणाले. आवाजातला फरक समीरने ओळखला.
"थँक......यू..." एक एक अक्षर ओढत तो म्हणाला.
"नाऊ टेल देम युअर नेम"
"मनेम इज शमीऽऽऽऽऽ"
"डू यू नो हू वुई आर?" आजोबांनी प्रथमच त्याच्याच भाषेत संवाद करायचा प्रयत्न केला.
"युर ग्रँमा ऍन ग्रँफा" समीर म्हणाला आणि मूर्ती हातात घेऊन आत कुठेतरी पळून गेला.
थोडं पिठलंभात खाऊन झाल्यानंतर सुमाने आजीआजोबांना घर दाखवायला सुरवात केली. जावई जेवून त्यांच्या अभ्यासिकेत गेले होते. समीरही कुठे दिसत नव्हता. पुढलं अंगण, मागलं परसू आणि तळमजला बघूनच आजींचे पाय भरून आले.
"वरचा मजला उद्या बघू", सुमा समजूतदारपणे म्हणाली, "तुम्ही आता विश्रांती घ्या, दमला असाल इतक्या लांबच्या प्रवासाने. आईला संधिवात आहे, वर चढउतर सारखी करायला नको म्हणून तुमची व्यवस्था इथे तळमजल्यावरच्याच गेस्टरूममध्ये केली आहे, चालेल ना? शेजारीच बाथरूमही आहे आणि किचनही इथेच आहे. आमची बेडरूम वरती आहे. काही रात्री लागलं तर हे बटण दाबून हाक मारा, आम्हाला वर ऐकू येईल." सुमाने इंटरकॉमचं बटण दाखवलं.
"घरातल्या घरात फोन, काय एकेक थेरं आहेत", आजोबांचं विचारचक्र परत चालू झालं.
"अगं पण समीर कुठेय?" आजीने विचारलं
"तो झोपला त्याच्या खोलीत"
"इतक्या लहान मुलाला एकटा झोपवतां?" आजोबांचा प्रश्न
"इथे अशीच पद्धत आहे. हा तर साडेचार वर्षांचा आहे, इतर मुलांना तर एक वर्षापासून स्वतंत्र झोपवतात", सुमा
"अतिशहाणे आहांत", आजोबांचा राग, मनात.
गादीवर पडल्यावर आजोबांना झोप येईना. आजी पाच मिनिटातच झोपी गेल्या होत्या. आजोबा बिछान्यावर तळमळत विचार करत पडले होते. दिवसभरातले प्रसंग आठवत होते. कुठंतरी काहीतरी खटकत होतं. 'जावयांनी एअरपोर्टवर न येणं, सुमाचं भन्नाट ड्रायव्हिंग, इनमिन तीन माणसांसाठी असलेला तो बंगला. बंगला कसला प्रासाद! आजवर कुणाचं घर बघतांना दमायला झालं नव्हतं!! ज्या नातवाला बघायला आलो त्याचं तुटक बोलणं. समीरने आपल्या पाया पडावं अशी त्यांची अपेक्षा नव्हती पण आजोबांच्या जवळ येऊन पापा द्यायला काय हरकत होती? आता वेगळ्या खोलीत झोपवतात म्हणे. काय त्याची भाषा आणि काय त्याचे उच्चार! त्याच्यात भारतीय काहीच नाही, पूर्ण अमेरिकन झाला आहे. हेच बघायला आलो का आपण! छे, झक मारली आणि आपण बायकोचं ऐकलं. इथे आलो हेच चुकलं!!'
विचारांच्या चक्रात कधीतरी त्यांना झोप लागली. जाग आली तेंव्हा पहाट झाली होती. खिडकीतून बाहेर पाहिलं तर नुकतच उजाडत होतं. भिंतीवरच्या घड्याळात सहा वाजत होते. त्यांनी आजींकडे नजर टाकली. त्या गाढ झोपेत होत्या.
"झोपू दे, दमली असेल" असा विचार करून ते हळूच बाथरूमकडे गेले. दिवा लावल्यावर तिथला झगझगाट पाहून एकदम अवघडले.
"गरज काय इतका उजेड करायची? वीज किती खर्च होते? आम्हाला काय आमचे अवयव कुठे आहेत ते माहित नाही?" रात्रीचे विचारचक्र पुन्हा सुरु झाले. कसेबसे प्रातर्विधी आटोपून ते दिवाणखान्यात आले. घरात सगळीकडे सामसूम होती. भलीमोठी खिडकी समोर असलेल्या एका सोफ्यावर जाऊन बसले. बाहेर सकाळ होत होती. रात्री थोडा पाऊस पडून गेला असावा. बाहेर एक काळशार रस्ता दूरवर जात होता. रस्त्याच्या दोन्ही कडांना झाडं होती, त्यामागे ओळीत मांडल्यासारखी घरं! पण एक गोष्ट विचित्र होती. उजाडलं तरी त्या रस्त्यावर एकही चिटपाखरूही नव्हतं. काही तासांपूर्वीच मुंबईच्या कोलाहलातून आलेल्या आजोबांना ती शांतता सहन होईना. बातम्या तरी बघाव्यात म्हणून ते टीव्हीकडे वळले पण तो अजस्त्र साठ इंची टिव्ही पाहिल्यावर त्याचे तंत्र आपल्याला जमणारे नाही याची खात्री पटून ते अजूनच वैतागले. शेवटी परत जाऊन ते सोफ्यावर बसले आणि डोळे मिटून आपले प्रातःस्तोत्र पुट्पुटू लागले.
असा किती वेळ गेला कोण जाणे. अचानक धड धड धड असा आवाज ऐकू आल्याने आजोबा भानावर आले. डोळे उघडून त्यांनी पाठीमागे वळून आवाजाच्या दिशेने पाहिले. समीर त्याच्या खोलीतून धावत कुठेतरी निघून गेला. आजोबांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपल्या स्तोत्राकडे मन केन्द्रित केलं. पुन्हा काही वेळाने धडधड आवाज आला. समीर कुठुनतरी आला होता. त्याच्या ओंजळीत काहीतरी होतं.
वैतागलेल्या आजोबांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि ते खिडकीबाहेर नजर लावून बसले. त्यांचा राग आता शिगेला पोचला होता. या कार्ट्याच्या एक ठेवून द्यावी असं त्यांना वाटत होतं. त्यांनी कसंबसं स्वतःला आवरलं आणि पुन्हा खिडकीबाहेर नजर लावली.
यावेळी समीर वरच्या मजल्यावरील त्याच्या खोलीत न जाता देवघरात घुसला होता. हा तिथे काय गोंधळ घालतोय हे न कळून आजोबा थोड्याशा अनिच्छेनेच त्याच्या मगोमाग गेले. आणि त्यांनी पाहिले....
देवघरातल्या चौरंगावर त्यांनी कालच दिलेली गजाननाची संगमरवरी मूर्ती ठेवेलेली होती. त्यावर समीरने नुकतीच बॅकयार्डमधून तोडून आणलेली फुले वाहीलेली होती. समीर त्यांच्याकडे पाठमोरा होउन उभा होता. हात जोडलेले, डोळे मिटलेले...
तल्लीन होउन ते गोबरंगुबरं ध्यान म्हणत होतं...
"प्लालंभी विनंती कलू गनपती, विद्यादयाशागला,
अज्ञानतत्व हलोनी बुद्धिमती दे, आलाघ्य मोलेश्वला,
चिंता क्लेश दलिद्ल्य दुख: अवघे, देशांतला पाठवी...."
आजोबा विस्फारलेल्या डोळ्यांनी तल्लीन झालेल्या त्या पिटुकल्या ध्यानाकडे पहात राहिले.....
आणि पुढच्याच क्षणी त्यांनी गहिवरून धावत जाऊन नातवाला पोटाशी घेतले......
तो ही त्यांच्या कुशीत तोंड खुपसून त्यांना बिलगला......
कसला एव्हढा मोठा आवाज झाला म्हणून सुमा व जावई देवघराच्या दारात जमा झाले होते. पण आजोबांना त्याची पर्वा नव्हती....
आजोबांचे डोळे पाझरत होते.....
आपल्या नातवाला उराशी धरुन ते मुक्तपणे स्फुंदत होते....
दोन पिढ्यातल्या आणि दोन देशांतल्या दुराव्यापेक्षा एकाच संस्कृतीच्या, एकाच रक्ताच्या पेशी वरचढ ठरल्या होत्या...........

मालकी!!

गौतम बुद्धांची एक कथा.
बुद्ध हे मनोविजयी होते हे सर्वज्ञात आहे. ते नेहमी शांत, सस्मित, आणि प्रसन्न असत. त्यांच्या सहवासात येणारया लोकांनाही या प्रसन्नतेचा लाभ होत असे. पण काही लोक असेही होते की त्यांना गौतमांना मिळणारा सन्मान सहन होत नसे. त्यांचा अगदी जळफळाट होत असे. असाच एक माणूस एकदा गौतमांना रागवावयास भाग पाडायचेच, त्यांचा अपमान करायचाच, फजिती करायचीच असे ठरवून त्यांच्या प्रवचनाच्या ठिकाणी आला.
प्रचंड जनसमुदाय जमला होता. तथागत शांतपणे त्या समुदायाला मार्गदर्शन करत होते. तेंव्हा हा माणूस तेथे पोचला आणि सर्वांसमोर त्याने गौतमांना न भूतो न भविष्यति अश्या शिव्या दिल्या. जमलेले लोक अस्वस्थ झाले, संतापलेही. पण तथागत शान्त होते. त्यांच्या चेहरयावरील स्मित जरासुद्धा ढळले नव्ह्ते. तो माणूस बराच वेळ अद्वातद्वा शिव्याशाप देत होता. बरयाच वेळाने तो थकून थांबला व डोळे तारवटून गौतमांकडे पहात राहिला.
तथागतांनी स्मितहास्य केले व शान्त स्वरात ते बोलले,
"मी तुला एक प्रश्न विचारू काय?"
"विचारा" तो गुरगुरला.
"जर तुला कोणी एखादी वस्तू भेट दिली आणि ती भेट स्वीकारण्यास तू नकार दिलास तर त्या भेटीवर मालकी कुणाची?"
"मालकी?"
"हां, ती भेटवस्तू कोणाकडे राहील?"
"इतकही कळत नाही? सोपं आहे, ती वस्तू त्या देणारयाकडे राहील" तो माणूस म्हणाला.
"अगदी बरोबर!" तथागत स्मित करीत म्हणाले, "मग जर मी तुझे हे शिव्याशाप स्वीकारण्यास नकार दिला तर ते कोणाकडे रहातील?"
तो माणूस सुन्न झाला आणि तथागतांच्या चरणी लागला.
तात्पर्य: जगात कोण आपल्याला काय बोलेल यावर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही. पण त्यांच्या स्तुतिशापांचा स्वीकार करणे न करणे हे पुर्णपणे आपल्याच हाती असते. आपण स्वताचा अपमान करून घ्यायचा म्हटला तर तो घोर अपमान होऊ शकतो अन्यथा ते असतात केवळ शब्दांचे बुडबुडे! ऑफिसात, समाजात वावरतांना हे जर लक्षात ठेवले तर खूपच मनस्ताप कमी होऊ शकतो.

शुभारंभ!

आजवर अनेक दिवस स्वतःचा ब्लॉग सुरु करायचा म्हणत होतो पण मुहूर्त लागत नव्हता!
मनात अनेक विचार येत पण अनभिज्ञता, आळस आणि वेळेचा अभाव यापायी हातुन काम घडत नव्हतं!!
संकेतस्थळांवर वाचन आणि आवडीच्या संकेतस्थळावर प्रतिक्रिया लिहिणे इतपतच जमत होतं!
पण हल्लीच माझ्या एका जेष्ठ आणि जाणत्या जाल-मित्राने स्वैर लिखाण करण्याचा आग्रह केला, तेंव्हा त्याच्या विनंतीला मान देत आहे!
चुका तर असंख्य होतीलच, तरी वाचकहो, गोड मानून घ्या!!